हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२२)

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # २२.


नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥
हरिविण जन्म नरकचि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥

पाठभेदः ते प्राणी = तो नर; भुक्ति = भक्ति


आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येते. सर्वसामान्य माणूस इतर सर्व गोष्टींत रस घेईल पण भगवंताबद्दल काही ऐकणे, वाचणे किंवा जाणून घेणे ह्याबाबतीत तो सदैव उदासीन असतो. अगदी थोडीच माणसे अशी असतात जी भगवंतप्राप्तीचे ध्येय निश्चित करून एखादे साधन / मार्ग अंगिकारतात. त्यापैकी अगदी थोडी नामस्मरण हा मार्ग स्वीकारतात. त्या नाम घेणाऱ्या साधकांपैकी अगदी थोडेच असे असतात जे खऱ्या अर्थाने नामाला वाहून घेतात. नामाला चिकटणे वाटते इतके सोपे नाही. त्याला निष्ठा आणि चिकाटी हवीच. त्यात माणूस हा कर्मप्रिय आहे. फक्त नाम घेऊन काय होते का? असाच प्रश्न तो नामधारकांना किंवा सद्गुरूंनाच विचारतो. सर्वसामान्य माणूस सर्वांवर प्रेम करील पण भगवन्नामावर प्रेम स्थिर होणे कठीणच आहे. अगदी सुरुवातीला कुणाच्या तरी सांगण्याने नाम घेतो. पण हळूहळू नामाचा कंटाळा येऊ लागतो. नाम घेण्यात मन रमतच नाही. नामाचा कंटाळा येऊ लागतो. एखादाच दुर्मिळ मनुष्य की ज्याचे नामावरच लक्ष स्थिर होते. एखादाच दुर्लभ मनुष्य ज्याचे नामावर प्रेम जडते. मन नामाला चिकटण्यास थोडीतरी आध्यात्मिक क्षमता आवश्यक असते. काहींच्या ठायी ती उपजतच असते. तर काहींना संतसंगतीने लाभते.काहींना केवळ श्रद्धेने नाम घेतल्यानेही अशी क्षमता प्राप्त होते. परम भाग्याने जर संतसंगती मिळाली तर साधकाचे ठायी नामाची गोडी निर्माण होते व अखंड नामस्मरण-नित्य नेम नामी हेच त्याच्या जीवनाचे सार होते. हळूहळू त्याची आध्यात्मिक क्षमता बहरू लागते आणि भगवंताचे अस्तित्व अगदी आपल्यापाशीच आहे अशी जाणीव त्याला होऊ लागते. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतही हेच सांगितले आहे.
"तो मी वैकुंठी नसे । वेळु एक भानुबिंबहि न दिसे । वरि योगियांचीही मानसे । उमरडोनी जाय ।" " तरि तयापाशी पांडवा । मी हरपला गिवसावा । जेथं नामघोषु बरवा । करिती माझा ।"
संतांचाही असाच अनुभव आहे.
'नित्य काळ जेथे हरिनामाचा घोष । तेथे जगन्निवास लक्ष्मीसहित ॥'
'मागे पुढे उभा राहे सांभाळित । आलिया आघात निवाराया ।'


नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥


भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव फार आल्हाददायक असते. त्या जाणीवेच्या प्रभावानेच नामधारकाचे मन हळूहळू अंतर्मुख होऊन नामामध्ये रमायला लागते. नामात रंगलेला नामधारक देहाची कोंडी फोडून सर्व विश्वालाच आपले समजू लागतो.त्याच्या अपेक्षेचे आणि महत्त्वाकांक्षाचे स्वरूपच बदलते. इतरांसाठी सहज आपलेपणा निर्माण झाल्यामुळे त्याचीही चिंता इतर जण वाहतात. परंतु अशा ऐश्वर्यात संत कधीच रमत नाहीत. संत तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांकडून चालत आलेले ऐश्वर्य नाही का परतवून लावले? परिसा भागवताचा परिस नामदेवांनी नदीत बुडवून टाकलाच ना? अशा ऐश्वर्याचा आणि सिध्दींचा संतांना काय उपयोग? अशा विषयांनदापेक्षा सहस्र पटीने श्रेष्ठ असा भगवंताचा प्रेमानंद त्यांना प्राप्त झालेला असतो. त्यांच्या घरी भुक्ति आणि चारी मुक्ती अक्षरशः पाणी भरत असतात.


