अनुस्वार आणि उच्चार

बऱ्याच दिवसांपासून या विषयावर थोडे लिहावे असे मनात होते. काही अनुस्वारांचे उच्चार मला खटकतात. विशेषतः मांस, अंश, सिंह इ. (उदा. सकाळ मधल्या 'तो कांटे क्यों उग आये?' या कवितेतील वंश चा उच्चार). का ते सांगतो. खाली दिलेली मुळाक्षरे बघा.
कखगघङ चछजझञ टठडढण तथदधन पफबभम यरलवशषसहळ
प्रत्येक गट (वर्ण) हा कंठ, जीभ, ओठ, दात, मुर्धा आणि टाळू यांचा समान पद्धतीने वापर कराव्या लागणाऱ्या व्यंजनांचा समूह आहे. यातील शेवटचे अक्षर हे अनुनासिक म्हणून ओळखले जाते. (अनुनासिकाचा उच्चार त्या वर्णातील मधले अक्षर नाकातून उच्चारल्या सारखा असेल. तीव्र सर्दी झालेल्याने "ङ ञ ण न म" यांचा उच्चार केल्यास तो अनुक्रमे "ग ज ड द ब" यांच्या सारखा असेल.) अनुनासिकाची अनुस्वाराच्या उच्चारात महत्वाची भूमिका असते. अनुस्वाराच्या उच्चार हा "ज्या अक्षराआधी अनुस्वार असेल त्याच्या वर्णातील अनुनासिक पाय मोडून उच्चारल्याप्रमाणे" असतो. खालील उदाहरणे पाहा.


बांगडी --- बा ङ् ग डी
वंचना --- व ञ् च ना
भांडण --- भा ण् ड ण
वंदन --- व न् द न
भंपक --- भ म् प क


आता मला खटकलेल्या उच्चारांविषयी.
मांस, अंश, सिंह वगैरे....
यामध्ये अनुस्वारा नंतरचे अक्षर हे शेवटच्या वर्णातील आहे (यरलवशषसहळ). या वर्णाला अनुनासिक नाही. म्हणून "वंश" चा उच्चार "व न् श" असा केला जातो. तो "व अं श" असा केला गेला पाहिजे. (अं चा उच्चार औ+व+न् असा आहे).