हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#५)

                      ॥
श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # ५.
योगयागविधी येणे नोहें सिद्धी । वायाची उपाधि दंभधर्म ॥
भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरूविण अनुभव कैसा कळे ॥
तपेंविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥

पाठभेदः कळे निःसंदेह=तुटे संदेह ,सांगात

ज्ञानदेवांनी हरिपाठ लिहिला आहे तो संसारात राहून भगवतप्राप्तीची इच्छा असलेल्या संसारी माणसांसाठीच. "असोनी संसारी जिव्हे वेगु करी" नामस्मरण केल्याने  "समाधी संजीवन"
प्राप्त करून घेता येते हे त्यांना सांगायचे आहे. ते स्वतः योगमार्गात
प्रवीण असावेत हे ज्ञानेश्वरीतील ६व्या अध्यायातून कळतेच. नव्हे! ते तर
"योगिराज"होते असे इतर संतांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे. योगमार्गातील
अडचणी त्यांना ठाऊक होत्या. संसारी माणसांना हा मार्ग सोयीचा नाही हे
त्यांना कळत होते. ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात ते लिहितात,
"नाहीतरी योग । साधन जे होय ॥
सर्वही ते काय । अप्रमाण ॥
परी अभ्यासाची । गाठावया तड ॥
आपणासी जड । ऐसे म्हण ॥"
मनाच्या सामर्थ्याची त्यांना जाणही आहेच. म्हणून ते त्याच अध्यायात लिहितात,
"पार्था जरी होय । अंगी योगबळ ॥
त्यापुढे चपळ । मन किती ॥"
इतर संतांनीही सर्वसामान्य साधकाला बजाविले आहेच,
"योग मार्ग धरू नका ।कष्ट उरतील जे का ॥
कर्मधर्म नव्हती सांग । उण्या अंगे पतन ॥
अष्टांगयोग
साधनेत जी बाह्य अंगे आहेत ती म्हणजे यम ( अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह),नियम(अंतर्बाह्य शुचिता,संतोष,तप,अभ्यास आणि परमेशपूजन), आसन ( सहज आणि स्थिर अशी बैठक),प्राणायाम ( प्राणवायूच्या गतीचे नियमन). हीच सर्वसामान्य संसारीजणांना करण्यास कठीण असतात. खरी आंतरिक साधना सुरू होते ती प्रत्याहार( इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्यांची स्थापना करणे) पासून. हळूहळू धारणा,ध्यान आणि मग समाधि असा
हा प्रवास आहे.समाधीतून योग्याला काही शक्ती प्राप्त होतात. त्यांचा मोह
टाळणे अतिशय कठीण असते.त्यामुळे जगांत मोठेपणा येतो. पण ह्यापायी असे साधक
योगभ्रष्ट होतात. प्रसिद्धीचा परिणाम दंभधर्मात होऊन साधक शेवटी अधोगतीला
जातात.  याग म्हणजे यज्ञ. प्राचीन वेदग्रंथ आणि धर्मशास्त्रांत अनेक
यज्ञ सांगितले आहेत. त्यामधील कर्मकांड अतिशय गुंतागुंतीचे आणि खर्चिक
असते. बहुतेक यज्ञांचे ध्येय हे स्वर्गप्राप्ती हेच असते. पण पुण्यसंचय
संपला की त्याला परत यावेच लागते.ज्ञानेश्वरीत ज्ञानदेव लिहितात,
"स्वर्गात पुण्यात्मके पापे येईजे । पापात्मके पापे नरकात जाईजे ॥
मग माते जेणे पाविजे । ते 
शुद्ध पुण्य ॥"

