हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१२)

                      ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    


अभंग १२.


तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धी । वायाचि उपाधी करिसी जना ॥
भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळें । करतळीं आवळें तैसा हरि ॥
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझें हातीं ॥


देवाची प्राप्ती किंवा आत्मदर्शन हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय हे नक्की झाले की त्याच्या प्राप्तीचे मार्गही शोधावे लागतात. संतांना अभिप्रेत आहे तो नामस्मरणाचा मार्ग. नामस्मरण, भावस्मरण आणि अंतिमता देवदर्शन हे भक्तिमार्गातील सर्वसामान्य सांसारिकांना करायला सहज आणि सोपे मार्ग संतांना अभिप्रेत आहेत.चवथ्या अभंगात म्हटलेच आहे की भाव म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाबद्दलची श्रद्धा. "तो आहे" हे एकदा मनी ठसले की त्याचा आणि माझा संबंध काय हेही ओघाने आलेच. 'मी' देवाचे रूप आहे व देव 'मी' चे स्वरूप आहे, हा जो "मी व देव यांचा संबंध" त्या संबंधाला भाव असे म्हणतात. 'मी' रूपाने देवच देहात प्रगट आहे. भगवतगीतेच्या १८व्या अध्यायातील ६१व्या श्लोकाचे निरूपण करताना ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत लिहिलेच आहे,
अर्जुनपण न घेता । मी ऐसे पांडुसुता ॥
उठतसें तत्वतां । ते तयाचे रूप ॥
( ओवी १३१५)
 प्रकाशकिरण सूर्यापासून वेगळे करता येत नाहीत. त्याचप्रमाणे 'मी' देवापासून वेगळा करता येत नाही. हा भाव केवळ सद्गुरूबोधातूनच प्राप्त होतो आणि सद्गुरुकृपेनेच स्थिर होतो. भावाचे महत्त्व ज्ञानदेवांनी ह्याआधीही हरिपाठात विशद केले आहे.
'भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति । बळेविण शक्ति बोलू नये ॥' ( अभंग ४ )
'भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥' ( अभंग ५ )
एकदा का सद्गुरुकृपेने आत्मबोध झाला की साधक स्वतःच म्हणतो,
'गुंतलो होतो अर्जुनगुणें । तो मुक्त जालों तुझेपणें ।
आतां पुसणें सांगणें । दोन्हीं नाही ॥
(१६६३,ज्ञानेश्वरी)
मी तुझेनि प्रसादें । लाधलेनि आत्मबोधें ।
नोहाचे तया कांदे । नेदीच उरें ॥
(१६६४,ज्ञानेश्वरी)


ह्या भावाची कळी उमलली की प्रभूचे चरणकमळ तेथेच साकार होतात. ह्या भावाचे बळ वाढविणे हाच भक्तीचा हेतू आहे.


ह्या भावाशिवाय साधकाचे मन देवाजवळ स्थिर होत नाही. तसे स्थिर मन नसेल तर त्याच्या जीवनात अध्यात्माचा स्पर्श झाला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. किंबहुना ती त्याची स्वतःचीच फसवणूक केल्यासारखे होईल. अशा फसलेल्या अवस्थेत जर काही तीर्थ, व्रत किंवा नेम केले तर केवळ उपाधी केल्यासारखेच आहे. त्यातून साधकाच्या वाट्याला केवळ कष्टच पडतात. म्हणून चवथ्या अभंगात 'बळेविण शक्ति बोलू नये' असे सांगायला ज्ञानदेव कचरत नाहीत. हे बळ म्हणजेच 'भावबळ'!


भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळें । करतळीं आवळें तैसा हरि ॥
 
देवाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी बरेच साधक बरेच प्रयत्न करतात. साधना करतात. पण मुळात देवाची ओळख नसेल, त्याचा आणि आपला संबंध माहीत नसेल तर सारे व्यर्थ आहे. दृश्य जग म्हणजे विकार, वासनांचे बंधन आहे. त्याचा त्याग केला पाहिजे. अशा (गैर)समजुतीमुळे बरेच जण त्यागाच्या नावाखाली देवासाठी प्रपंच सोडून संन्यास घेतात. पण 'मी आणि माझेपण । विसरले जयाचे अंतःकरण । पार्था तो संन्यासी । जाण निरंतर ॥' हे सोडून ते सगळे करतात.अंतिमता फसतात आणि 'ना प्रपंच,ना परमार्थ । तुका दोहीकडे चोर' अशी त्यांची स्थिती होते. जर का सद्गुरुकृपेने आत्मबोध झाला तर भावाच्या बळावर तोच  साधक देवाला साक्षात पाहू शकतो. हा भाव नसेल तर देवाच्या प्राप्तीसाठी केलेली इतर साधने म्हणजे पडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याचे व्यर्थ प्रयत्न होत.ह्यावर विचार करत असता माझ्या मनात सहजच याज्ञवल्क्य ऋषींचे एक वाक्य आठवले... माणूस स्वतः स्वतःवरच प्रेम करत असतो. त्याचे प्रक्षेपण फक्त बाहेर करतो. ते कधी माणसांत असेल किंवा विषयांत असेल. तसेच काहीसे देवाच्या भक्तीतही होते. जीवाचे स्वतःवरील प्रेम सूक्ष्मातून दृश्यावर घसरले. ह्या प्रक्रियेत ते देवापासून वेगळे झाले आणि द्वैत निर्माण झाले. हेच विखुरलेले प्रेम गोळा करून देवाच्या चरणी केंद्रित करणे इतके सोपे नाही. ज्याने जमिनीवर पडलेला पारा गोळा करण्याचे प्रयत्न केले असतील त्यालाच ह्यातील कठिणता लक्षात येईल.


पारियाचा रवा घेता भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥


इथे भूती भगवंत कसा? ह्याचा विचार करताना "पारा"हून मला सहज आठवले. काही वर्षांपूर्वी आपले दात किडले की आपण डेंटिस्ट कडे जात असू. किडलेल्या दातात चांदी भरत असत. आजही चांदी भरली जाते. पण cosmetic dentistry मुळे त्याची जागा composite fillings ने घेतली जी दातांच्या रंगांसारखीच असते. चांदी म्हणजे नेमके काय असते? तर चांदी, तांबे,टिन आणि झिंक ह्या धातूंची पावडर आणि पारा ह्यांचे मिश्रण ज्याला silver amalgam म्हणतात. चांदीचा रंग असतो आणि पाऱ्याला स्वतःचा आकार नसतो म्हणून म्हणायचे चांदी भरली. पण पाऱ्यामुळेच बाकी धातू एकत्र धरून ठेवले जातात आणि टिकू शकतात. तसेच काहीसे देवाबद्दल असते असे एका डेंटिस्टच्या नजरेने देव ह्या संकल्पनेकडे पाहिले तर जाणवेल. परमेश्वराला स्वतःचा आकार नाही. पण पंचमहाभुतांबरोबर त्याचे amalgamation झाले की तोच आकाराला येतो. त्याच्याच आधाराने जगाला अस्तित्व आहे. त्याच्यामुळे आपण विषयांतून सुख अनुभवतो. पण म्हणतो काय? जग आहे. विषयांत सुख आहे. परमेश्वर कुणी पाहिलाय? त्याला retired करायला हवे. ह्या अंगाने जर परमेश्वराकडे पाहिले तर ह्या ओवीतून एक नवीन अर्थ सापडल्याचा आनंद होतो. ज्ञानदेवांच्या वेळी डेंटिस्ट नव्हते हे मलाही माहीत आहे. सहज किडलेला दात आठवला, विचार मनात आला आणि लिहिले.

पण मग देवाला प्राप्त तरी कसे करायचे? संत मायबाप आणि सद्गुरूमाऊली आपल्या लेकरांना असे अनाथ किंवा असहाय नाही होऊ देत. म्हणून तर ते साधकांना नाम देतात.देवाइतकेच सूक्ष्म असणारे नामस्मरणासारखे साधन साधकाच्या जिव्हेवर नांदू लागले, मन नामामध्ये रंगू लागले की स्वतःमध्येच भगवंत असण्याचा अनुभव सद्गुरुकृपेने साधक घेऊ लागतो. आणि मग ज्ञानदेवांसारखा सत्शिष्य म्हणतो,


ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझें हातीं ॥


परब्रह्माचे निर्गुण स्वरूप आकळण्याच्या पलीकडे आहे. पण माझ्या सद्गुरूरायाने-श्री. निवृत्तीनाथांनी- त्या परब्रह्म निर्गुण स्वरूपाला नामरूपाने सगुण करून ते मोठ्या कृपेने माझ्या स्वाधीन केले. ज्ञानदेवांना नामाचे वर्म समजले, नामाची गोडी लागली आणि त्या नामाचा अखंड जप करता करता अंतःकरणात एक दिव्य ज्ञानज्योत उजळली. भगवन्नाम हा नुसता शब्द नसून साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्मच नामरूपाने संपूर्ण सगुण आहे.
"नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ । परब्रह्म केवळ रामनाम ॥"
 


म्हणूनच ज्ञानदेव आवर्जून सांगतात...


"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"


                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"