हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२०)

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # २०.


नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेली त्यांची॥
अनंत जन्माचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरिविण नेम नाही दुजा ॥


पाठभेदः हरिपाठीं= हरिपाठें, यज्ञयाग=योग


संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात,
'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जातीचा अभिमान ।
जो मज होय अनन्यशरण । तो जाण वैष्णव माझा ॥'
  
नामदेव महाराज लिहितात,
' नामा म्हणे नाम केशवाचे घेसी । तरीच वैष्णव होसी अरे जना '
तर ज्ञानदेव दुसऱ्या एका ठिकाणी वैष्णवांचे गुण गाताना लिहितात,
'नाम नीजधीर गर्जती वैष्णव वीर । कळीकाळ यमाचे भार पळाले तेथे ॥'
म्हणजे संतांना अपेक्षित असे वैष्णव तेच जे नामाच्या आनंदात दंग झालेले असतात. अशा वैष्णवांच्या संगतीत राहून मुखात नामाशिवाय आणखी काय येणार ?


ह्या अभंगावर चिंतन करताना सहजच एक विचार माझ्या मनात आला. अभंगाच्या पहिल्या ओवीत आधी नामसंकीर्तन असायला हवे की आधी वैष्णवांची जोडी? वैष्णवांच्या सहवासाची गोडी नामसंकीर्तनानेच अधिक आवडू लागते हे मात्र खरे आहे. कुणीतरी सांगितले म्हणून आपण नामस्मरण करू लागतो. पण नामाची गोडी, प्रेम हे केवळ वैष्णवांच्या संगतीनेच वाढू लागते.'जसा संग तसा रंग' किंवा 'जशी संगती तशी मती आणि तशी गती' हेही आपणास ठाऊक आहे.नामसंकीर्तन आणि वैष्णवांची जोडी ह्या दुग्धशर्करा योगाने अनंत कोटी पातके नाश पावतात. पाप ही संकल्पना अनेक वेळा याआधीही हरिपाठात ज्ञानदेवांनी मांडली आहे. पापांचे मूळ विकारांत आहे. विकारांचे मूळ आहे वासना तर वासनेचे मूळ देहभावात आहे. देहभावाचे कारण आहे स्वरूपाचा विसर. स्वरूपाच्या विसरात आपण कल्पनेतच जीवन व्यतीत करत असतो.नामाच्या अखंड संकीर्तनाने भगवत्कृपा होऊन नामधारकाची प्रज्ञा जागृत होते व त्याला आपल्या स्वरूपाची ओळख पटते‌. स्वरूपाचे भान झाल्याबरोबर साधकाचा देहभाव नष्ट होतो. त्याच्या पापवृक्षाच्या मुळावरच असा घाव घातल्यावर सर्व पापांचा नाश होणारच. आपण झोपेत असता आपल्याला एखादे वाईट स्वप्न पडले  तर आपण भीतीने किंचाळतो. जेव्हा आपण 'जागे' होतो तेंव्हा आपले शरीर घामाने चिंब झालेले असते. पण विचारांती आपल्याला त्यातील फोलपणा जाणवतो आणि आपण सहज सगळे विसरून जातो. आपण आपल्या स्वरूपाच्या ठायी जागे झालो की अनंत जन्मे आणि अनंत पापे ह्या सगळ्याचा आपल्याला सहजच विसर पडतो. कारण मुळातच हा सगळा स्वरूपाच्या विसरात घडलेला आपला कल्पनाविलासच असतो. 


अनंत जन्माचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥


परमार्थ किंवा अध्यात्माचे ध्येय आहे आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणे अथवा देवाचा साक्षात्कार. काहीतरी घडले आणि आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरलो. शास्त्रकार त्याचे कारण 'माया' असे देतात. माया म्हणजे reason unknown. वैद्यकीय क्षेत्रातही एखाद्या रोगाचे कारण माहीत नसेल तर idiopathic etiology असे लिहिण्याचा प्रघात आहे.परिणाम आहे तेथे कारण हे असलेच पाहिजे. कारण ज्ञात नसले तरी त्याचे परिणाम दिसत आहेतच. कारण काहीही असले तरी आता पुन्हा स्वरूपाची स्मृती होण्यासाठी भगवंताचे स्मरण हाच एक उपाय आहे. ह्यासाठी जे साधन हवे तेही सोपे आणि स्वतः सिद्ध हवे. नामाइतके सुलभ साधन नाही असा संतांचा अनुभव आहे. नामाचे महातप एवढे मोठे आहे की अनंत जन्म तप करून जी पुण्याई मिळते ती याच जन्मात नामाच्या संकीर्तनाने मिळते.नामाने जे पुण्य मिळते त्याला निवृत्तीनाथ शुद्ध पुण्य असे म्हणतात.
'नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचे शुद्ध पुण्य इये जनी ॥"
या शुद्ध पुण्याने नामधारकाला भगवंताचे प्रेमसुख अखंड भोगण्याचे भाग्य मिळते. नामाचे एवढे अलौकिक सामर्थ्य असूनही ते सर्व साधनांत सर्वच दृष्टीने अत्यंत सुलभ आहे. केंव्हाही, कोठेही नाम सहज चालू लागले की आपली आध्यात्मिक प्रगती उत्तम आहे असे समजायला हरकत नसावी.


योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥


जोपर्यंत कर्तेपणाचा अहंकार आहे, अभिमान आहे तोवर आपल्याकडून जे जे काही साधनामार्ग अवलंबिले जातात ते कोठेतरी कमी पडतात. भगवंत हा अनंत आहे,अमित आहे; तर साधनामार्ग हे सीमित  आणि मर्यादित आहेत असे जाणवते. ज्ञानयोग समजायला तेवढी सूक्ष्म बुद्धी हवी तर कर्मयोग आचरण्यासाठी उत्तम शरीरप्रकृती हवी. पण शेवटी ह्यांनाही काही मर्यादा पडतात. मर्यादित साधन अमर्यादित,अनंत अशा भगवंताला कसे साध्य करणार? पण नामस्मरणाने 'मी कर्ता आहे' ही जाणीव शून्यवत होते आणि माया लटकी पडते. सूर्योदय झाला की त्याच्या प्रकाशात चंद्र, तारे, चांदण्यांचा प्रकाश लयाला जातो. त्याचप्रमाणे हरिनामाच्या तेजाचा प्रकाश इतका मोठा आहे की त्या प्रकाशात इतर सर्व साधनांचा प्रकाश लयाला जातो. हरिनामापुढे इतर सर्व साधने निष्प्रभ ठरतात. खरं म्हणजे 'काहीच न करणे हेच करणे' परमार्थात करायचे असते.किंबहुना काही कर्म करून भगवंत प्राप्ती होते हा एक भ्रम आहे. म्हणूनच ज्ञानदेव शेवटच्या चरणात सांगतात,


ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरिविण नेम नाही दुजा ॥


गुरुकृपेने नामाचे हे अद्भुत सामर्थ्य कळल्यामुळेच ज्ञानदेव सांगतात की नामावाचून इतर कोणत्याही साधनांचा अवलंब न करण्याचा निश्चय केला आहे. कारण एकदा का नामात मन रमले की मन आवरण्याचे कष्ट करावे लागत नाहीत आणि नकळत ते पश्यंतीत प्रवेश करते आणि मग सतत भगवंताच्या भोवतीच घोटाळत राहते. यालाच अनुसंधान म्हणतात. नामस्मरणाचा महायोग जाणूनच ज्ञानदेव सर्वांना सांगतात,


"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥


याआधीचे
पुस्तक (अभंग १ ते १९)