हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#२)

                          ॥ सद्गुरूनाथाय नमः ॥


अभंग # २
चहू वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण । अठराही पुराणे हरिसी गाती ॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥
एक हरि आत्मा जीवशिवसमा । वाया तूं दुर्गमा न घाली मन ॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥


पाठभेदः
१. षट्शास्त्री = साही शास्त्रीं, २. जीवशिवसमा = जीवशिवसम


कोणताही शास्त्रज्ञ एखादे संशोधन सुरू करतो तेंव्हा त्याचे स्वतःचे एक hypothesis असते. त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच तो आपल्या संशोधनाला सुरुवात करतो. रात्रंदिवस वाचन,प्रयोग, मनन आणि निदिध्यासन ह्या अभ्यासप्रक्रियांचा आधार घेत तो कार्यरत राहतो. अंतिमता आपल्या hypothesisला बळकटी देणाऱ्या निष्कर्षाप्रत तो पोहचतो. निष्कर्षातून विश्वास प्रगट होतो. मानवी जीवनातील सर्वोत्तम मूल्य "आत्मज्ञान किंवा भगवंताचे दर्शन करून घेणे हे असून ते नामस्मरणाने शक्य आहे" हे ज्ञानदेवांचे hypothesis आहे; ज्याचा शेवट " समाधी संजीवन हरिपाठ" ह्यात आहे असे एकंदरीत हरिपाठ वाचल्यावर वाटते.
              hypothesis मांडल्यानंतर आपल्या hypothesis पुष्ट्यर्थ literature review देण्याची प्रथा शास्त्रीय लेख लिहिताना आढळते. हरिपाठातही ज्ञानदेव ही प्रथा सांभाळण्याचे भान ठेवतात.आपल्या hypothesis पुष्ठ्यर्थ तेही literature review देतात. भारतीय अध्यात्मशास्त्र अगदी वेदकाळापासून मानवी जीवनातील सर्वोत्तम मूल्यांचा विचार करताना आढळते. चार वेदांचे मंत्र, त्यांचे ब्राह्मणग्रंथ, आरण्यकें आणि उपनिषदे मिळून वैदिक वाड्मय तयार होते. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमिमांसा आणि उत्तरमिमांसा किंवा वेदांत ही सहा दर्शनशास्त्रें आहेत. असंख्य पुराणातून (जी १०८च्या वर असून) ब्रह्मपुराण,विष्णुपुराण, पद्मपुराण, भागवत इत्यादी अठरा पुराणें अधिक प्रचलित आणि मान्य आहेत.ह्या सर्व अफाट वाड्मयामध्ये आत्मज्ञान अथवा भगवंताचे दर्शन हेच मानवी जीवनातील सर्वोत्तम मूल्य मानलेलें आढळते.
       वेदांच्या जाणण्याचा विषयही तोच ( हरी ) आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे कारण शोधण्याचा षट्शास्त्रे प्रयत्न करतात. वस्तुतः आणि तत्वत्तः श्रीहरीच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. म्हणूनच षट्शास्त्राच्या निर्मितीला कारणही तोच आहे. अठराही पुराणांतून हरीचेच गुणवर्णन आहे. अध्यात्मशास्त्राच्या सिद्धांत आणि साधना ह्या दोन्ही अंगांचे वर्णन वेद आणि शास्त्रांमध्ये आढळते. पण ते एकमेकांत बरेचसे मिसळलेले आढळते. शिवाय त्यांत पुष्कळ अवांतर गोष्टी वर्णन केलेल्या असतात. अशावेळी सारासार विचार वापरून आपल्या साधनेला ज्या गोष्टी उपयोगी नाहीत त्या व्यर्थ समजून त्याच्या मार्गाला जाऊ नये. त्यांच्या नादीं लागू नये. 
"मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥"
        दुसऱ्या अभंगातील ही ओवी मला अतिशय आवडते.कारण ह्या एका ओवीतच ज्ञानदेव ज्ञानमार्ग (सिद्धांत) आणि साधनामार्ग ह्यातील नेमके काय घ्यायचे हे साधकाला समजावून देत आहेत. सिद्धांताच्या भागातून भगवंत  आणि साधना मार्गातून नामस्मरण घ्यावे. साधनेच्या अंगाने सद्गुरू श्री. वामनराव पै "ज्ञानेशांचा संदेश"ह्या ग्रंथात लिहितात... मंथनाने दह्यात विखुरलेले लोण्याचे कण एकत्र आणले जातात व नंतर त्याचाच एक लोण्याचा गोळा तयार होतो. त्याचप्रमाणे ज्ञानरुप जीवाचे आनंद हे स्वरूप आहे. ज्ञानात आनंद विखुरलेला आहे. म्हणून तो जीवाला अव्यक्त आहे व त्याचा भोग न मिळाल्यामुळे जीव अतृप्त असतो.ज्ञानरुप जीवाने या आनंद स्वरूपात स्वतःला समाधीच्याद्वारे विरवून घेणे हा मुक्तिसुखाचा मार्ग, तर नामसंकीर्तनाच्या द्वारे आनंदस्वरुपाला ज्ञानरुपात व्यक्त करणे हा भक्तिसुखाचा प्रकार. हरि म्हणजे आनंद असे एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठात सांगितले आहे.
"सत्पद ते ब्रह्म,चित्पद ते माया । आनंदपद हरि म्हणती जया ॥"
तुकाराम महाराजही वेदांचे सार "नाम" हेच आहे असे सांगतात आणि नामस्मरण साधनेचाच घोष करतात.
"वेद अनंत  बोलिला । अर्थ इतुकाची साधला ॥
विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम घ्यावे ॥
सकळ शास्त्रांचा
 विचार । अंती इतुकाची निर्धार ॥
अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत॥ "
                       किंवा
"चारी वेद जयासाठी । त्याचे नाव धरा कंठी ॥
न करी आणिक साधन । कष्टसी का वायांविण ॥
अठरा पुराणाचे पोटी । नामाविण नाही गोठी ॥
तुका म्हणे सार धरी । वाचे हरिनाम उच्चारी ॥"

