ह्यासोबत
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा!
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#७)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#८)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#९)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#१०)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#११)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१७)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१८)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१९)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२०)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२१)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२७)... अंतिम
॥ श्रीसद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग # १०.
त्रिवेणीसंगमी नाना तीर्थें भ्रमी ॥ चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥
नामासी विन्मुख तो नर पापिया ॥ हरिविण धांवया न पावे कोणी ॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामे तिन्ही लोक उद्धरती ॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥
भिन्नपाठः जपा = जपे
गंगा,यमुना आणि सरस्वती ह्या तीन नद्यांचा संगम म्हणजे त्रिवेणीसंगम! तेच प्रयाग होय.
सर्वसामान्य माणूस हा आपल्या प्रपंचात इतका व्यस्त असतो की त्याला देवाचे स्मरण रोज ठेवणे अतिशय कठीण आहे. ह्याची जाणीव असल्यामुळे तिर्थधाम वगैरे ठिकाणी गेल्याने नकळत संतसज्जनांचा सहवास लाभून नामस्मरण घडेल, परमेश्वराचे चिंतन होईल आणि तीच शिदोरी घेऊन घरी आल्याने पुन्हा नव्या जोमाने तो ईश्वरचिंतनात आपला वेळ घालवू शकेल असे शास्त्रकर्त्यांना वाटले असावे. म्हणून हा मार्ग सुचवला असावा. त्याचबरोबर तिर्थांच्याठायी नितांत श्रद्धा असणेही तितकेच महत्वाचे आहे. सर्वसामान्यता अशी श्रद्धा क्वचितच दिसून येते. केवळ रूढी म्हणूनच तीर्थयात्रा केली जाते. अशा लोकांना तुकाराम महाराजांनी छानच चपराक ठेवून दिली आहे.
"तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ॥
तीर्थे भाव फळे । येथे अनाड ते वळे ॥"
पण बऱ्याचवेळा तीर्थक्षेत्र वगैरे हे पर्यटनक्षेत्र बनले जाते. वारीच्या निमित्ताने जरी गेले तरी आपला प्रपंच बरोबर घेऊन जायला विसरत नाहीत. मग इतक्या दूर जाऊनही मनात, गप्पांत आणि चर्चेत प्रापंचिक विचारच जर असतील तर मग प्रपंच बरोबर घेऊन फिरल्यासारखेच आहे ना? बऱ्याच वेळा आपण शेजाऱ्यांच्या तोंडून ऐकतोही... आम्ही की नाही ऽऽऽ शिर्डीला गेलो होतो. videocoach होता.. 'राम तेरी गंगा मैली' चित्रपट लावला होता. आम्ही अंताक्षरी खेळलो. काय धमाल केली. हॉटेलमध्येही छान व्यवस्था होती. अंघोळीला गरम पाणी, छान नाष्टा, जेवण.
अहो! हे सगळे तर आम्हाला घरीही मिळते की!! मग त्यासाठी का शिर्डीला जायला हवे?
साईबाबांबद्दल काही ऐकले का? तर नाही.
असेच इतर क्षेत्रांबाबतही होते. तीर्थयात्रेला गेल्याने दुसरा कसलाच व्याप नसल्याने साधकाला मनसोक्त नामस्मरण करण्याची संधी असते. त्याच्या हातून पुष्कळ नामस्मरण व्हावे हाच तीर्थयात्रेला जाण्याचा अंतस्थ हेतू असतो. पण जर नामावरच चित्त नसेल तर अशा तीर्थयात्रा करणे म्हणजे व्यर्थ क्षीण होय.
नामासी विन्मुख तो नर पापिया ॥ हरिविण धांवया न पावे कोणी ॥
ज्ञानदेव पुढे सांगतात की जो नामाला विन्मुख आहे, ज्याला नामाची आवड नाही, तो मनुष्य पापी आहे असे समजावे.'पाप ते विस्मरण' हे लक्षात घेतले तर पापांचे मूळ हे स्वरूपाच्या विस्मरणातून देहबुद्धीच्या अधिष्ठावर असलेल्या माणसाच्या स्वार्थामध्ये आणि बहिर्मुखपणात आहे. तो सुखासाठी दृश्यामध्ये आसक्त होतो आणि गुंतून राहतो. भगवंताच्या दर्शनाला ही आसक्तीच प्रतिबंध करते. ती अंतःकरणात खोलवर असते. भगवंताच्या नामाशिवाय तेथे इतर साधने पोचतच नाहीत. भगवंताच्या विसरात अंतरी असलेल्या सुखाच्या ठेव्यासच माणूस मुकतो. स्वतःच्या अंतरी सुख भोगता येत नाही; म्हणून माणूस सुखाचा शोध बाहेर घेण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांत ज्या व्यक्ती व वस्तू इंद्रियांना सुख देतात त्यांच्यामध्ये मन गुंतून जाते. त्यामुळे माणूस भगवंतापासून दूर दूर जातो. पाप क्षीण करणारे नाम घेण्याकडे प्रवृत्तीच होत नाही. म्हणून नाम न घेणारा मनुष्य पापी होय. विषयाची आसक्ती इतकी प्रचंड आहे की त्यातून सुटण्यासाठी मनुष्याचे प्रयत्न अपुरे पडतात. अशावेळी फक्त भगवंतच मदतीला धावून येतो. प्रपंचातील साध्या अडचणी सुटण्याकरिता तो धावून येतो असा गैरसमज बऱ्याच जणांचा असतो. संतांना हे अभिप्रेत नसते हे ध्यानात घ्यायला हवे.भवबंधनातून सुटण्यासाठी साधकाने उगीच भटकंती न करता नामस्मरणाने पुण्यसंचय करून आर्ततेने भगवंताला हाक मारावी.भक्ताची सुटका करण्यासाठी तो धावून येतो असेच संतांना अपेक्षित असते.
