हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#८)

                         ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

अभंग # ८.
संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥
एकतत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥
भिन्नपाठः मनोमार्ग= मनोमार्गे ,एकतत्त्व= एकतत्त्वीं

ज्ञानदेव संसारी सामान्यजनांसाठी भगवंतप्राप्तीचा "नामस्मरण" मार्ग हरिपाठातून सांगत आहेत. नाम हे संतसंगतीशिवाय मिळत नाही आणि मिळाले तरी टिकत नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. किंबहुना सर्वच संतांचा हा अनुभव आहे. म्हणूनच तुकाराम महाराज, "न लगे मुक्ती धनसंपदा । संत संग देई सदा ॥" हे मागणे भगवंताकडे मागतात. योगमार्ग हा सामान्यजनांसाठी सहज नाही याची जाणीवही  ज्ञानदेवांना होतीच.म्हणूनच त्यापासून दूर राहण्याचा सल्ला हरिपाठाच्या पाचव्या अभंगात ते देतातच. "तू मन हे मीचि करी" हे जरी भगवंतांनी गीतेत सांगितले असले तरी आपले मन हे सहजच इंद्रियांना सन्मुख आहे. इंद्रिये स्वभावतःच बहिर्मुख आहेत. स्वस्वरूपाच्या विसरात आपली  जाणीव देहबुद्धीच्या अधिष्ठानावर विषयात सुखाचा शोध घेऊ लागते. स्वरूपाच्या विसरात नांदणाऱ्या जाणीवेच्या संकल्प-विकल्पात्मक स्फुरणाला  मन असे संबोधिले जाते. इंद्रियांच्या द्वारे सुखाच्या आशेने मन विषयांकडे धाव घेते. ही मनाची गती म्हणजेच अधोगती होय. मनाच्या ह्या अधोगतीला "उफराट्या नामे" वळवून देहबुद्धीचे रुपांतर आत्मबुद्धीत करणे आणि "आनंदाचे डोही आनंद तरंग" अनुभवणे संतांना अभिप्रेत असते. भगवंताच्या सान्निध्यात राहण्याची योग्यता मनाला येणे म्हणजेच मनाचे "उन्मन" होणे हे नामस्मरणात अभिप्रेत आहे. "उन्मनीच्या सुखाआड । पांडुरंग भेटी देत॥" असे जे म्हटले आहे ते उगाच नाही. माणसाच्या मनात जागेपणी विचारांचा प्रवाह सतत चालू असतो. भगवंताच्या मार्गात वाटचाल सुरू झाली की तो प्रवाह क्षीण होऊ लागतो. मन स्थिर होत जाते. अखेर विचारशून्य होऊन कोणतीही वृत्ती उठत नाही. मन बहिर्मुख होण्याचे टाकून अंतर्मुख होऊ लागते. समजणे, उमजणे आणि आकळणे ह्या ज्ञानप्राप्तीच्या ३ पायऱ्या आहेत. जाणीव जशी तरल होत जाते तसा ह्यामध्ये विकास होत जातो. मनाच्या या आत उतरण्याच्या प्रक्रियेलाच संतांनी सांगितलेला अध्यात्ममार्ग म्हणतात. आत उतरता उतरता मन सूक्ष्म आणि निर्मळ होते. पवित्र झालेले असे मन भगवत्स्वरूपच होते.

रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥

भगवंताचे नाम वाचेने अखंड घेणे, स्मरणात स्फुरणे हा वास्तविक जीवाचा भाव, स्वभाव म्हणजे स्वधर्म होय. या स्वधर्माला जीव मुकला म्हणूनच तो अखंड सुखाला आंचवला. या स्वधर्माची दीक्षा देण्यासाठी संत साधकाला नाम देतात. नामातून देवाची स्मृती जागृत होते, प्रेम उत्पन्न होते. साक्षात शिवही रामनामाचाच जप करत असत. रामजप हा त्यांचा आत्माच होता. आत्मा म्हणजे प्रिय असण्याची परमसीमाच.


