झो‌ऽऽऽऽप

झोप हे माणसाच्या जीवनातील एक महान सुख आहे. इथे लहान मोठा, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित असा कसलाही भेदभाव नसतो. ज्याला मस्त झोप लागते तो भाग्यवान.(या बाबतीत मात्र मी जरा जास्तच भाग्यवान आहे). तर अशी ही झोप. तिचा महिमा काय वर्णावा? अहो प्रसन्न असते तोवर ठीक, एकदा का रुसली की जगातल्या कुठल्याही देवीला प्रसन्न करणे सोपे पण ही निद्रादेवी कोपली की कठिण. ही कुणाला वश होईल आणि कुणाला नाही याचा नेम नाही. काय गंमत आहे पाहा. मूल लहान असताना आई अंगाई म्हणून थकते पण बाळ टक्क जागे! आणि पुढे चिरंजीव मोठे होतात, शाळा - अभ्यास सुरू होतात आणि मग 'बाळ' मस्त झोपायला लागते आणि हीच आई त्याला उठवताना हैराण होते.


आपल्या आयुष्यात या झोपेचे स्थान असे जबरदस्त आहे की  झोपेवर असंख्य वाक्प्रचार व म्हणी आहेत. झोपी गेलेला जागा झाला,भुकेला कोंडा नी निजेला धोंडा,  झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग केलेल्याला जागे करता येत नाही, झोपा काढणे, झोपेत असणे, झोप उडणे, काळझोप लागणे, वगरे वगरे. नवऱ्यांवर खेकसताना बायकांचा एक ठेवणीतला वाक्प्रचार आहे : 'बघावा तेंव्हा झोपेत असतोस, सांगितलेले एक काम धड  करशील तर शपथ'. बाकी नवऱ्याची झोप म्हणजे जणू सवत! एखाद्या शनिवारी रात्री सहज आपले म्हणावे  उद्या रविवार आहे, मी मस्त झोप काढणार, बस्स! लगेच पुणेरी दुकानदार गिऱ्हाइकाकडॆ टाकतो तसा तुच्छ कटाक्ष टाकत सौ म्हणते 'हूं. काय ते झोपेचे कौतुक!  जणू रोज पहाटे उठून भूपळ्याच म्हणतोस की नाही. त्या झोपेचं जितकं कौतुक आहे त्याच्या शतांशाने तरी बायकोचे आहे का?' आता या दोन गोष्टींचा काय संबंध (खरेतर परस्पर विरोधी शब्द). अर्थात आपण त्याला दाद देत नाही ते वेगळे. अहो कुणी चार शब्द बोलले म्हणून काय सोन्यासारखी झोप सोडायची?


माझी झोप तशी पूर्वीपासूनच दृष्ट लागण्यासारखी. आईंच्या हाका वा घड्याळाचा गजर अशा क्षुल्लक व्यत्ययाने ती अजिबात बिघडत नसे. अर्थातच सकाळची शाळा म्हणजे संकट वाटत असे. एकदा दादरला आजोळी राहायला गेलो होतो. होळीचे दिवस होते, चाळीत होळी म्हणजे मोठी धमाल असते. होळीच्या रात्री माझ्याहून बऱ्यापैकी मोठ्या असलेल्या आत्तेभाऊ व चुलतभाऊ यांच्याबरोबर मीही खाली गेलो. होळी पेटली, मग पोरांची मस्ती, आरडाओरड, वर्गणी न दिलेल्यांचा जाहीर उद्धार असे सामाजिक कार्यक्रम सुरू झाले. किती वाजले याची काही कुणाला फिकीर नव्हती. उशीर झाला तसा मी पेंगायला लागलो. अंगणाच्या कोपऱ्यात रखवालदार भय्याची खाट होती तिच्याकडे माझे लक्ष गेले. मी हळूच तिकडे सटकलो व बाजेवर बसून सगळा प्रकार बघू लागलो. आणि झोप कधी लागली ते समजलेच नाही. चाळीतल्या पोरांना ऐन होळीच्या रात्री अशी संधी मिळाल्यावर ते काय सोडतात? सात आठ जणांनी मिळून खाट अलगद उचलली आणि होळीच्या जवळ आणली. मी गाढ झोपलेलो. माझी भावंडेही कुठे गायब असावीत. खाट होळीजवळ नेत पोरांनी 'नारळ टाका रे होळीत' असे ओरडत खाट कलंडती केली. मी घसरलो आणि थेट होळीच्या समोरच पडलो. दचकून जागा झालो तर समोर धगधगणारी होळी. भितीने तोंडून शब्दच फुटेना. कसाबसा उठून उभा राहिलो आणि जो ओरडत घरी पळालो, विचारू नका.