ही अध्यात्मसिद्धी जर योग,याग आणि विधीने
प्राप्त होणार नाही तर मग कशाने होईल? हा प्रश्न सहजच मनात निर्माण होईल.
त्याचे उत्तर ज्ञानदेव देतात.
"भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरूविण अनुभव कैसा कळे॥
हरिपाठात चौथ्या अभंगात भावाचे महत्त्व ज्ञानदेवांनी विशद
केले आहे. भावाशिवाय भक्ती नाही हे त्या अभंगात सांगितले. तर पाचव्या
अभंगात एक पायरी पुढे जाऊन ते सांगतात की भावाशिवाय देव कळणारच नाही. पण
त्याचा अनुभव मात्र फक्त श्रीगुरूच देऊ शकतात हे निर्विवाद सत्यही ते
सांगून जातात. देव आहे असे सगळेच सांगतात. पण त्यांच्या म्हणण्याचा खरा
अर्थ त्यांनाच कळत नाही. कोणीतरी सांगितले म्हणून ते पुढे चालत आलेले असते
इतकेच. पण स्वतःला प्रचिती मात्र काहीच नसते. केवळ सद्गुरू हेच असे
असतात जे साधकाच्या मनातील संशय दूर करून देवाच्या अस्तित्वाबद्दल साधकाला
खात्री करून देतात. देवाची प्रचिती साधकाच्या अंतर्यामी परिवर्तन घडवून
आणण्यात पाहायची असते. हे सद्गुरूच समजावून देतात.

तपेवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ॥" 

तप म्हणजे
तपश्चर्या! ध्येय साध्य होईपर्यंत चिकाटीने कष्ट सहन करीत साधनाचा आलंब
घेणे म्हणजे तपश्चर्या ! देवाचे दर्शन हे सर्वोत्तम मानवी ध्येय आहे हे
एकदा नक्की झाले की त्याच्या प्राप्तीसाठी जे करायचे ती तपश्चर्या!
त्याशिवाय दैवत नाही. हरिपाठात साधन आहे ते देवाचे नाम! त्याचा अभ्यास
करण्यासाठी, ते अखंड होण्यासाठी देवाची अथवा सद्गुरूंची कृपा हवीच. पण
काही दिल्याशिवाय हवे ते मिळत नाही हा आपला रोजचा अनुभव आहे. परमार्थात
ह्या देण्यालाच त्याग असेही संबोधतात. पण खरा त्याग आहे तो  "कर्तेपणाचा अभिमान"किंवा "मी"पणाचा!
ह्या
सूक्ष्म त्यागाचे महत्त्व आणि मर्म कळण्यास शुद्ध भावनेने सद्गुरूंनाच शरण
गेले पाहिजे. आपले अंतःकरण मोकळे करून दिले की सद्गुरू आपल्याला
परमार्थातील गूज उघडे करून सांगतात. त्यामार्गाने गेले तर साधकाचे हित
म्हणजे देवाची प्राप्ती फार दूर नाही.
वरील ओव्यांमध्ये एका
गोष्टीशिवाय दुसरी संभवत नाही असे निदर्शनास येते. त्याचप्रमाणे साधूची
संगती प्राप्त झाल्याशिवाय अध्यात्मसिद्धी प्राप्त होणे शक्य नाही.
"ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥"

याचे कारण असे की ज्या हरिनामाने साधकाला
प्रत्यक्ष हरिची प्राप्ती होते ते हरिनाम संतसंगती शिवाय मिळत नाही आणि
मिळाले तरी टिकत नाही.म्हणूनच ज्ञानदेव पाचव्या अभंगाच्या शेवटी निक्षून
सांगतात
"साधूचे संगती तरणोपाय ॥" सद्गुरू
साधकाला जे नाम देतात त्याला 'सबीज' नाम असे म्हणतात. ते नाम ज्या
देवासंबंधी असते त्याची प्रत्यक्ष ओळख सद्गुरू करून देतात आणि मगच त्या
नामाच्या ठिकाणी साधक स्थिर होतो. सद्गुरूंकडून मिळालेल्या त्या सबीज
नामामध्ये सद्गुरूंची सारी साधना / तपश्चर्या भरलेली असते. तीच
साधकाला नामात स्थिर करते आणि साधकाचे कल्याण होते. म्हणूनच ज्ञानदेव
सांगता
त,
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"

                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