हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२४)

 

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # २४.


जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भावशुद्ध ॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥
जात वित्त गोत कुळ शील मात । भजकां त्वरित भावनायुक्त
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । वैकुंठ भुवनी घर केलें ॥

पाठभेदः भजकां = भजे का; भावनायुक्त = भावयुक्त                    


आपल्या भारतीय जीवनप्रणालीत "धर्म" ह्या संकल्पनेला फार महत्त्व आहे. मानवी व्यवहारातही चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मानवी व्यवहार हे देहभावाच्या अधिष्ठानावरच चालतात. शरीरधर्मात साधी भूक लागली तर त्यातून मोक्ष मिळवण्यासाठी काही तरी खाणे भाग असते. ते खाणे(अर्थ)मिळविण्यासाठीही धर्म ( कर्तव्य ?! )  हवाच! खाण्यामागे क्षुधाशांती आणि  देहसंवर्धन हा मुख्य हेतू आहे. आपली प्रकृती काय आहे, शरीराला काय योग्य ह्या गोष्टींचा विचार करूनच काही नियम  केले जातात ( उपासना ?!). ह्या नियमांचे पालन करून तसे वागले तर उत्तम आरोग्य आणि शांती आपल्या घरी सुखाने नांदतात. वरील पुरुषार्थांत धर्माचे स्थान प्रथम आहे. तर ज्ञानदेवांच्या हरिपाठातील ह्या अभंगाच्या पहिल्याच चरणात जप, तप, कर्म, क्रिया, नेम आणि मग धर्म येतो. अध्यात्म किंवा परमार्थ सुरू होतो तो देवाच्या ओळखीतून आणि सांगता होते ती स्वये देव होण्यात. आपल्या ठायी असणाऱ्या देवाची ओळख झाली की 'सर्वांघटी राम' ह्या भावाची धारणा करावी लागत नाही. मुळात नाना प्रकारच्या उपासना करणाऱ्या लोकांना उपासनेचे मुख्य वर्म नेमके कशात आहे हेच कळत नाही. त्यामुळे साधकाच्या पदरात कष्ट मात्र पडतात; पण फळ दूर राहते. 'सर्वांघटी राम' ह्या शुद्ध भावाचा अंतःकरणात उदय होण्यासाठीच ह्या साऱ्या उपासना आहेत. भगवत गीतेतही भगवान श्रीकृष्ण १८व्या अध्यायात सांगतात,


"ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे ऽ र्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१॥


ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत हे गुह्य अधिकच स्पष्ट केले आहे.
तोचि एक ईश । तुझिया अंतरीं । पार्था वास करी । निरंतर ॥ २२६८ ॥
न घेतां पार्थत्व । अहं ऐसें स्फुरे । अंतरी ते खरें । त्याचें रूप ॥ २२६९ ॥ (अध्याय १८)

ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात ज्ञानदेव स्वतःच लिहितात,


या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥


"सर्वांघटी राम", "ईश्वरः सर्वभूतानां" आणि " या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।" हे सर्व सत्य आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना याची प्रचिती येते का? तसा आपला अनुभव तर नाही. कारण स्थूल ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जे प्रचितीला येते तेच खरे असे म्हणणाऱ्या स्थूल दृष्टीच्या माणसांना सूक्ष्म चैतन्यरूप जगाचे दर्शन होणार तरी कसे? पण ज्ञानदेव हरिपाठात पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात की भाव धर आणि सत्य जाणून घे.


 न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥


हरिपाठात ज्ञानदेव देवाच्या प्राप्तीसाठी नामस्मरणाचा मार्ग सांगत असले तरी ते "भावा"लाही तितकेच प्राधान्य देतात हे विसरून चालणार नाही. नामस्मरण, भावस्मरण आणि देवस्मरण असा हा सुलभ मार्ग आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
        सर्वसामान्यपणे, माणूस कुणीतरी सांगितले म्हणून देवासाठी  काहीतरी उपासना करतो. देवाच्या असण्याबद्दल श्रद्धा नसते असे नाही. पण ती सदोष असते. ह्यात त्याचा दोष काहीच नाही. कारण देवाबरोबरच माणसाला जगदेखील तितकेच खरे वाटते. त्याच्या परिणामस्वरूप जीवनांत मनाविरुद्ध काही घडले की देवाच्या अस्तित्वाबद्दलच शंका येते.अशावेळी मनात कोणताही संदेह न ठेवता टाहो फोडून त्याचा धावा करावा असा उपाय ज्ञानदेव आपल्याला सांगतात. देवाचे नाम घेणाऱ्याच्या हातात प्रार्थना हे मोठे शस्त्र आहे. भगवंतावरील श्रद्धा निकोप राहणे हे आध्यात्मिक आरोग्य आहे. ह्यासाठी प्रार्थनेसारखा नामी उपाय नाही.


