हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१९)

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    


अभंग # १९.


वेदशास्त्रपुराण श्रुतींचे वचन । एक नारायण सार जप ॥
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाची श्रम व्यर्थ जाय ॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥
पाठभेदः हरिविण= क्रिया नेम, शस्त्र= शास्त्र


ज्ञानदेव नामाचा महिमा हरिपाठातून सांगत असले तरी त्याला अध्यात्मशास्त्रातील प्रमाणभूत ग्रंथ वेद, शास्त्रं, पुराणं आणि उपनिषदांचा आधार आहे हे निदर्शनास आणून देण्यास विसरत नाहीत. ह्याआधीही ते दुसऱ्या अभंगात 'चहूवेदी जाण षट्शास्त्रीकारण । अठराही पुराणे हरिसी गाती ॥' असे सांगून आपल्या म्हणण्याला वेद, शास्त्रं आणि पुराणांचा असा आधार असल्याचे पटवून देतात. भारतीय अध्यात्मशास्त्राप्रमाणे भगवंताचे दर्शन हेच मानवीजीवनाचे अंतिम ध्येय असावे असे वर्णन आढळते. ते ध्येय साध्य करण्यासाठी नाम हेच साधन सांगितले आहे. आपल्या आधी जे संत होऊन गेले त्यांचाही हाच उपदेश आहे.
"चारी वेद जयासाठी । त्याचे नाम धरा कंठी ॥
न करी आणिक साधन । कष्टसी कां वायांविण ॥
अठरा पुराणाचे पोटी । नामाविण नाही गोठी ॥
तुका म्हणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारी ॥"
                    किंवा
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥


कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्या आधीच्या ज्ञानी अभ्यासकांच्या तर्कशुद्ध विचार आणि अनुभूतींच्या आधाराने वाटचाल केली तर वृथा श्रम तर वाचतातच पण कालापव्ययही होत नाही. संतांचे वचन आणि अनुभव हे आपल्यासारख्या सामान्यांना मार्ग दाखवीत असतात.
नामजप हेच सर्व साधनांचे सार आहे. कारण नाम हे उपाधिरहित आणि बंधनातीत आहे असा नामधारकांचा अनुभव आहे.


जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाची श्रम व्यर्थ जाय ॥


भारतीय ज्ञानी आणि विचारवंतांनी मानवी जीवनात धर्माचे स्थान अढळ आहे ह्याची जाण ठेवली आहे. धर्माचे उद्दिष्ट आहे मानवी समाज एकत्र राखून मानवाला सुख-सुविधा देणे आणि त्याची प्रगती साधणे. देहाच्या अंगाने भौतिक उत्कर्ष आणि अंतरंगातून आत्मिक उन्नती हेच खऱ्या प्रगतीचे लक्षण आहे. देहाच्या अंगाने कर्म करणे भागच आहे आणि अंतरंगातील प्रगती म्हणजे आत्मानुभूती किंवा भगवंताचे दर्शन ह्यासाठी जप, तप हेही आवश्यक आहे. पण त्याठायी भगवंताचे अधिष्ठान हवे. रामदासस्वामींनी लिहिलेच आहे,
'सामर्थ्य आहे चळवळीचे । परंतु तेथे देवाचे अधिष्ठान हवे ॥'


धर्माचे वर्मच न समजता केलेले धर्माचरण अहंकार, द्वेष-मत्सर ह्यांनाच खतपाणी घालणार. त्यामुळेच तर सध्या धर्मा-धर्मांत एवढी तेढ दिसून येते. विरोधामुळे भांडण-युद्ध ह्यांना खतपाणी घातले जाते. अंतिमता मानवालाच घातक ठरते.
भगवंताचे दर्शन हा एक दिव्य अनुभव आहे. त्या दिव्यत्वाची थोडी झलक सद्गुरू साधकाला देऊन त्याच्या साधनेची दिशा काय असावी ह्याचे मार्गदर्शन करतात‌. सद्गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले तर नरेंद्रांचा स्वामी विवेकानंद व्हायला वेळ लागत नाही. हा सगळा प्रांत अंतरंगाशी निगडित आहे. प्रामाणिकपणे अखंड नामस्मरण केले असता नामधारकाचा हा प्रवास सुखाचा होऊन तो तृप्त होतो.जप, तप, कर्म, अनुष्ठान आणि धर्माचे नियमपालन यांचा संबंध मुख्यता जीवनाच्या बहिरंगाशी आहे. त्यामुळे शुद्ध अध्यात्मात ह्या गोष्टींना गौण स्थान आहे. केवळ भगवंताच्या दर्शनाची पार्श्वभूमी नसेल तर मग असे जप, तप, कर्म, धर्म ह्या साधनांना काही अर्थ उरत नाही. मात्र असे केल्याने विनाकारण श्रम मात्र होतात आणि ते वाया जातात. तहानेने व्याकुळ झालेला मृगजळामागे धावत गेला तर काय होईल? पाणी तर मिळणार नाहीच. पण श्रम मात्र पदरी पडतात. तद्वत केवळ अज्ञानाच्या अधिष्ठानावर केलेले जप, तप, कर्म हे केवळ श्रमच पदरी पाडतात.


हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥


माणूस सुखासाठी आणि आयुष्यात निवांतपणा लाभावा म्हणून बरेच प्रयत्न करत असतो. सुखाच्या आशेने जे काही गोळा करतो तेच मुळी अपूर्ण,परावलंबी असल्यामुळे त्याच्या आयुष्यात तो कधीही निवांत होत नाही. 'उगा राहे निवांत शिणसी वाया' असे ज्ञानदेव मागील एका अभंगातून सांगतात. आता मात्र 'निवांत' होण्याची गुरुकिल्ली ते साधकाच्या हाती देत आहेत. जो भगवंताचा आधार धरतो तो निवांत आणि निर्भर होतो. त्यामुळे प्रापंचिक प्रसंग मनावर आघात करीत नाहीत. नामस्मरणाने सत्वगुणसंपन्न झालेले मन भगवंताच्या ठिकाणी रमू लागते. हळूहळू नामधारक भगवंताचे प्रेमसुख भोगण्यात इतका रंगून आणि रमून जातो की त्याचे जीवपण संपून देवपणात कधी रुपांतर झाले हे त्याचे त्यालाही कळत नाही. एखादा भुंगा सुगंधी कळीवर बसतो आणि तिच्यातील मकरंद सेवन करण्यात स्वतःला विसरून जातो. त्याचप्रमाणे भगवंताच्या नामात रंगलेल्या साधकाची अवस्था होते. एकदा का नामधारक नामात रंगला की त्याला स्वतःचे व जगाचे भान उरत नाही. तो भगवंताचाच होऊन राहतो. ह्या अवस्थेलाच नामसमाधि म्हणतात.


ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥


मंत्र आणि शस्त्र ह्यांचा एक समान गुण आहे. ते आपले इप्सित साध्य करतात.पण स्वतःमध्ये मात्र बदल होऊ देत नाहीत अथवा नाशही पावत नाही. मंत्राच्या माध्यमातून साधक विश्वातील शक्ती सिद्ध करून आपला कार्यभाग साधतो. अशा शक्तींचा दृश्याशी संबंध असतो. भगवंताची शक्ती अतिसूक्ष्म असते. भगवंताचे नाम हा त्या शक्तीचा मंत्र होय. नाम मुळातच सिद्ध आहे. पण तेच जर सद्गुरूंकडून आले की त्यामध्ये सद्गुरूंची साधना आणि संकल्पाचे सारे तेज येते. या नामाचा प्रामाणिकपणे मनापासून जप केला तर साधकाची देहबुद्धी आणि त्यामुळे निर्माण होणारी वासना ह्या दोन्हीही मारल्या जातात. वासनाशून्य झाल्यानंतर जे नाम आतून स्फुरते ते साक्षात भगवंताचेच स्फुरण होय.
'एका जनार्दनी नामापरता मंत्र । दुजे नाही शस्त्र कलियुगी ॥'
हा एकनाथ महाराजांचाही अनुभव आहे.


नामाने जे प्रतिभाज्ञान साधकाला मिळते, प्राप्त होते, त्या ज्ञानाच्या प्रकाशात त्याला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. आपल्या अमरत्वाचाही बोध होतो.
'महाराज म्हणती त्याकारण । हेच तुझे अज्ञान । अरे वेड्या जन्ममरण । हीच  मुळी भ्रांति असे ॥ ३५ ॥ जन्मे न कोणी मरे न कोणी । हे जाणावया लागुनी । परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें केला ॥ ३६ ॥ (गजाननविजय अध्याय ११)  गजाननविजय मध्येही गजानन महाराज आपल्या शिष्यांना उपदेश करतात.
नामस्मरण करता करता साधकाला जगाचे भान उरत नाही तेथे काळाचे भान कोठलें उरणार?


नामाचे हे माहात्म्य ओळखूनच ज्ञानदेव उपदेश करतात,


"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥


पुस्तक (अभंग १ ते १५)
अभंग १६
अभंग १७
अभंग १८