वसंत माझियाकडे पहात हळहळायचे

वसंत माझियाकडे पहात हळहळायचे,
"तिला, तुला असे ऋतू पुन्हा कधी मिळायचे?"

तुझ्याच कल्पनेत आसमंत गरगरायचे
तुझ्याच चिंतनात सूर्यचंद्र मावळायचे

म्हणूनही सुकू दिली न ओल अंतरातली
चुकून पानपान आठवातले गळायचे

कितीकदा निघायचो घराकडेच जायला
तुझ्याकडेच पाय नेमके कसे वळायचे?

कबूल मी तसा तुझा जुनाच पापिया तरी,
सजा सुनावलीस तू, गुन्हे कधी कळायचे?

तुझ्याविना इतस्तत:, इतस्तत: फिरायचे
जगास त्रास द्यायचा, स्वत:सही छळायचे

अजाणतेपणी मला कुणी हळू खुडेल का?
असेच एकटे किती कुवार दर्वळायचे?

"तशी पुन्हा कुणी कधी इथे न झेप घेतली!"
उदास लाट ऐकुनी समुद्र तळमळायचे

मृदंग टाळ ऐकताच मोगरा फुलायचा,
बघून पालखी अजानवृक्ष सळसळायचे

चित्तरंजन