तुम्हाला प्रसिद्ध व्हायचेय?

"यशस्वी होण्याचा राजमार्ग", "झटपट श्रीमंत कसे व्हावे?" अश्या पुस्तकांसारखे, "मनोगतावर प्रसिद्ध कसे व्हावे?" अश्या विषयाचे काही असावे असे आम्हांस वाटले. कोणीतरी ते लिहिण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच ते लिहावे असे ठरवून आमच्या अभ्यासगटाने सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध आणि अप्रसिद्ध मनोगतींच्या वाटचालीचे सखोल अध्ययन केले. त्यातून आलेले निष्कर्ष पुस्तकरुपात प्रसिद्ध होणार आहेतच (त्याची आगाऊ नोंदणी सुरू आहे) पण त्याआधी त्याची झलक मनोगतींसाठी ...

तुम्हाला प्रसिद्ध मनोगती व्हायचे आहे का?



तुम्हाला लेख, कथा, अनुभव लिहिता येतात का?
कविता, गझला, गीते, बालगीते लिहिता येतात का? चारोळ्या तरी?
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, इतिहास, भूगोल यांचा अभ्यास आहे का? या विषयांवर मतप्रदर्शन, वादविवाद, चर्चा करता येतात का?
साहित्याची समज, ज्ञान, अभ्यास आहे का?
निरनिराळे खाद्यपदार्थ बनवता येतात का?


या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर 'हो' असेल तर आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता (यातही बऱ्याच खाचाखोचा आहेत, त्याचा परामर्श नंतर घेऊ). यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर 'हो' नसेल तर मात्र प्रसिद्धी सहजसाध्य नाही. प्रसिद्ध होणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे. दुःखी होण्याचे कारण नाही, प्रसिद्धी मिळणे अवघड जरूर आहे पण अशक्य नाही. सखोल अभ्यासानंतर आम्ही दिलेल्या युक्त्या आणि सूचनांचे पालन केल्यास ही चढाई अवघड नाही.

मनोगतावर येणाऱ्या साहित्याचे ('साहित्य' या शब्दाचे 'लिटरेचर' म्हणजे वाङ्मय आणि 'मटेरियल' जसे 'बांधकामाचे साहित्य' हे दोन्ही अर्थ लागू आहेत) ढोबळ मानाने गद्य, पद्य, चर्चा, पाककृती आणि प्रतिसाद असे विभाग आहेत. 'प्रतिसाद' हा वेगळा साहित्यप्रकार नसला तरी लिखाणाचा प्रकार आहेच. प्रसिद्ध होणे आणि झाल्यास टिकवून ठेवणे यात प्रतिसाद महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे प्रतिसाद काळजीपूर्वक आणि कौशल्याने द्यावे लागतात.

आता आपण "प्रतिसादाज - जनरल गाईडलाइन्स" पाहू (भारतीय भाषांतील शब्द इंग्रजी बहुवचन करताना शेवटी 'आ' का वासतात ते कळत नाही, "बहु-वचन" ऐकून "आ" वासण्याचा सास्वांच्या वर्तनाशी याचा काही संबंध आहे का? याचा शोध आम्ही घेत आहोतच) प्रत्येक साहित्यप्रकाराला अनुसरून प्रतिसादात कसे आणि काय बदल करावेत याचा स्वतंत्र विचार केला जाईल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही लिहिलेले प्रतिसाद जास्तीतजास्त लोकांकडून वाचले जावेत. (मनोगतावर स्त्री-पुरुष समानतेचे चित्र दिसत असले तरी वास्तव संपूर्णपणे तसे नाही. नव्या स्त्री सदस्यांना काही फायदे आपोआप होतात. पुरुषवर्गाकडून तुमचे सुरुवातीचे प्रतिसाद वाचले जाण्याची शक्यता वाढते शिवाय स्त्री-सदस्यांची ऐक्यभावना आयतीच मदतीला येते. पण लक्षात ठेवा ही सहानुभूती किंवा सॉफ्ट-कॉर्नर आहे प्रसिद्धी नव्हे. पुरुष सदस्यांना ही अनुकूलता नसली तरी हा मुद्दा तसा गौणच आहे.)


