ह्यासोबत
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा!
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#७)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#८)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#९)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#१०)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#११)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१७)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१८)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१९)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२०)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२१)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२७)... अंतिम
॥ श्रीसद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग ४.
भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति । बळेविण शक्ति बोलू नये ॥
कैसेनि दैवत प्रसन्न प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ॥
भाव म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाबद्दलची श्रद्धा. भाव, श्रद्धा ह्याची गरज काय?असे विचार काहीवेळा मनात येतात. अशाने अंधश्रद्धा वाढीस लागेल असे तर्क केले जातात. आंधळ्या श्रद्धेने कसा परमार्थ घडेल? असे प्रश्न निर्माण होतात. श्रद्धावान असणे म्हणजे निर्बुद्धपणा असाही बऱ्याच जणांचा समज असतो. तर मग आपले दैनंदिन व्यवहार कसे चालतात? एकमेकांच्या विश्वासावरच ना?! हा विश्वास, ही श्रद्धा नसेल तर?? मानवी व्यवहार बंद पडायला वेळ लागणार नाही. परमार्थातसुद्धा श्रद्धेचे, भावाचे महत्त्व फार आहे. विश्वासामध्ये संशयाला जागा असते; वाव असतो. श्रद्धेमध्ये संशयाला वाव उरतच नाही. आपल्या अंतर्यामी "मी आहे व मी असणार आहे (म्हणजेच मी अमर आहे?!)" याबद्दल कुठलाच संशय येत नाही. तसेच भगवंताच्या अस्तित्वाबद्दल वाटणे हे भगवंताच्या श्रद्धेवरील लक्षण आहे.विश्वास जीवनाला वरवर स्पर्श करतो. श्रद्धा जीवनाच्या मुळाशी जाऊन भिडते. तिला अनुभवाचे ठाम अधिष्ठान असते.संत मायबापांनी देवाचा साक्षात अनुभव घेतला व त्याच्या भक्तीने जीवाचे कल्याण होते हेही सांगितले. संतवचनावर पूर्ण विश्वास ठेवून भगवंताबद्दल अंतःकरणात नितांत श्रद्धा बाळगणे ह्याला भाव म्हणतात. हा भाव नसेल तर हातून देवाची उपासनाच मुळी घडणार नाही आणि घडलीच तर तिला भक्तीचे रूप प्राप्त होणार नाही. भाव ह्या शब्दाचा 'संबंध' असाही अर्थ घेतला जातो. जसे मार्तृभाव,बंधुभाव,शत्रुभाव. "विभक्त नोहे तो भक्त" असा भक्त ह्या शब्दाचा रामदास स्वामींनी अर्थ सांगितला आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात," देव आणि भक्त दुजा नाही विचार". ही एकत्वाची भावना फक्त श्रद्धेतून केलेल्या उपासनेतूनच येते. तात्पर्य, उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना नुसती कवायत होय व भाव असेल तर ती खरी भक्ती होय. या भक्तीतच मुक्ती मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून...
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया॥
केवळ नामस्मरण करून भगवंत प्रसन्न होईल का? देवाचे दर्शन होईल का? मग इतरांनी जे काही केले म्हणजे व्रत,वैकल्यं, यात्रा वगैरे ते आपण केले तर त्वरित फळ मिळेल का? असे नाना प्रश्न सामान्यजनांच्या मनात येत असतात.कारण बरेच प्रापंचिक सामान्यजन हे बहिर्मुख असतात.त्यामुळे जीवनाच्या बाह्यांगाच्या आधारेच विचार करण्याची त्यांना सवय झालेली असते. आपल्या अंतरंगात एकदम झालेली उलाढालही सामान्यजनाला सहन होत नाही. म्हणून सामान्यजनांनी इकडे तिकडे धावाधाव न करता, अधिर न होता, स्वतःला विनाकारण न शिणवता निवांत होवून राहिले तर भगवंत कृपा करून दर्शन देणारच अशी श्रद्धा बाळगणे साधकाच्या हिताचे नाही का ? तुकाराम महाराजांचा एक अभंग ह्या संदर्भात चिंतनीय आहे.
"बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त । तया सुखा अंत नाही पार ॥
येवोनि अंतरी राहील गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ॥
रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ॥"
सर्वसामान्य माणसाचा एक स्वभावधर्म असतो. तो म्हणजे जे काम आवडत नाही किंवा करायचे नसेल त्यासाठी तो काहीतरी कारणे शोधत राहतो. आपल्या प्रापंचिक अडचणींचा पाढा वाचणे ह्यासारखे आणखी मोठे कारण ते कोणते असणार नामस्मरण न करण्याला? "प्रपंच असावा नेटका" हे रामदासस्वामींनी नाही का सांगितले? असे सबळ कारण पुढे करून आपण परमार्थ पुढे ढकलत असतो. हे माहित असल्यामुळे ज्ञानदेव अशा साधकालाच (जो सबळ कारणे देण्यात पटाईत असतो) विचारतात..
"सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥"
रात्रंदिवस प्रपंचाची घडी नीट बसवण्यास कष्ट करावे लागतात. हे तर आपणा सर्वांना माहित आहे. असे जरी असले तरी भगवंतासाठी वेळ काढला पाहिजे. सद्गुरू श्री. वामनराव पै परमार्थाची व्याख्या करताना म्हणतात.. प्रपंच सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. त्यांच्या "जीवनविद्या मिशन"च्या संगीत जीवनविद्या ह्या ध्वनिफितीत एक गाणे आहे.
"संसाराच्या सुखी कळीतून,सहज फुले परमार्थ खरा"
जीवनविद्या गुह्य सांगते; ह्या विद्येचा घोष करा"
प्रपंच हातावेगळा करीन आणि मग मी भगवंताकडे वळेन असे म्हणणारा मनुष्य शेवटी फसल्याशिवाय राहत नाही. प्रपंचासाठी रात्रंदिन राबणारा माणूस परमार्थाकडे वळत नाही हे पाहून ज्ञानदेव सांगतात;
"ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ॥"
प्रपंचाचे धरणे तुटण्यासाठी हरिनामजप करणे ह्यासारखा दुसरा सोपा उपाय नाही. "सायासे करिसी प्रपंच दिननिशी" मधला प्रपंच हा सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला बायकामुलांचा,घर-गृहस्थी आणि व्यवसायाच्या अपेक्षेत असलेला प्रपंच तर "तुटेल धरणे प्रपंचाचे" मधील प्रपंच हा शब्द "देह" ह्या अर्थाने आहे. सद्गुरू श्री.वामनराव पै लिहितात.. पाचांचा प्रकर्ष म्हणजे प्रपंच होय. पृथ्वी,आप,तेज,वायु,आकाश या पंच महाभूतांचा प्रकर्ष देहाच्या ठिकाणी झालेला आहे. एरव्ही ही पंचमहाभुते एकमेकांना गिळू पाहतात; पण या देहाच्या ठिकाणी मात्र ती गुण्यागोविंदाने नांदतात. वास्तविक 'मी' देहापासून वेगळा आहे. पण 'मी देह आहे' हा भाव जीवाचे ठायी स्फुरू लागला. या भावबंधनालाच "प्रपंचाचे धरणे" असा शब्दप्रयोग ज्ञानदेव करतात. जोपर्यंत हा देहभाव आहे आहे तोपर्यंत जीवाने वाटेल तेवढी यातायात केली तरी ज्या सुखासाठी त्याची धडपड चालू आहे ते सुख त्याला मिळणे शक्य नाही. या देहभावाची(देहाची नव्हे)तुटी होणे, भावबंधनाची गाठ सुटणे म्हणजेच "तुटेल धरणे प्रपंचाचे"
हे प्रपंचाचे धरणे सुटण्यासाठी साधकाला अंतर्मुख होता आले पाहिजे. नामस्मरणाने साधकाचे मन अंतर्मुख होते. हळू हळू नामात दंग झालो की मनातील विचारांची गती आणि प्रमाण कमी होत जाते."जेथे उठे 'मी'चे स्फुरण तेथे म्हणा विठ्ठल विठ्ठल" अशा नामस्मरणात देहभाव विरून जातो. 'मी'ची देहाशी पडलेली गाठ सुटते. देहभाव जाऊन त्याच्या ठिकाणी देवभाव जागृत होतो. म्हणूनच ज्ञानदेव सांगतात...
"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"
"॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"