हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१४)

                      ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग १४.


नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी
रामकृष्ण वाचा अनंत  राशी तप । पापांचे कळप पळती पुढे ॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान
पाठभेदः सत्यामित= सत्यमित; पाहे दृष्टीं= नातळती,नाकळती; वाचा=उच्चार; पळती=जळती; निजस्थान=निज स्थान


 नामस्मरण करा हे सर्वच सांगतात. त्याचे परिणाम आणि अनुभवही वर्णन केले जातात. पण नामस्मरण किती, कसे आणि कुठे करावे हेही सांगायला हवेच की.

हा अभंग नामसाधनेच्या दृष्टीने म्हणूनच महत्वाचा ठरतो. नामस्मरणाची मर्यादा काय? तर अमर्याद नामस्मरण हीच त्याची मर्यादा! असे ज्ञानदेवांना ह्यातून सूचित करावयाचे आहे का ? सर्वसामान्य माणूस आणि मोक्षाची अपेक्षा धरणारे अशा दोघांनाही नामाची गोडी लागली तर दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. हेच ज्ञानदेवांनी ह्या अभंगातून सूचित केले आहे.


नामस्मरणाला नियमांचे बंधन अवश्य हवे. रोज नियमितपणे नामस्मरण केले तर हळूहळू त्याचे बीज अंतर्मनात खोल रुजू लागते. आपल्याही नकळत मग 'अमित' नामस्मरण आपण कधी करू लागतो हे आपल्यालाही कळत नाही. आपण नामस्मरण करतो असे म्हणण्यापेक्षा आपल्याकडून "नामस्मरण होते"असे म्हणणे अधिक उचित ठरेल.
"माझी मज झाली अनावर वाचा ।
छंद या नामाचा घेतलासे ॥"
असा सहज अनुभव नामधारकाला येऊ लागतो. रोज नियमितपणे २०-३० मिनिटे आपल्या सोयीनुसार एक निश्चित वेळ ठरवून जर नामस्मरण केले तर हळूहळू ते आपल्या बहिर्मनातून अंतर्मनात जाते. सवय लावणे हा बहिर्मनाचा प्रांत आहे; तर स्वभाव हा अंतर्मनाचा! एकदा का नाम अंतर्मनात गेले की साधकाचे काम झाले. मग अमर्याद नामस्मरण होणे ही प्रभूची कृपाच असते. नामस्मरण कसे करायचे हेही सद्गुरूंकडून शिकणे किंवा शक्य असेल तर सद्गुरूंच्या सहवासात शिकून घेणे यासारखी भाग्याची गोष्ट नाही. गुरुंची गरज आहे का? असा प्रश्न मनात येईलही. इथे एक किस्सा आठवतो. अंतिम वर्षाची अंतिम परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत वेळ जावा आणि व्यायामाची आवड होती म्हणून मी जवळच्या व्यायामशाळेत जाऊ लागलो. काही दिवस गेल्यानंतर एका गृहस्थांच्या शरीरसौष्ठवाबद्दल मला आकर्षण वाटून मी त्यांना विचारले की तुम्ही मला व्यायाम शिकवाल का? त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला,' तू काय करतोस?' म्हटलं,'३०० नमस्कार आणि ५०० बैठका काढतो.' लगेचच त्यांनी माझ्या शरीराकडे पाहिले आणि मला म्हणाले,'कसे काढतोस दाखव' मी त्यांना माझी पद्धत दाखवली. ते पाहून ते मला म्हणाले,'मी दाखवतो तसे ३ नमस्कार काढ. मी वाटेल ते शिकवेन.' मनात थोडी असूया निर्माण झाली. म्हटलं मी रोज ३०० काढतो. मला ३ जमणार नाही का? त्यांनी मला आव्हानच दिले. मी तयार झालो. खेदाने मला सांगावेसे वाटते की मी ३ सुद्धा पूर्ण करू शकलो नाही. त्यांनी मला उठवले आणि नमस्कार असा का करायचा हे समजावून सांगितले. मी त्यांच्या पद्धतीने व्यायाम केल्यानंतर माझ्या शरीरातील फरक मलाच जाणवू लागला. आरशात स्वतःचे trapezius,deltoid,triceps आणि latismus dorsi पाहणे हे सुखावह ठरू लागले. नामस्मरणाचेही असेच आहे. खरे सद्गुरू भेटले की नाम कसे,किती आणि का घ्यायचे हे कळू लागते. एकदा का नामाची गोडी लागली की ती कधी सुटत नाही. आपले जीवनच द्वैतावर अधिष्ठित आहे. त्यात सध्या'कलियुग' आहे म्हणे. रामदासस्वामींसारखे श्रेष्ठ नामधारकही आपली व्यथा मांडतात ती अशी,
"यथासांग रे कर्म तेही घडेना ।
घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना ।
दया पाहता सर्वांभूती असेना ।
फुकाचे मुखी नाम तेही वसेना ।"
असा हा कळीकाळाचा महिमा असूनही संत मात्र गर्जून सांगतात,
"काळाचिया सत्ता ते नाही घटिका । पंढरीनायका आठविता ॥
सदा काळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाही ॥"

