आपापली रेषा

१. माझ्या वर्गातल्या दोघीजणी तरूण मुलींच्या वक्षस्थळे शस्त्रक्रियेने वाढविण्याचा प्रवृतीवर टीका करीत होत्या.
आपली रेषा/मर्यादा आपणास मान्य होते पण आपल्या कल्पनेला न पचणारे घडले की आपण टीका करितो. पणजीच्या पिढीत साधी पाचवारी नेसली तर गहजब होत असे. आजीच्या पिढीत केस कापणे म्हणजे अक्षम्य गुन्हा होता. आई च्या मैत्रिणींना मेक अप करणाऱ्यांबद्दल बोलताना आठवते. तरीपण बायकोचे म्हणणे आहे शरीरावर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करणे फारच झाले. कदाचित पुढची / अथवा त्या पुढची पिढी म्हणेल शस्त्रक्रिया ठीक आहे पण जेनेटीक्स क्लिनिक मध्ये जाऊन जीन्स चे म्युटेशन करून घेणे फारच झाले. काय चूक आणि काय बरोबर हे जागा / वेळ / पिढी म्हणजेच व्यक्तिसापेक्ष असते हेच खरे. आपणास काय वाटते?
२. परवा बाहेरच्या देशात बनविलेल्या कार घेण्याबद्दल दादा म्हणाला ही पिढी ऐषारामाच्या मागे लागली.
आजोबा म्हणे शहरात कायम पायी पायी जात असत. वडिलांनी सायकल घेतली तेंव्हा ती ऐषारामाचीच गोष्ट वाटली चुलत आजोबांना. नंतर त्यांनी मोटरसायकल घेतली तेंव्हा तर आजोबांनी जुने संदर्भ देणेच बंद केले. दादाची ईंडीका त्याला आवश्यक वाटते पण लोकांच्या इम्पोर्टेड गाड्या त्याला लक्झरी वाटतात. मी म्हणालो की आजोबांसारखा तूपण पायीत जात जा की ऑफिसला---चार मैल तर आहे. साहजिकच माझे म्हणणे आवडले नाही. "मॉरल हायग्राउंड" घेणाऱ्यांना माझ्यासारखे लोक फारसे आवडत नाहीत. ऐषाराम हा व्यक्ती सापेक्ष असतो हेही खरे. आपणास काय वाटते?
३. अत्यंत तापलेल्या आवाजात भारत आपला आहे असे तथाकथित हिंदुत्ववादी गृहस्थ २६ जानेवारीच्या पार्टीत दारू जास्त झाल्यावर "त्यांना म्हणा जा की पाकिस्तानात" असे म्हणत होते. मतितार्थ असा होता की १९४७ नंतर भारतात राहणाऱ्या मुसलमान लोकांचा भारत नाही.
त्यांना विचारले "भारत कोणाचा" ४७ नंतरचा म्हणाल तर तो त्यांचाही आहे. त्यामागे जायचे म्हणाल तर किती मागे जायचे हे कुणी ठरवायचे? १८०० पर्यंतच गेलात तर इंग्रजांचाही होतो, काही शतके आधी मोगलांचाही होतो. पुरातन काळापर्यंत जायचे म्हणता...मग तो द्रविडांचा होतो. आपण तर आर्यवंशीय असण्याबद्दल अभिमानी आहात. साहजिकच तसा नैतिक अधिकार असल्यासारखे बोलणाऱ्यांना दुसरी बाजू बघायला फ़ारसे आवडत नाही. आपणास काय वाटते?
४. आजची तरुणाई वाया गेली / पाश्चात्यांच्या नादी लागली असे "कांटा लगा"ची फीत बघितल्यावर मित्राच्या वडिलांनी घोषित केले.
प्रत्येक पिढीला आपल्या पुढची पिढी ही वाया गेलेली वाटते. दर पिढी तीच ओरड करते तर मग ते बदलत का नाही? लैंगिकता ही अस्पृश्य वाटावी अशी शिकवण. खजुराहो चे उदाहरण असूनही त्याबद्दल अभिमान नाही. याउलट लैंगिकता म्हणजे पाश्चात्यांची देणगी. कधीतरी आपण हे मान्य करू शकू का की लैंगिकता आणि तिचे काही प्रमाणात प्रदर्शन हे तरुणाईसाठी नैसर्गिक आहे. संस्कृतीदेखील काळ व व्यक्ती सापेक्ष असते का? आपणास काय वाटते?
मनकवडा