ह्यासोबत
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा!
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#७)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#८)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#९)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#१०)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#११)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१७)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१८)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१९)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२०)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२१)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२७)... अंतिम
॥ श्रीसद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग # १७.
हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुठी नांदे ॥
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीने दिधले माझ्या हाती ॥
पाठभेदः तपिन्नला=तें भिनले, वैकुंठी=कोटी,दिधले=दिले
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । हा ज्ञानदेवांचा उपदेश ग्राह्य मानून मुखाने हरिनाम घेता घेता पुण्याची गणना कोण करी असे नामाचे दिव्य अनुभव नामधारकाला येऊ लागतात. नामाचे अनुभव घेऊन नामाची महती इतरांना सांगणारा असा नामधारक परमश्रेष्ठ समजला जातो. असा नाममहिमा गाणाऱ्या नामधारकाचा देह पवित्र होय. याचा अर्थ तो देह धारण करणारा जीव धन्य होय. जो जीव या नरदेहाचा उपयोग नामसंकीर्तनासाठी करतो व नामाची महती,कीर्ती सांगून इतरांना नामस्मरण करण्यास प्रवृत्त करतो तो स्वतःचे व इतरांचे सुख निर्माण करतो. म्हणून तो जीव पवित्र,धन्य होय. भगवंत आणि त्याचे नाम हे एकमेकांहून वेगळे असूच शकत नाहीत. नामस्मरणात भगवंताचे सर्वांगीण चिंतन करणे अपेक्षित आहे. ईश्वरप्राप्तीचा हाच राजमार्ग आहे. असे चिंतन करता करता अंतःकरण निर्मल आणि पवित्र होतेच. त्याचबरोबर साधकाच्या वृत्तीही सात्त्विक आणि विकाररहित होतात. त्याचा परिणाम म्हणून देहदेखील सूक्ष्म बनतो. "खवळलिया काम क्रोधी । अंगी भरती आधी व्याधी ॥" हे जर खरे असेल तर "हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥" ह्याची अनुभूती नामधारकाला का न यावी? जे सूक्ष्म आहे ते पवित्र असते. नामस्मरणाने नामधारकाचा देहही सूक्ष्म होत जातो. संतांच्या शरीरातील पेशीसुद्धा नाममय झालेल्या असतात. एका संतांच्या अपघाती निधनानंतर त्याच्या अस्थीतून 'विठ्ठल' नामाचा ध्वनी येत होता. त्यावरून त्यांची ओळख पटली होती. असे सांगतात की अर्जुनाच्याही रोमरोमातून 'कृष्ण' नामाचा जप चालू असे. अर्थात ह्यासाठी अनेक वर्षे चिकाटीने अभ्यास करावा लागतो.
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुठी नांदे ॥
भारतीय शास्त्रांमध्ये अनेक प्रकारची तपे सांगितली आहेत. तपाचा प्रकार कोणताही असला तरी त्यात इंद्रियनिग्रह अपेक्षित असतो आणि शरीराला ताप असतो. शास्त्रांनुसार सारे घडले तर पुण्यसंचयाने तपस्व्याच्या सूक्ष्मदेहांत बदल घडून येतो. त्याचे महत्त्वाचे फल म्हणजे मृत्यूनंतर त्याला उत्तम गती प्राप्त होते असे शास्त्र सांगते. मृत्यूनंतर स्वर्ग तरी प्राप्त होतो अथवा त्यांपलीकडे असणाऱ्या वैकुंठाची प्राप्ती होते. परंतु स्वर्ग आणि वैकुठ हे दोन्ही लोक भगवंताच्या दर्शनाच्या म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या खालीच आहेत. पुण्यक्षय झाला की त्याला पुन्हा पृथ्वीवर यावेच लागते. याचे कारण तपश्चर्येने कारणदेहामध्ये घट्टपणे बसलेले अज्ञान दूर होत नाही. अशावेळी भगवंताचे स्मरण करून देणारे नाम आणि गुरूपदेशच उपयोगी पडते.