हरिविण जन्म नरकचि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥


नरक ही संकल्पना आताच्या काळी सर्वसाधारण माणसाला पटणार नाही. जेथे परमेश्वरालाच 'रिटायर्ड' करण्याचे वेध लागलेत तेथे नरक ही गोष्ट कशी पटेल? नरकामध्ये जीवाला शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागतात आणि त्या असह्य असतात असे म्हणतात. अगदी विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला दुःख आणि त्रास देणाऱ्या बाह्य गोष्टी नसतात; तर त्यासंबंधी आपल्या मनात येणारे विचार आणि प्रतिक्रियाच आपल्याला जास्त दुःख अथवा क्लेश देतात. भय आणि चिंता ह्यामुळेच माणूस हैराण होतो. जर शांत मनाने जगता येत नसेल तर मग असा अशांत आणि अतृप्त मनाचा माणूस मेल्यानंतर तेच मन घेऊन अदृश्यांत जाणार हे उघड आहे. तेथे त्याला भयचिंता काही सोडत नाहीत. शिवाय येथे जी दुष्कर्मे केलेली असतात त्यांची फळे तेथे भोगावीच लागतात. निसर्गामध्ये ( विश्वामध्ये ) नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था असल्यामुळे आपल्या कर्मांची फळे भोगायला लावणारी शक्ती तेथे वास करते.तिला यम अशी संज्ञा आहे. 'यमाचा पाहुणा' या शब्दात एक अव्यक्त गोष्ट आहे. ती म्हणजे माणूस काही कायमच तेथे वास करणार नसतो. कर्माची फळे भोगल्यानंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येतो. म्हणून तो 'यमाचा पाहुणा'! परत आल्यावर येथे पूर्ववत् जीवन चालू होते.पुन्हा त्याच चिंता, त्याच इच्छा आणि तेच विषयभोग. पण देवाचे नाम काही घेतले जात नाही. म्हणूनच तुकाराम महाराज लिहितात,
'किती वेळा जन्मा यावा । किती व्हावे फजित' तर शंकराचार्य लिहितात,
'पुनरपि जननं पुनरपि मरणं । जननी जठरंद्रियें शयनं ॥'


ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥


ह्या ओवीवर चिंतन करण्यापूर्वी मला ज्ञानदेवांच्या हरिपाठातील मागील अभंगातील खालील ओव्या आपल्या नजरेस आणून द्याव्याशा वाटतात.


ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ॥
(अभंग १२)
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले । निवृत्तिने दिधले माझ्या हाती ॥ (अभंग १७)


ज्ञानदेव स्वतः 'ज्ञानियांचा राजा', 'योगियांचे योगिराज' होते. पण देवाच्या निर्गुण स्वरूपाविषयी किंवा अध्यात्मातील गूढ ज्ञानाचे आकलन होण्यासाठी ते आपल्या सद्गुरूंना पूर्ण शरण गेले आहेत. येथे साधकाच्या प्रयत्नांना कमी लेखायचे नाही. पण साधकाचे प्रयत्न एका मर्यादेपर्यंतच साथ देऊ शकतात. अंतिम अनुभूती मात्र केवळ ईश्वरी कृपा किंवा सद्गुरूकृपा ह्यामुळेच येऊ शकते असे तर त्यांना सुचवायचे नाही ना?


ह्याआधी नामावर आणि त्याच्या अनुभवावर भरभरून लिहीत असता ज्ञानदेव आपल्या सद्गुरूंचा उल्लेख करत नाहीत. पण येथे मात्र तो आवर्जून करतात. एका मर्यादेपर्यंतच साधक नामाची महती जाणू शकतो.


परमेश्वराप्रमाणेच त्याचे नामही अनंत आहे. ते गगनाहूनि वाड आहे. आकाश आपल्याला निळे भासते. पण जसं जसे आपण त्याला जाणण्याचा प्रयत्न करू लागतो तसं तसे आपल्याला कळते की आकाश म्हणजे केवळ एक पोकळी आहे. पाणीही आपल्याला निळेच भासते. पण त्याला ना आकार ना स्वतःचा रंग. देवाचे नामही असेच आहे. नाम घेता घेता आपल्या नामाचा ध्वनी अव्यक्त अनाहतनादांत लीन होतो. तो शरीराच्या कानाला ऐकू येत नाही. श्रवणशक्तीला तो ऐकू येतो. तो ध्वनीदेखील वाड म्हणजे अमर्याद आहे. कारण तो मूळचा ओंकार आहे. नाम हे चैतन्याचे शुद्ध स्फुरण आहे. तर आकाश हे पंचमहाभुतांपैकी एक आहे व जड आहे.
एका जनार्दनी नाम । शुद्ध चैतन्य निष्काम ॥'
चैतन्य हे जडापेक्षा श्रेष्ठ असल्याने चैतन्यघन असे नाम जड आकाशापेक्षा  श्रेष्ठच असणार. जड असल्याकारणे आकाशाला सीमा आहेत. शिवाय भूतमात्रांना तारण्याचे सामर्थ्य आकाशात नाही. याच्या अगदी उलट नामाचा महिमा आहे.
'नामाचा महिमा कोण करी सीमा । जपा श्रीरामा एक्या भावे ॥'
'नामेचि तरले कोट्यानु हे कोटी । नामे हे वैकुंठी बैसविले ॥'
सर्वात महत्वाचे म्हणजे आकाशासकट अनंत ब्रह्मांडे ज्या हरीच्या उदरात आहेत त्या हरिलाच अंकित करून घेण्याचे सामर्थ्य नामात आहे. म्हणूनच नाम हे गगनाहूनि वाड, श्रेष्ठ आहे.


नामाचे हे माहात्म्य ओळखूनच ज्ञानदेव सर्वांना उपदेश करतात.


"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥


 ह्या आधीचे अभंग