"सर्वांघटी राम" ही दृष्टी आज आपल्याजवळ नसली तरी ते त्रिकालाबाधित सत्य आहे. मनात कोणताही संदेह न ठेवता त्या सत्याच्या शुद्ध भावात उपासना चालू ठेवली असता अभ्यासाने आणि प्रार्थनेने त्याच सत्याचा साक्षात्कार नामधारकाला होणारच.


जात वित्त गोत कुळ शील मात । भजकां त्वरित भावनायुक्त ॥


माणसाला जात, वित्त, गोत, कुळ जन्मताच चिकटतात आणि त्याचसाठी तो जन्मभर कष्ट करतो. जातीचा अभिमान, श्रीमंतीचा गर्व, आप्तांचा भरवसा, कुळाचा उच्चपणा ह्या गोष्टी माणसाचा अहंकार पुष्ट करतात. तर ह्याच्या उलटही होऊ शकते. माणूस नकळत स्वतःला हीन, दीन, लाचार समजतो. पहिला अहंकार त्याला तर त्रास देतोच पण समाजालाही अहितकारक असतो. दुसऱ्या प्रकारच्या 'अहं'कडे आपले बऱ्याचदा दुर्लक्ष होते. त्याचा आपल्यावर किंवा समाजावर प्रत्यक्ष परिणाम काही दिसत नाही असा आपला गैरसमज / भ्रम असतो. ह्या अहंकाराचे दृश्य स्वरूप म्हणजे माणसाच्या ठायी असणारा न्यूनगंड. त्यामुळे माणसाची कुवत असूनही माणूस कार्यविन्मुख होतो आणि जीवनात सुख-आनंद ह्यांना पारखा होतो.


परमार्थातही अहंकारच भगवंत दर्शनाच्या आड येतो. माणसाचा अभिमान, गर्व त्याला बहिर्मुख करतात. त्यामुळे माणसाचे मन सूक्ष्म भगवंताकडे वळत नाही. तर न्यूनगंडामुळे देवाला दोष देत तो देवाकडे पाठ करतो. ज्ञानदेव,तुकाराम,नरहरी सोनार,चोखा मेळा इ.मराठी संतांबद्दल माझ्या मनात आदर,प्रेम आहे ते याबद्दलच. त्यांनी स्वतः जगून, नामाला पूर्ण समर्पित होऊन पोथ्या,देवळात बंद केलेल्या देवाला आपलेसे केले आणि सर्वांना हा सुलभ मार्ग मोकळा करून दिला. जात,वित्त,गोत ह्या गोष्टी प्रारब्धाने / पूर्वपुण्याईने मिळाल्याच तर त्यांची किंमत ओळखून भगवंताच्या नामात मन गुंतवावे. शुद्ध भावाने युक्त होऊन त्वरित भजन-नामस्मरणाचा मार्ग स्वीकारावा. नामधारकाला बंधमुक्त करून अंतर्बाह्य सुखी करणे हेच नामस्मरणाचे फळ. म्हणूनच जात-पात,कुळ-शील,वित्त-गोत याचा जराही विचार न करता नामस्मरणातून देवाचे भजन त्वरित करावे. तुकाराम महाराजही हाच उपदेश करतात,
'आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥'
एकदा का नामाला गती आली की,


ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । वैकुंठ भुवनी घर केलें ॥


हा ज्ञानदेवांचा अनुभव नामधारकालाही सहज येतो. शुद्ध भावाने युक्त अशा भजनाचा-नामस्मरणाचा सतत अभ्यास केल्याने "ध्यानी मनी रामकृष्ण" अशी साधकाची अवस्था प्राप्त होऊन जो अद्भुत लाभ नामधारकाला होतो त्याचे वर्णन ह्या चरणात ज्ञानदेवांनी केले आहे.
      तीनही देहांच्या पलीकडे जे स्वस्वरूप ते वैकुंठ होय. अखंड आनंद म्हणजे गोविंद स्वरूपी नित्य वास करतो. पण या ठिकाणी तो जीवाला अव्यक्त असतो आणि आनंद हृदयात असूनही जीवाला त्याचा भोग मिळत नाही. दिव्य नामाच्या उच्चाराने हृदयातील हा भगवंत परेच्या पलीकडील प्रांतातून नामधारकाच्या अंतःकरणात उतरतो, इंद्रियांत पसरतो आणि देहाला व्यापून राहतो. याचाच अर्थ असा की, श्रीहरी परमात्मा नामाच्या प्रेमाने वैकुंठ लोकातून भूलोकी येऊन राहिला.


ज्या नामाच्या प्रभावाने हा अनुभव ज्ञानदेवांना आला तोच अनुभव इतरांनाही यावा म्हणून ज्ञानदेव सांगतात,

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥


 


ह्या आधीचे अभंग