भक्तीच्या भाषेत बोलायचे तर स्वतः नामाचा अभ्यास करून त्याची कीर्ती-महती इतरांना सांगून त्यांना नामाची गोडी लावणे हेच महातप आहे. या तपाच्या सामर्थ्याने नामधारकाला स्वतःच्या अमरत्वाचा बोध होतो, तो चिरंजीव होतो. वैकुंठ म्हणजे विविध कुंठा-जिथे वृत्ती कुंठीत होते त्या आनंदात नांदतो.
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥
ह्या ओवीचा वाच्यार्थ असा घेतला जातो की नामधारकाचे माता, पिता इत्यादी चतुर्भुज म्हणजे हरिरूप होऊन राहतात किंवा स्वर्गात (थोडे पुण्यवान असलेले वैकुंठात) जातात. पण हे खरे आध्यात्मिक आहे का? असा प्रश्न माझ्या मनात आहे.
भक्तीच्या भाषेत म्हटले तर नामधारकाचे नातलग म्हणजे जे नामधारकावर आणि नामावर प्रेम करतात; त्याचा आदर करतात आणि त्याच्यासंबंधी आपलेपणा बाळगतात ते. संत सेना महाराजांचा ज्ञानदेवांबद्दलचा खालील भाव हे अधिक स्पष्ट करतो.
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जीवलग निर्धारे ज्ञानदेव ॥
ही सर्व मंडळी नामधारकाच्या संगतीने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात. याचे कारण असे की, नामधारकाच्या संगतीने व त्याच्या उपदेशाने या सर्व लोकांना नामाची गोडी लागते. एकदा का नामाची गोडी लागली की तेच गोड नाम त्या सर्वांचे जीवन गोड करते. त्या सर्वांना चतुर्भुज म्हणजे हरिरूप करते.
चतुर्भुज होणे म्हणजे बेड्या ठोकणे (बंदिवान होणे) असाही अर्थ आहे. ज्ञानदेव नामस्मरणाचे महत्त्व सांगत असता तपश्चर्या वगैरे साधनामार्गांच्या अंतिम फलाचा आढावा (सिद्धाचे मुक्तिसुख) तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुठी नांदे ॥
ह्या ओवीतून घेत आहेत.
तर मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥
ह्या ओवीतून सर्वसामान्य माणूस कसा बद्ध होतो हे त्यांना सांगावयाचे असावे असे मला वाटते.संसाराच्या ह्या पसाऱ्यातून मुक्त होणे बद्धाला जमत नाही. पण नामस्मरणाने एकदा का सद्गुरूकृपा झाली की,
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीने दिधले माझ्या हाती ॥
हा ज्ञानदेवांचा अनुभव नामधारकाला येतोच येतो. स्वर्ग आणि वैकुंठ हे दोन्ही कालाच्या स्वामित्वाखाली असतात. पुण्याईच्या बळावर जरी ते प्राप्त झाले तरी त्याला क्षय आहे. म्हणून देहातीत, कालातीत होणे हे अध्यात्माचे ध्येय असते; नव्हे असावेच. अध्यात्मज्ञान हे जरी गूढ असले तरी अगम्य नाही हे ज्ञानदेव नामधारकांना आवर्जून सांगत आहेत. एकदा का सद्गुरूकृपा झाली की ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान ह्या त्रिपुटीचा नाश होऊन जातो. तेंव्हाच खरे तर आत्मज्ञान उदयास येते. हेच त्यातील गूढपण आहे. नामस्मरणानेच दिव्य ज्ञान, दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव केवळ सद्गुरुकृपेनेच शक्य आहे हे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतात. ही सद्गुरूकृपा प्राप्त करून घेण्याचे सर्वात सुलभ साधन म्हणजे...
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