तुकाराम महाराज तर आणखी एक पाऊल पुढे टाकतात आणि सांगतात'
"मरण माझे मरोनि गेले । मज केले अमर ॥" किंवा
"आपुले मरण पाहिले म्या डोळा । जाहला तो सोहळा अनुपम्य॥"
दुजेपणा आणि मृत्यूची भीती ह्या दोहोंचे मूळ आहे द्वैतबुद्धी. 'मी' जगापासून वेगळा झाला,देवापासूनही वेगळा झाला. कल्पनेच्या अधिष्ठानावर 'देहापुरता' सीमित झाला. त्यातून मी-माझे आले. पुढे ह्यातूनच मरणाचे भय वाटू लागले. नामस्मरणाने एकदा का भगवंताची कृपा झाली की साधकाला अनुभव येतो. तो असा...
"तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात । आम्ही या अतित देहाहूनि ॥"
देहापासून वेगळा झाला की मृत्यूचे तरी भय कसे राहील? साधकाला मूळ स्वरूपाचा साक्षात्कार होतो. ह्यातूनच मग...
"तुका म्हणे जे जे दिसे । ते ते वाटे मी ऐसे ॥" असे अनुभवाला आले की मग द्वेष तरी कुणाचा करायचा आणि भीती तरी कुणाची बाळगायची?


रामकृष्ण वाचा अनंत  राशी तप । पापांचे कळप पळती पुढे ॥

 एकदा का वाचेवर नामाचे अधिराज्य स्थापन झाले आणि नामस्मरण चिकाटीने करत राहिलो की तेच तपश्चर्येचे लक्षण आहे. पापाचे मूळ जरी स्वरूपाचा विसर असले तरी त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे विषयाकार वृत्ती. नामाने साधकाच्या अंतरात बदल घडला की वृत्तींच्या पाठोपाठ नाम जाऊ लागते आणि मग नकळत का होईना माणूस पापकर्मांपासून परावृत्त होतो. दुसरे म्हणजे नियमित नामाने भगवंताची गोडी निर्माण होवून वृत्ती विषयांपासून परावृत्त होवून नामाभिमूख होवू लागतात. माझ्या एका मित्राची गोष्ट.. त्याला चित्रपट पाहण्याचा खूप शौक होता. त्यामुळे तो अध्यात्म, परमार्थ इकडे वळत नसे. त्याला सद्गुरूंनी सांगितले,'मी तुला चित्रपट पाहू नको असे सांगत नाही. तू चित्रपट पाहा. पण नामस्मरण करणे सोडू नको'. त्याने हो म्हटले. चित्रपट सुरू होण्याआधी बातम्या / जाहिराती दाखवत असत. तेंव्हा आमचे नामस्मरण सुरू असे. हळूहळू चित्रपट पाहतानाही तेच घडू लागले. मनच जर चित्रपटाठायी स्थिर होत नव्हते तर मग चित्रपटाची गोडी तरी कशी लागणार? नंतर न सांगताच त्याचे चित्रपट पाहणे बंद झाले. ज्या संतांचा नामावर आणि त्याच्या अनुभूतीवर विश्वास आहे ते कधीही साधकाला काही सोडायला सांगत नाही. भगवंताची गोडी निर्माण झाली की वृत्ती भगवंताभोवतीच घुटमळू लागतात.


हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥


शैव / वैष्णव हा वाद करत बसायचे तर ज्ञानदेवांच्या हरिपाठात "शिवजप" न चुकता झाला आहे. ज्ञानदेवांची गुरूपरंपरा ( नाथसंप्रदाय)निवृत्तीनाथ<गहिनीनाथ<गोरक्षनाथ<मच्छींद्रनाथ आणि आदिनाथ शंकर अशी आहे. म्हणजे मूळस्वामीच जर रामनाम घेत असेल तर मग हा वाद कसा निर्माण झाला असावा? स्वतः भगवान शंकर नित्यमुक्त असूनही नामात रंगले होते तर मग साधकाला नामामुळे मोक्ष मिळणार नाही असे थोडेच आहे?


ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥


भगवान शंकरांनी जसे योगविद्या बाजूला ठेवून श्रद्धेने नामस्मरण केले अगदी तसेच ज्ञानदेवांनीही गुरूआज्ञा प्रमाण मानून नामस्मरण केले आणि स्वरूपापर्यंत पोहचले किंवा भगवंत प्राप्ती करून घेतली. भगवंताचे चरण हेच जीवाचे निजस्थान आहे. ह्या निजस्थानाला म्हणजे स्वरूपाला जीव विसरला आणि अखंड सुखाला आचवला. नित्य,सत्य आणि अमित नामस्मरणाने जीवाला स्वरूपाची प्राप्ती होते आणि अखंड आनंदाच्या सिंहासनावर तो विराजमान होतो.


म्हणूनच ज्ञानदेव सांगतात...


"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"


                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"