हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१५)

                      ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग १५.


एक नाम हरि द्वैत नाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥
समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमा वैरी हरी झाला ॥
सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥


पाठभेदः शमदमा वैरी = शमदमावरी


परमेश्वरप्राप्तीची इच्छा तर सर्वांच्याठायी असते. त्यासाठी साधनांचीही कमी नाही. ज्ञानदेव हरिपाठातून नामस्मरणासारखे सुलभ साधन आपल्या हाती देत आहेत. सर्वसामान्य माणूस भगवंताचे नाम घेत असतो.  नाम घेणे हे त्याच्याठायी पुण्यसंचय करून देऊ शकते. पण संतांच्या ठायी असलेली आध्यात्मिक बैठक त्याच्या ठिकाणी नसते. आध्यात्मिक भूमिकेतून नामस्मरण चालणे हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने अत्यंत कठीण आहे. केवळ भगवंतच आहे असा दृढ भाव धरून नामापरतें सत्य नाही ह्याची जाणीव ठेवून एकत्वाने नाम घेणे हिच खरी आध्यात्मिक भूमिका. 'नाम नामी अभेद' हा सिद्धांत आपणांस माहीत आहेच. पण तो अभेद नामीकडून आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. 'मी नाहीच, आहे तो केवळ भगवंतच' असा भाव धरून जगणे ही आहे अद्वैताची कुशलता. पण साधकावस्थेत मात्र मी भक्त, तो देव असा भाव घेऊनच साधकाचे नाम चालते. हरिनाम हे एकच असे साधन आहे की, त्याच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारा द्वैतभाव दूर होतो. सर्वसामान्य माणूसही भगवंताचे नाम घेतो. पण त्याला कारण असते ते त्याच्या प्रापंचिक अडचणी आणि स्वतःचा दुबळेपणा / दुर्बलता जेणेकरून आपल्या अडचणी दूर करण्यासाठी तो मदत शोधत राहतो. ह्या नामाने त्याच्याठायी पुण्यसंचय तर होतो. पण संत / सद्गुरूंना अपेक्षित अशी अद्वैताची आध्यात्मिक बैठक नसल्यामुळे द्वैताच्या अधिष्ठानावर केलेली साधना दुरी मात्र निर्माण करते. संतांना हे अभिप्रेत नाही. एकत्वभावाने घेतलेले भगवन्नाम ही एक 'अद्वैत कुसरी' आहे, अद्वैतस्थिती प्राप्त करून देणारी कला आहे. पण हे अनुभवाने जाणणारा ह्या जगात विरळाच !  नामासारख्या सुलभ साधनाची महती सर्वसामान्यांना कळत नाही. ज्ञानदेवांनी ही खंत ह्याआधीही आठव्या अभंगात व्यक्त केली आहे.
" ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे॥"
नामसाधनेतून अद्वैतस्थिती प्राप्त करून घेता येते ह्यावर ज्ञानदेवांचा ठाम विश्वास आहे. पण ही कला (अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥)जाणणारा आणि त्याचा अनुभव घेणाराही विरळाच हेही त्यांना नकळत लिहावेच लागते.


समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमा वैरी हरी झाला ॥


चिकाटीने आणि श्रद्धेने अखंड नामस्मरण केले असता आपली बुद्धी देवाशी सम होऊन तिचा देवाशी योग घडवून आणता येतो. नामस्मरणाने ही अनुभूती घेणाऱ्या नामधारकाला इतर मार्गाने जाणाऱ्या साधकांप्रमाणे शम म्हणजे मनाचे नियमन व दम म्हणजे इंद्रियांचे दमन करावे लागत नाही. याचे कारण असे की ज्या मनाचे नियमन करायचे ते मनच हरिनामात रंगून गेल्यावर त्या मनाचे नियमन करण्याचा प्रश्नच उरत नाही. त्याचप्रमाणे सर्व इंद्रिये हरिप्रेमात सुस्नात झाल्यावर त्यांचेही निराळे दमन करावे लागत नाही. 'मुखी नाम । हृदयी राम' अशी अवस्था झाली की शमदमादी साधनचतुष्ठ्य आपोआप अंगी बाणतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. भगवंताच्या नामस्मरणात एवढी शक्ती नक्कीच आहे की ते साधकाला अद्वैताची प्रचिती देते आणि त्याचे साधनचातुष्ठ्य सहज होते.
'नाम घेता कंठ शीतळ शरीर । इंद्रियां व्यापार नाठवीती ॥
गोड गोमटे हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्तें॥'


याच्या उलट शम-दमांचा अभ्यास करणाऱ्या साधकांची अवस्था मोठी केविलवाणी असते. मनाचे नियमन आणि इंद्रियांचे दमन करण्यात या साधकांना मानसिक व शारीरिक क्लेश होतात. त्यांच्या मनाचा तोल ढळल्यामुळे ते शीघ्रकोपी बनतात. जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिकच विकृत होते. जगरूपाने हरीच नटलेला आहे असे दिसण्याऐवजी जग( जगरूपाने असणारा हरि)म्हणजे वैरी असेच त्यांना भासू लागते. सरतेशेवटी पूर्ण अधोगती होऊन त्यांची हरीकडे पाठ होते.


सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ॥


ह्या अभंगात ज्ञानदेव अद्वैतानुभव वर्णन करतात. आपल्या हृदयात असणारा भगवंत नामाच्या आलंबाने प्रगट झाला की साधकाची जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. ज्या साधकाला स्वतःच्या देहामध्ये भगवंत पाहता येतो, त्याला एकच आत्मस्वरूप भगवंत चराचर सृष्टीत कसा भरून राहिला आहे ते कळते. आत्मा सूर्यासारखा आहे. एका आत्मसूर्याचा प्रकाश सर्व विश्वाला प्रकाशित करतो. इथे एक सत्य सांगावेसे वाटते. सूर्य विश्वाला प्रकाशित करतो.आपण प्रकाशात विश्व पाहतो.पण आपल्याला प्रकाश दिसतो का ? त्या प्रकाशकिरणांचा स्रोत जो सूर्य तो आपणांस दिसतो. तसेच आत्मसूर्याचा आपल्या ठायी साक्षात्कार झाला की त्याच्या प्रकाशात सर्व चराचरांत तोच विलसत आहे ह्याची प्रचिती येते.
असो रूपक हे तो ईश्वरू । सकल भूतांचा अहंकारू ॥
पांघरोनी निरंतरू । उल्हसत असे ॥
हे ज्ञानदेवच ज्ञानेश्वरीत सांगतातच की.
परंतु हा अनुभव अखंड नामस्मरणाने मिळणाऱ्या दिव्यज्ञानानेच प्राप्त होतो. हे ज्ञान केवळ ईश्वरकृपेने किंवा सद्गुरुकृपेनेच प्राप्त होते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानेच गीतेत सांगितले आहे,
''ददामि बुद्धियोगं तं येन मां उपयान्ति ते ॥"
सद्गुरुकृपेने अथवा ईश्वर कृपेने दिव्यज्ञान प्राप्त झाले की त्या दिव्य ज्ञानप्रकाशात जीवाला सर्व काही दिव्यच दिसू लागते. अनुभूतीआधी 'मी' देहाएवढा आहे असे वाटते तर दिव्यानुभूतीने 'तुका आकाशाएवढा' असे अनुभवाला येते. आधीचेच दुःखरूप जग 'अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता' ह्याची प्रचिती येते.


ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥


हरि मुखे म्हणा । हरि मुखे म्हणा ॥ असे अखंड नामसंकीर्तन केल्याने अगणित पुण्याईने ज्ञानदेवांच्या चित्तात अखंड नामस्मरणाचा नेम आहे. हे म्हणजे मागच्या जन्मीच मुक्त झाल्याची खूण आहे. मुक्ती मिळणे आणि मुक्ती मिळाल्यानंतर मुक्तीचा भोग घेणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत.
'जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तीच अंगे झाली हरिरूप ॥" हा संतांचा अनुभव आहे.
देहबुद्धीतून निर्माण झालेल्या वासना जन्माला तर घालतातच. पण नामाची पुण्याई गाठी नसेल तर बंधनात अडकवूनही ठेवतात. मात्र आत्मबुद्धीच्या वासनाही जन्मास घालतात.पण भगवंताच्या नामात एवढी मोठी शक्ती आहे की नामाला चिकटलेला साधक वासनामूक्तच होईल. सद्गुरू श्री.वामनराव पै लिहितात,  'मुक्ती मिळणे आणि मुक्ती मिळाल्यानंतर मुक्तीचा भोग घेणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. मुक्ती मिळाल्यावर जे स्वतःला धन्य झालो असे समजतात ते अभागी होत. याच्या उलट मुक्ती मिळाल्यानंतर तिचा भोग घेतात ते भक्त भाग्यवान होत. मुक्ती भोगणे ही भक्ती होय. ही भोगण्याची प्रक्रिया म्हणजे नामसंकीर्तन. हा प्रेमानंद पुन्हा पुन्हा भोगायला मिळावा म्हणून संत गर्भवास इच्छितात.
'नलगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥'
हे तर तुकाराम महाराजांचे मागणे आहे.


याच्या उलट नामाच्या द्वारे ज्यांना मुक्तीचा सोहळा भोगता येत नाही ते जन्ममरणाच्या चक्रांतून स्वतःची सोडवणूक करून घेतात. पण नामाचा हा महिमा ज्ञानदेवांनी ओळखला आणि आपल्यासारख्या सामान्यांनानाही ती प्रचिती यावी म्हणून ते सांगतात,


"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"


                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"