एकतत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥

नाम हेच एक तत्त्व आहे, साक्षात परब्रह्म आहे असे समजून नामस्मरणाची साधना केली असता द्वैताचे बंधन बाधत नाही. बंधनाचे मूळ दृश्यामध्ये आहे. दृश्याला मी पूर्ण खरे मानतो आणि भगवंताला विसरतो. त्या विस्मरणामुळे मी भगवंताहून निराळा झालो. तेथे द्वैत उत्पन्न झाले.द्वैतातून अनेकपणा पसरला. भगवंताचे सतत स्मरण राहण्यास त्याच्या नामासारखा अन्य उपाय नाही. नामाच्या उपासनेने "चित्ताचे चैतन्य होऊन विश्व म्हणजे प्रभूचा चिद्विलास" असा बोध साधकाला होतो. या बोधाने जीवाला द्वैताचे बंधन तर राहत नाहीच,उलट द्वैताच्या द्वारे तो अद्वैताचा भोग घेत राहतो. हा भोग घेण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया म्हणजे नामामृताचे सेवन.

नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥

नामाच्या द्वारे ज्याची वृत्ती विष्णुरूप झाली अशा वैष्णवालाच या नामामृताचे सेवन करण्याचे भाग्य प्राप्त होते. "जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढे॥" असे तुकाराम महाराजही म्हणतात.

माणसामध्ये जी जाणीव आहे ती बुद्धीहून जेंव्हा सूक्ष्म होते तेंव्हा ती कमालीची तरल होते. ती तरल जाणीव म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये राहणारी जीवनज्योत होय. तिलाच जीवनकला म्हणतात. वृत्तींचा निरोध करता करता महत्प्रयासाने योग्याला ही जीवनकला साधते. नामभक्त आणि योगी दोघेही एका अतींद्रिय गोडीमध्ये जगाला विसरतात. फरक इतकाच की भक्त डोळे उघडे ठेवून नामामृत चाखतो तर योगी ध्यानात पूर्णं मग्न होऊन जीवनकलेच्या प्रकाशात तीच गोडी चाखतो. भक्ताला नामस्मरणात साधनाचे कष्ट पडत नाहीत ही नामस्मरणसाधनेची अपूर्वता आहे.

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥

श्री.ज्ञानदेव दोन भक्तांची उदाहरणे देतात. एक... निष्पाप,निरागस आणि निर्मल असा बाळ प्रल्हाद ज्याला नारदमुनींच्या कृपेने भगवन्नाम लाभले आणि दोन... सात्त्विक,बुद्धिप्रधान आणि धारणाशक्ती चांगली होती असा उद्धव ज्याला ज्याला प्रत्यक्ष श्रीकृष्णाने आपले ज्ञान दिले. पण या भगवन्नामाचे माहात्म्य जाणणारे या जगात फार थोडे लोक असतात.

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥

भगवंताचे दर्शन करून देणारी अनेक साधने आहेत. पण त्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नामस्मरण हे साधन सुलभ आहे असे ज्ञानदेव आवर्जून सांगतात. कारण नामस्मरण कोणताही माणूस करू शकतो, त्याला स्थल-कालाची अट नाही, परिस्थितीची अनुकूलता हवीच असेही नसते, भगवंताचे नामच आरंभापासून अखेरपर्यंत मार्गदर्शन करते, नामस्मरणाने मनात सहज बदल घडून येतात, संसारात राहून नामस्मरण करता येते,  इतर साधने मीपणाने केलेली असतात. त्यांच्या मध्ये शरणागती कठीण जाते. नामस्मरणात आरंभच मुळी शरणागतीने होतो आणि महत्त्वाचे म्हणजे नाम- नामी अभेद! भगवंत त्याच्या नामाहून निराळा राहू शकत
नाही. म्हणून नाम घेणारा सतत भगवंताच्या संपर्कात असतो.

तरीही नामाला वाहून घेतलेला माणूस दुर्लभ असतो. कारण नामावर श्रद्धा कमी आणि माणसाला काहीतरी कष्ट करण्याची असलेली हौस! सर्वांनी या नामस्मरणाने आपले कल्याण करून घ्यावे म्हणून ज्ञानदेव सांगतात,

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ 
                                     

                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"