राष्ट्रभाषाप्रेम आणि बाबूजी..

नारायण फडके हे बाबूजींचे सख्खे बंधू. आम्ही त्यांना नारायणकाका म्हणत असू. नारायणकाका हे तसे वल्लीच होते.  ब्रह्मचारी होते. संघाचं, वनवासी कल्याण आश्रमाचं कार्य करत असत. बरेच वर्ष चांगली प्रकृती राहिल्यानंतर उतारवयात त्यांना काही आजार झाला, पुढे तो बळावला आणि त्यातच नारायणकाका गेले. दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, तिथेच ते गेले.

मला आठवतंय, सकाळी काहीतरी साडेसहा सातची वेळ होती आणि मी बाबूजींसोबत शुश्रूषा रुग्णालयात गेलो होतो.

आम्ही स्वागतकक्षाकडे गेलो.

मी सुधीर फडके. नारायण फडकेंचा बंधू. त्यांचं शव न्यायला आलो आहे. किती बील झालं आहे? पैसे इथेच भरायचे का? "

स्वागतकक्षात एक मल्लू परिचारिकावजा कर्मचारी बसली होती. तिने सगळा हिशेब केला आणि म्हणाली,

"ट्वेंटी थाउजंड.. "

बाबूजींनी खिशातून धनादेशपुस्तिका काढली आणि माझ्याकडे देत म्हणाले - "लिही पटकन. मी स्वाक्षरी करतो.. "

मी लगेच माझ्या फर्ड्या विंग्रजीमध्ये,

Pay - Shushrusha Hospital, Dadar, Mumbai.
Rs Twnety Thousand only

असा धनादेश लिहिला आणि बाबूजींकडे स्वाक्षरीकरता दिला.

बाबूजींनी तो धनादेश पाहिला. किंचित वैतागलेले वाटले परंतु बोलले काहीच नाहीत. त्यांनी स्वतःच शांतपणे दुसरा धनादेश लिहिला..

शुश्रूषा रुग्णालय, दादर, मुंबई

वीस सहस्र केवल I

'केवल' शब्दाच्या पुढे वाक्य संपवणारा तो दंड ओढलेला पाहून मला अंमळ गंमतच वाटली..

आम्ही तो धनादेश त्या मल्लू परिचारिकेकडे दिला..

तिने एखादी पाल अंगावर पडावी किंवा अत्यंत चमत्कारिक असा काही अनुभव यावा अशा थाटात, थोड्या तुसडेपणाने वसकन म्हटले..

"ये क्या लिखा है..? ये चेक नही चलेगा.. "

भावाच्या मृत्यूमुळे बाबूजी खरं तर दुःखात होते, अस्वस्थ होते, तरीही त्यांनी शांतपणे विचारले.

"क्यो नही चलेगा? क्या गलती हुई है..? "

"नही नही, ये नही चलेगा.. क्या लिखा है समझ में नही आता.. बडे डॉक्टरसे पुछना पडेगा.. रुको, मै उनको फोन करती है.. "

आता मात्र बाबूजी वैतागले. माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा अटलजी पंतप्रधान होप्ते..

"हां हां जरूर पुछो डॉक्टर से. और डॉक्टरसे ही क्यो? चाहे तो अटलजी से बात करवालू आपकी? स्वतंत्र हिंदुस्थान में, महाराष्ट्र में मराठी या राष्ट्रभाषा में लिखा हुआ धनादेश क्यो नही चलेगा? इस भाषांओको मजाक समझ के रखा है आप लोगोंने..?? "

अरे बापरे.. बाबूजींचा आवाज थोडा चढला होता..

मग मात्र डायरेक्ट अटलजींचं वगैरे नाव ऐकल्यावर त्या मल्लू बाईला काय वाटलं कुणास ठाऊक, तिने अटलजींना तर सोडाच, डॉक्टरलाही फोन करण्याची तसदी घेतली नाही आणि नारायणकाकांचं शव आम्हाला मिळण्याची कार्यवाही पूर्ण केली..! :)

-- तात्या.