अगदी शेवटी नामस्मरणातून आलेल्या आत्मानुभूतीतून ते सांगून जातात...
"वेदांचा अर्थ आम्हासी पुसावा । येरांनी व्हावा भार व्यर्थ॥"
त्यांना समकालीन असणारे रामदास स्वामीही साधकाला हाच उपदेश करतात.
"नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी । चढे गर्व ताठा अभिमान पोटी ॥
घडे कर्म खोटे बहू हा दगा रे । हरे राम हा मंत्र सोपा रे॥ "
दासगणू महाराज रचीत "गजानन विजय" ह्या गजानन महाराजांच्या चरित्रवजा पोथीत त्यांचे शिष्य श्री. श्रीधर गोविंद काळे ह्यांनाही असाच उपदेश गजानन महाराजांनी केलेला दिसतो. 
"या भौतिकशास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असे ॥
योगशास्त्राहून अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥
तो जमल्यास करूनी पाही । कोठे न आता जाई येई ॥
" (अध्याय १५ ओवी १३०-१३१)
"एक हरि आत्मा जीवशिव समा । वाया तू दुर्गमा न घाली मन ॥" 


       ही ओवी वाचताना, सर्वसामान्य साधकाला सन्मार्गाला (म्हणजे भक्तिमार्गाला,जो सहज आणि सोपा आहे) प्रवृत्त करण्याचे,वैष्णव आणि शैव पंथिय ह्यांना विचारात घेऊन त्यांच्यातच ऐक्य साधण्याचे ज्ञानदेवांचे प्रयत्न असल्याचे जाणवते. शैव आणि वैष्णव पंथिय ह्यांच्यातील वाद आपणास ज्ञात असेलच. अगदी दृश्य स्वरूप म्हणजे एका पंथाचे अनुयायी कपाळाला आडवा गंध लावतात; तर दुसऱ्या पंथाचे अनुयायी उभा गंध लावतात. प्रत्येकाची भगवंत प्राप्तीची साधना भिन्न आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी हे सविस्तर सांगितले आहे. एकदा का आत्मतत्त्व साधकाच्या हाती आले की मग शिव, हरी आणि जीव हे सगळे एकच(आत्मा) आहे हे त्याला अनुभवता येते. तसेच साधक  शब्दज्ञानात शिरला की आपण मोठे ज्ञानी आहोत असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण होतो.याचा परिणाम इतका विपरित होतो की त्या साधकाला परमार्थ सिद्धी तर नाहीच प्राप्त होत पण त्याची अधोगती मात्र होते.
"नाश केला शब्दज्ञाने । अर्थे लोपली पुराणे ॥"
दुसरे कारण म्हणजे तत्त्वज्ञानांत सांगितलेले अंतिम सिद्धांत हे खऱ्या अर्थाने समजूच शकत नाही. कारण ते बुद्धीच्या 'पलीकडले' असतात. ते अंतिम सिद्धांत समजून घेण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे अनुभव. हा अनुभव साधकाला ईश्वरीकृपेने किंवा सद्गुरूकृपेनेच शक्य आहे. साधक जर अखंड नामात रंगला तरच ह्यांची कृपा सहज होत असते.
           म्हणूनच साधकाने शब्दज्ञानात, शब्दजालात आणि इतर साधनामार्गात स्वतःला अडकवून ने घेता अखंड नामस्मरणाचाच अभ्यास करावा असा ज्ञानदेव महाराज त्याला उपदेश करतात. ज्ञानदेवांचाच अनुभव आहे....
"ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥"
हरिपाठाच्या म्हणजेच अखंड नामस्मरणाच्या प्रभावाने दृष्टी हरिरूप झाली व सर्वत्र हरिच घनदाट भरलेला दिसत आहे. हा भूलोकच त्यांना वैकुंठासमान वाटतो. ज्ञानी म्हणतात "सर्वम् खल्विदम् ब्रह्म" आणि नामधारक भक्त म्हणतात "भरला घनदाट हरि दिसे" ह्या दोन सिद्धान्तात काय फरक आहे? मला तरी काहीच दिसत नाही. ज्ञानदेव म्हणतात ते सत्य, भक्तिमार्ग आणि नामस्मरणसाधना, स्वीकारण्याशिवाय नामधारकाला काही पर्याय नाही. म्हणूनच ज्ञानदेवांचा उपदेश...
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
साधकाने का स्वीकारू नये ??


                        ॥ श्री. सद्गुरुचरणी समर्पित ॥