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामे तिन्ही लोक उद्धरती ॥
शास्त्रांमध्ये १४ लोक सांगितले आहेत. त्यातील ३ लोकांबद्दल अधिक उत्सुकता सामान्यांच्या मनात असते. ते म्हणजे..स्वर्ग, मृत्यू व पाताळ.
सद्गुरू श्री. वामनराव पै ह्यांच्या "ज्ञानेशांचा संदेश" ह्या ग्रंथातील खालील निरूपण मला सर्वाधिक समर्पक वाटते आणि आवडतेही. म्हणून जसेच्या तसेच देत आहे.
तीन लोक म्हणजे तीन अवस्था."अवस्थात्रय तिन्ही लोक" असा अर्थ ज्ञानेश्वरीत केला आहे. जागृती, स्वप्न व सुषुप्ति या तीन अवस्थेत जीवाची नांदणूक असते. या तीन अवस्थांच्या पलीकडे तुर्या अवस्थेत प्रवेश करून, त्या ठिकाणी स्थिर होऊन उन्मनी स्थिती प्राप्त करून घेतल्याविना जीवाचा खऱ्या अर्थाने उद्धार होत नाही. अखंड नामस्मरणाने ही स्थिती वाल्मिकी ऋषीने प्राप्त करून घेतली आणि आपला उद्धार करून घेतला. म्हणूनच तीनही लोक उद्धरून नेण्याचे, तीनही अवस्थांच्या पलीकडे नेण्याचे सामर्थ्य नामात आहे असे ते स्वानुभवाने सांगतात.
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥
या चरणाचा वाच्यार्थ उघडच आहे. पण हा अनुभवाला विरोधी आहे. संत शुद्ध असले तरी त्यांचे आप्त व पुत्र शुद्ध असतीलच असे नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात,
"संतांचे ते आप्त नव्हती संत"
म्हणून ज्ञानदेवांच्या या चरणातील "युक्तीची खोली"पाहण्याचा प्रयत्न करू. कुळ या शब्दाचा अर्थ गोकुळ. गो म्हणजे इंद्रिय व कुळ म्हणजे संघ. गोकुळ म्हणजे इंद्रियांचा संघ. ही इंद्रिये एकूण १४ आहेत. ५ कर्मेंद्रिये, ५ ज्ञानेंद्रिये आणि ४ अंतरेंद्रियें. या इंद्रियांची पूर्वपरंपरा अत्यंत अशुद्ध आहे. अखंड नामस्मरणाने ही परंपरा शुद्ध होते. उदा. डोळ्यांची पूर्वपरंपरा... सौंदर्य दिसले की बरे वाटणे व कुरूपता दिसली की वाईट वाटणे. मित्र दिसला की प्रेम वाटणे व शत्रू दिसला की द्वेष वाटणे इ. ही डोळ्यांची पूर्वपरंपरा आहे व ती अशुद्ध आहे. अखंड नामस्मरणाने 'आतमध्ये' जीवाचे रुपांतर देवात झाल्यावर नामधारकाला बाहेरही देवच दिसू लागतो.
"एका जनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभवीत ॥"
या अनुभवाच्या अधिष्ठानावर सुरूपता व कुरूपता ही एकाच तत्त्वाची दोन रूपे आहेत. शत्रू व मित्र हे दोन्ही एकाच देवाचे आकार आहेत असे प्रत्यक्ष दिसू लागल्यावर नामधारक हा देवाच्या एकत्वाची प्रचिती द्वंद्वातून सेवन करू लागतो. अशा रितीने डोळ्यांची पूर्वपरंपरा अखंड नामस्मरणाने शुद्ध होते. जी अवस्था डोळ्यांची तीच अवस्था इतर इंद्रियांची. द्वंद्वातून दुजेपणावर येणे, त्यामुळे सुख-दुःखाच्या हेलकाव्यावर मन अधिकच चंचल होणे व अंती जीवाचे भवबंधन अधिकच दृढ करणे ही सर्व इंद्रियांची अशुद्ध परंपरा आपोआप बदलते. शुद्ध होते. द्वंद्वातून दुजेपणावर जाण्याऐवजी नामधारक एकत्वावर येतो व एकत्वाचा भक्तिरस तो द्वंद्वातून सेवन करू लागतो. भगवन्नामाने ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त होते म्हणून ज्ञानदेव सांगतात,
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी"
"॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"