हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२६)

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # २६.


एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥
नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥


पाठभेदः  जपे = जपा


हरिपाठाला सुरुवात केली तेंव्हा पहिल्याच अभंगात ज्ञानदेव सांगतात,"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥" आणि आता हरिपाठाचा उत्तरार्ध जवळ आला असता ते सांगतात,"एकतत्त्व नाम दृढ धरी मना." आपल्याही नकळत हरिनाम मुखातून मनापर्यंत पोहचले. नामधारक अंतर्मुख झाल्याची ही खूण आहे.


           सुरुवातीला नाम हे साधन आहे नामधारकाचे. पण नाम घेता घेता अनुभव हा येऊ लागला की नाम हेच तत्त्व आहे. 'नाम-नामी अभेद' हा संतांचाही अनुभव आहे. नाम हे परब्रह्माचे शुद्ध स्फुरण आहे. भगवन्नाम आकाराला येण्यासाठी स्वस्वरूपात शुद्ध स्फुरण व्हावे लागते व यासाठी आत्मतत्त्वाला आपल्याच अंगी असणाऱ्या शक्तीचा आलंब घ्यावा लागतो. लाट ही पाण्याचे स्फुरण असल्यामुळे ती अंतर्बाह्य पाणीरूप आहे. त्याचप्रमाणे नाम हे परब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे स्फुरण असून ते ब्रह्मरूप आहे. भगवंताचे ते अतिसूक्ष्म रूप आहे. म्हणूनच सर्व संतांनी नामाचा अनुभव घेऊन ते तत्त्वरूप-चैतन्यरूप-ब्रह्मरूप आहे असे जगाला हाकारून सांगितले.
नामा म्हणे नाम आठवा अवतार । पूर्णब्रह्म साचार कृष्णरूप ॥
नाम ते ब्रह्म नाम ते ब्रह्म । नामापाशी नाही कर्म विकर्म ॥


 हे मना ! तू जर दृढतापूर्वक नाम धरलेस तर हरिला करुणा येणारच. ज्ञानदेवांनी येथे 'दया' हा शब्द का वापरला नाही ह्याचा मी विचार करत होतो. दया आणि करुणा हे शब्द बऱ्याच वेळा आपण समानार्थी वापरतो. मी, ह्या दोन शब्दांमध्ये, थोडा फरक करतो. आपण 'दयेची भीक' मागतो. पण कधी करुणेची भीक मागतो का? बाह्यता जरी समान दिसले तरी त्यामागील भाव वेगळा असावा असे वाटते. 'दया' ह्या भावात उपकाराची छटा असते तर 'करूणा' मध्ये आपलेपणाची.  'दया' दाखवताना आपण ती इतर कुणालातरी दाखवत असतो. 'करुणा' मात्र आपल्या जवळच्या कुणाबद्दल तरी वाटते आपल्याला. आईच्या ठायी आपल्या लेकराबद्दल असते ती करुणा आणि इतरांबद्दल असते ती दया. मन हे त्या परब्रह्माचाच अंश आहे असे तर नाही ना ज्ञानदेवांना सुचवायचे?


तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥


नाम हे सुलभ आहे, सहज आहे, सोपेही आहे. तरी सामान्यता माणूस ते घेत नाही. हे साऱ्या संतांचेच दुःख आहे. नाम कसेही घेतले तरी ते फळते हे जरी खरे असले तरी सद्गदित अंतःकरणाने नामाचा जप केल्यास ते त्वरित फळते. असा नापजप होण्यासाठी नामाचे स्वरूप आणि त्याचा महिमा समजला पाहिजे. हे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. म्हणूनच संत एकमुखाने सद्गुरूमहिमा गातात.
'सद्गुरूवाचोनि नाम न ये हाता । साधनें साधिता कोटी जाणा ॥'
'संतांसी शरण गेलियावांचोनि । एका जनार्दनी न कळे नाम ॥'
नामाच्या रूपाने प्रभू आपल्याजवळ आहे. नामस्मरणाने भगवत्कृपा होऊन तो आपला सर्वप्रकारे योगक्षेम वाहतो हे नामाचे वर्म लक्षात ठेवून नामजप करणे म्हणजेच सद्गदित अंतःकरणाने जप करणे होय.


नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥


नाम हे साधन न राहता एक तत्त्वच आहे हे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगत आहेत. ज्ञानेश्वरीतही ज्ञानदेव १०व्या अध्यायात लिहितात,
अशेषांही वाचा । आंतु नटनाच सत्याचा ।
तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥

समस्तांही यज्ञांचा पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं ।
जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥ २३२ ॥

नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्‍नानादि कर्म ।
नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥

आपला (जीवनातील) अनुभव हा आहे की साधनाच्या अंगाने जाता साध्य पदरात पडते आणि मग साधन संपते. नामाच्याबाबतीत मात्र असे होत नाही. नाम घेणारा 'मी' आणि ज्याचे नाम घेतो तो 'भगवंत' ह्यांचे अद्वैत असते. म्हणून नाम घेता घेता 'मी' भगवंतामध्ये विलीन होतो आणि अखेर नामच शिल्लक उरते. अशी प्रचिती येण्यासाठी मात्र धीर हवा. धीर नसेल तर उतावळेपणाने साधक दृश्यातील प्रचितीच्या मागे जातो. इतर मार्गांत थोडी साधना झाली की छोट्या-मोठ्या प्रचिती येतात आणि साधक त्यांच्याच नाही लागतो. असे घडू नये म्हणून ज्ञानदेव नामधारकांना धोक्याचा इशाराच देत आहेत. नामाचे अंतिम ध्येय काय असावे आणि अनुभूती काय असावी हे पुढच्याच ओवीतून ते स्पष्ट करतात.


ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥


संत कबीरांचा नामस्मरणाबाबतचा अनुभव त्यांनीच शब्दबद्ध केला आहे तो असा..
"राम हमारा जप करे । हम बैठे आराम ॥"
आणि आता ज्ञानदेवही त्यांचा अनुभव शब्दबद्ध करतात तो "ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥" असा. ह्या दोन्ही संतांचा / नामधारकांचा अंतरीचा अनुभव हा एकच होता हे आपल्या ध्यानात येईल. प्रामाणिकपणे, अखंड आणि निष्ठापूर्वक मुखाने हरी हरी म्हणता साधकाला शेवटी वरील अनुभव येतोच.


सर्वसामान्यता साधक वैखरी, मध्यमा आणि पश्यंती ह्या वाणीतच जप करतो. त्याच्याही पलीकडे असते ती परावाणी. परावाणीत चालणारा जप हा स्फुरद्रुप असतो. हा जप करावा लागत नाही. तर केवळ ईश्वरी कृपा किंवा सद्गुरूकृपा झाली तरच असा जप नामधारकाच्या अंतरी चालतो. संत तुकाराम महाराजांसारखा अखंड जप आपण करू शकत नाही. मग ईश्वरी कृपेची अपेक्षा आपण कशी करावी? मात्र असाच अनुभव सद्गुरू आपणाला देऊ शकतात. किंबहुना असा अनुभव साधकाला देऊन त्याच्या साधनेची दिशा नक्की करतात तेच खरे सद्गुरू!  ईश्वरी कृपेने परावाणी उघडली की नामधारकाला असा अनुभव येतो की नामजप प्रत्यक्ष न करताही अंतरात नामजप आपोआप चालू आहे. परावाणी उघडल्यावर 'देव' जप करतो आणि 'मी' तो आरामात बसून ऐकतो असा अनुभव नामधारकाला येतो. असा अनुभव नामस्मरणाच्या थोड्या अभ्यासाने मिळत नाही. त्यासाठी अट्टहासाने अखंड नामस्मरण करीत राहावे लागते. म्हणूनच ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगतात...


 


हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥


ह्याआधीचे अभंग