प्रसिद्ध होऊ इच्छिणाऱ्याने कोणत्याही साहित्यप्रकाराकडे दुर्लक्ष करू नये. जसे प्रश्न विचारताना त्या प्रश्नाचे उत्तर माहीत असणे आवश्यक नसते तसेच, कोणत्याही साहित्यप्रकाराला प्रतिसाद देण्यासाठी त्या साहित्यप्रकाराची समज असणे आवश्यक नसते. काही समजले नाही तरी "वा!", "छान!" "सुंदर!", "सुरेख!" "क्या बात है!" यापैकी आळीपाळीने प्रतिसाद देता येतात. कोणते लिखाण कोणत्या प्रकारचे आहे हे समजण्याची सोय मनोगतावर आहेच, त्याचा वापर करावा. त्यामुळे एखाद्या गझलेला "छान कविता" म्हणण्यासारख्या स्वाभाविक चुका टाळता येतील.

संबोधन काय असावे याचा मनोगतावर एक अलिखित नियम आहे. केवळ नावाने संबोधणे तितकेसे शिष्टसंमत नाही. लेखकाला "राव" किंवा "पंत" आणि लेखिकेला "ताई" असे शेपूट लावले पाहिजे. (झटपट प्रसिद्धीसाठी "अमुक" लेखकाला "अमुकताई" किंवा "तमुक" लेखिकेला "तमुकराव" असे म्हणण्याच्या युक्तीचाही वापर करता येईल. घोटाळा वाचकांच्या लक्षात येताच अगदी मोठ्या मनाने "क्षमा असावी, आम्हांस ठाऊक नव्हते" अश्या स्वरूपाचा प्रतिसाद द्यावा.) आता इथे आणखीही शक्यतांचा विचार करणे आवश्यक आहे. उदा. तुम्ही "अविवाहित आणि पाहणारे" (इंग्रजीमध्ये "अनमॅरिड ऍंड लुकिंग") असाल आणि तुमच्या या अवस्थेत तुम्हाला बदल अपेक्षित असेल तर कोणासाठी "ताई"/"राव" वापरू नये हे कळेलच. आता तुम्ही "विवाहित आणि (तरीही) पाहणारे" (मॅरिड ऍंड लुकिंग) असाल तर मात्र "सारे भारतीय माझे बांधव आहेत" ह्या कटू सत्याचा स्वीकार करावा म्हणजे मनस्ताप कमी होईल.

भाषा कशी असावी याचेही काही संकेत आहेत. साधी सोपी, नेहमीच्या वापरातील भाषा वापरणे तितके उपयोगी नाही. ऐतिहासिक पुस्तकांतून किंवा जुन्या मराठी साहित्यातून दिसणारे अगदी जड आणि क्लिष्ट शब्द वापरावेत. या लेखाच्या भाषेचा अभ्यास केला तरी कल्पना यावी. "किंवा" साठी "अथवा", "माहीत नव्हते" साठी "ज्ञात नव्हते" यासारखे बदल करावेत. (या पुस्तकाच्या "परिशिष्ट क" मध्ये "नेहमीचे वापरातील शब्द" आणि पर्यायी "मनोगतावर वापरायचे शब्द" यांची यादी दिलेली आहे.) "तथापि, किंबहुना, कारणमीमांसा, युक्तिवाद, विश्लेषण, तर्कसंगत, विचारप्रवर्तक, सिंहावलोकन" असे शब्द वापरावेत. किंबहुना असे शब्द वापरता येतील अश्यातऱ्हेने वाक्यरचना करावी. 

लेखाची लांबी वाढल्याने इथे थांबणे आवश्यक आहे. (वाचकांची मागणी आल्यास) पुढील माहिती पुढील भागात प्रकाशित करण्यात येईल.