हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२५)

श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥


अभंग # २५.


जाणीव नेणीव भगवंती नाही । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कलिकाळाचा रीघ नाही ॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतूंसी केविं कळे ॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असें ॥


पाठभेदः हरिउच्चारणी = उच्चारणीं


नामाचा महिमा अगाध आहे ह्यात शंकाच नाही. हरीला आपले नाममाहात्म्य किती प्रिय आहे हे ज्ञानदेव आपल्याला ह्या अभंगातून सांगत आहे. नवजात अर्भक जरा जरी रडले तरी त्याची आई पटकन आपल्या हातातील सारी कामे बाजूला सारून धावत आपल्या बाळाकडे लक्ष देते. गाढ निद्रेत असली तरी ती उठून आपल्या बाळाकडे लक्ष देते. त्याच्या रडण्याचे कारण नेमके काय आहे हे जाणून ते दूर करण्याचा प्रयत्न करते. अगदी त्याचप्रमाणे भक्ताच्या / नामधारकाच्या मुखात भगवंताचे नाम आले की भगवंत नामधारकाची काळजी घेतोच. असा नामधारक तत्काळ निर्भय आणि निश्चिंत होतो. भगवंताच्या स्मरणाचा अनुभव असा रोकडा आहे. म्हणूनच तर संतजन विठूमाऊली असा विठ्ठलाचा धावा करतात. दुसऱ्या अंगाने विचार केला तर विदर्भातील साधू श्री. गुलाबराव महाराज यांच्या खालील ओवीही याचेच प्रमाण देतात.
'अमृत अवचट मुखीं पडले । तरि काय म्हणावे मरण न चुकले ॥
तैसे अवचट हरिनाम वदनीं आले । तरि होय दहन महादोषा ॥'
'वस्तु शक्तीच्या ठायीं । श्रद्धेची अपेक्षा नाही ॥
नाम 'वस्तुतंत्र' लवलाही । वचन सिद्ध ॥'


नाम कसेही घेतले तरी ते मोक्षाचे फळ देणारच. दुसरे म्हणजे, नाम घेणारा जरी अज्ञ असला तरी ज्याचे नाम घेतो तो तर सुज्ञ आहे. घेणारा अल्पज्ञ असला तरी ऐकणारा सर्वज्ञ आहे आणि घेणारा जरी एकदेशी असला तरी नामी सर्वव्यापी आहे की. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंत नामात सूक्ष्म रूपाने वास करून असतो.
'तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥'
म्हणूनच नामाचा उच्चार केल्याबरोबर सुज्ञ, सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान अशा भगवंताचे लक्ष वेधले जाते. नामाच्या अखंड स्मरणाने त्याची कृपादृष्टी साधकाकडे वळते आणि नामधारकाला प्रभूकृपेने मोक्ष तर मिळतोच पण त्याच्या जीवनात प्रभू प्रगट होऊन नामधारकाचा आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक योगक्षेम स्वतः वाहतो.
'तुका म्हणे यासी नामाचा अभिमान । जाईल शरण त्यासी तारी ॥'

नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कलिकाळाचा रीघ नाही ॥


नामधारकाचे एक वैशिष्ट्य असते. तो नेहमी भगवंताच्या स्मरणात जीवन जगत असतो. त्याची खूण म्हणजे त्याच्या मुखात अखंड नाम चालू असणे. त्याच्या स्मरणात भगवंताशिवाय काही नसतेच. द्वैतभावच नसेल तर मग वाईट विचार तरी कुणाबद्दल असणार आणि देहभावच सरला तर मग काळाची तरी भीती का असावी? भगवंताच्या कृपेने श्रद्धायुक्त अभ्यासाने नामधारकाच्या अंतःकरणात नाम स्थिरावते आणि त्यामुळे त्याच्या जीवनात वाईट काळ येतच नाही.

यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरुनि उठविली । यमलोकीं खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणती काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
ज्ञानेश्वऱीतील ह्या ओव्या आणखी वेगळे काय सांगतात?


तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतूंसी केविं कळे ॥


ही ओवी वाचताना ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी'त लिहिलेल्या नवव्या अध्यायातील ओव्या आठवाव्याश्या वाटतात.
परि प्राणियांचें दैव कैसे । जे न देखती मातें ॥ ३०० ॥
ज्ञानेश्वरीही ज्ञानदेवांनीच लिहिली आहे. पण ती 'भगवंताच्या' भूमिकेतून. हरिपाठात मात्र ज्ञानदेव साधकाच्या / अभ्यासकाच्या भूमिकेतून हे लिहितात असे वाचकांच्या निदर्शनास आणून द्यावेसे वाटते.
ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायातील खालील ओव्या ह्या ओवी संदर्भात चिंतनीय आहेत.
आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा ।
जे वेदांचियां चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥


जेथ नाना मतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।
चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जे पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥


पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु ।
तयांचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥ २७५ ॥


जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती अउमकारेंसीं ।
जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥


म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु ।
एंव मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥


नामाचा यथार्थ महिमा प्रत्यक्ष वेदांनाही आकळत नाही. चैतन्याचा विराट सागर विश्वाच्या अतीत आहे. जेव्हा तोच विश्वभाव ग्रहण करतो तेंव्हा तो शक्तिरूपाने प्रत्ययास येतो. तेच शक्तिरूपी स्फुरण संतांच्या ठायी 'नाम'रूपाने वास करीत असते. संत तुकाराम महाराज तर देवालाच कौतुकाने म्हणतात,
'तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा ॥'
तुलसी रामायणात तुलसीदासांनीही असेच उद्गार प्रभू रामचंद्रांना उद्देशून काढले आहेत.


तात्पर्य हेच की नामाचा महिमा जेथे वेदांनाही आकळत नाही तेथे इतर जडबुद्धिच्या स्थूल दृष्टीच्या लोकांना कसा कळणार? ज्या शरीराच्या आधाराने आपण आपली ओळख करून देतो. ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत असे आपल्याला वाटते त्या शरीराबद्दल तरी आपल्याला कुठे काही माहीत आहे? तरीही आपण जगतोच ना? मग परमेश्वराबद्दल आपले अज्ञान किती प्रचंड आहे ह्याची कल्पनाही न केलेली बरी. पण ज्यांना ह्याची जाणीव झाली अशा सामान्य माणसांनी संतांच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून नाम घेत राहावे म्हणजे एक दिवस त्या भगवंताचे दर्शन होईलच.


ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असें ॥


नामाचा महिमा गाऊन झाल्यानंतर ज्ञानदेव आता नामाची फलश्रुती नेमकी कशात आहे हे वाचकांना सांगत आहेत. भगवन्नामाच्या पाठाचे फळ म्हणजे 'सर्वत्र वैकुंठ' असे दृष्टीस पडणे. भवरोगाने त्रस्त झालेल्या साधकाला जगाचे खरे दर्शन घडतच नाही. मनोरुग्णाला कळते का की तो रोगी आहे? तसेच सामान्य माणसाला कितीही सांगितले की तो भवरोगाने त्रस्त आहे तरी त्याला हे पटणार नाही. नामाच्या उच्चाराने साधक भवरोगातून मुक्त होतो. त्याला जी दिव्य दृष्टी प्राप्त होते त्या दिव्यदृष्टिला सर्व जग म्हणजे प्रभूचा विस्तार, विश्व म्हणजे परमात्म्याचा चिद्विलास, भूतमात्र म्हणजे चैतन्याची शोभा असा अनुभव प्राप्त होतो.


ज्या नामाने ज्ञानदेवांना हा अनुभव प्राप्त झाला तोच अनुभव तुम्हा-आम्हाला यावा म्हणून ज्ञानदेव आवर्जून सांगतात...


हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥


ह्याआधीचे अभंग