हल्ली जरा झोप बिघडली आहे. दूरध्वनी, घड्याळाचा गजर वगरे आवाजाने जाग येते. बाहेर कामानिमित्त गेल्यावर मात्र भारी पडते. एकतर हॉटॆल च्या काचबंद शांत खोल्या. त्यात खिडक्या संपूर्णतः: पडद्यांनी झाकलेल्या. आंत थंडगार वातावरण, मऊ बिछाना व गुबगुबीत रजई. आता अशा परिस्थितीत सकाळी जाग येणे मुष्किल. मग रात्री स्वागतिकेला सकाळचा गजर सांगायचा, आपल्या भ्रमणध्वनीसंचावर गजर लावायचा आणि झोपायच्या आधी पडदा थोडा बाजूला सरकवायचा अशी जोरदार तयारी करावी लागते. नाहीतर उड्डाण चुकायचे आणि सगळाच गोंधळ व्हायचा. माझ्या साहेबाला व सहकाऱ्यांना माझ्या झोपेचे कुतूहल आहे. ते नेहमी म्हणतात तुला बरी विमानात झोप येते. आता न यायला काय झाले? रात्रीच्या प्रवास असो की दिवसाचा असो. विमानात स्थानापन्न होताच प्रथम शाल व उशी ताब्यात घ्यायची. एक अधिक उशी मागून घ्यायची. साधारण उड्डाणानंतर १५ - २० मिनिटात सरबराईला सुरुवात होते. छान पैकी स्वागतपेय घ्यायचे. खणातली मासिके पुस्तके चाळायची, समोरच्या चिमुकल्या पडद्यावर काय चालले आहे त्यावर एकदा नजर मारायची. मग पायातले बूट मोजे काढून झोपायचे मोजे घालायचे. आसन सरकेल तितके आडवे करायचे, शाल डोक्यावरून ओढून घ्यायची, कान हवाबंद करायचे, एक उशी कमरेमागे एक मानेखाली. मग मस्त ताणून द्यायची. अचानक दणका बसतो. च्यायला आकाशात खड्डे कसे? म्हणून डोळे उघडून पाहावे तर विमान धावपट्टीवर असते.


एकदा मजा आली. ग्वांगज्झाउ ते हंगज्झाउ उड्डाणात मी असाच झोपलो होतो. आता हे उड्डाण जेमतेम १००-१०५ मिनिटांचे. पण आपल्याला काय फरक पडतो? मिळेल तो वेळ सत्कारणी लावायचा. मी नेहेमेप्रमाणे गाढ झोपलो होतो. अचानक हवामान पराकोटीचे बिघडले. लाटेवर होडी हेलकावते तसे विमान वर - खाली होऊ लागले. क्षणात खाली तर क्षणात थोडे सावरायचे. अधून मधून डावी-उजवीकडे हेलकावायचे. आत वातावरण एकदम गंभीर. सर्वांना जागेवर स्वस्थ बसायच्या व आसनबंध लावायच्या सूचना होत्या. अर्थातच माझीही झोपमोड झाली. शेजारी बसलेल्या माझ्या साहेबाला जरा बरे वाटले. म्हणाला, अरे झोपलास काय, इथे काय भयंकर प्रकार आहे समजलाय का? मी शांतपणे सांगितले की आपण जमीनीपासून तीस एक हजार फुटावर आहोत. रस्त्याने जाताना चालक खड्यातून वेगाने नेऊ लागला तर त्याला झापता येते. इथे सगळे वैमानिकाच्या हातात. आपण काहीही करू शकत नाही. कितीही चिंता व भिती वाटत असली तरीही. मग उगाच घाबरून जाण्यापेक्षा झोपलेले बरे. काय होईल ते होईल. अर्थातच आम्ही सुखरूप उतरलो.


काय केल्याने झोप येते व काय केल्याने येत नाही असे बरेच समज आहेत, खरे खोटे कोण जाणे. होमिओपथी च्या डॉक्टरांचे कॉफीशी काय वैर कोण जाणे. ते कॉफीच्या ठार विरोधात. आणि त्यात रात्री कॉफी घेतली तर म्हणे झोप येत नाही. मी तर सर्रास रात्री कॉफी पितोच. उलट जितकी उशीरा प्यावी तितकी कॉफीचा लज्जत वाढते. रात्री जेव्हा उशीरा म्हणजे बारा-एक वाजता वगरे घरी येतो, तेंव्हा जेवण बाहेर झालेले असते मात्र कॉफी माझी वाट पाहत असते. ती गरमागरम घ्यायची आणि आडवं व्हायचं. मात्र वातावरण निर्मितीचा फायदा होतो हे खरे. स्वच्छ पांढरा पलंगपोस, उशीला पांढरा अभ्रा, ताज्या फुलांचा मंद दरवळ, आणि कानावर तलतचे शब्द 'मत छेड जिंदगीके खामोष तार सो जा'. झोप कधी लागते समजत नाही.


झोपेचे अनेक प्रकार आहेत. लग्नाची नवलाई असतानाची पहाटे लागलेली साखरझोप, पुढे सौ कडून उद्धार होणारी 'कुंभकर्णाची' झोप, सकाळी गजर बंद करून 'अंमळ' पडल्यावर लागलेली बेसावध झोप, रविवारी दुपारी रस-पुरीचे जेवण झाल्यावरची तृप्त झोप, गाडीत सामान चोरीला जाऊ देणारी गाफील झोप, मस्त पैकी मित्रांसमवेत रात्र जागवल्यावर पहाटे लागलेली गाढ झोप, कचेरीतली  पगारी झोप,रात्रपाळीच्या कामगारांनी रात्री व कामगार पुढाऱ्यांनी कामावर असताना भर दिवसा घ्यायची हक्काची झोप,  परिसंवाद, विचारमंथन बैठक वगरे मध्ये दुपारी भोजनानंतर सभागृहातले दिवे मंद करुन साहेब आपले 'दृक-श्राव्य' सादरीकरण सुरू करताच अनावर होणारी घातक झोप, वक्ता पकाउ भाषण लांबवू लागला की येणारी साहजिक झोप, जलद गाडीत अचानक बसायला जागा मिळताच येणारी अचानक लाभाची झोप, लांबच्या विमानप्रवासातली नाइलाजाची झोप, विद्यार्थीदशेत परीक्षेच्या वेळी रात्री अभ्यासाला बसल्यावर येणारी हमखास झोप, निकाल लागल्यावरची समाधानाची झोप


या झोपेचे कौतुक तरी किती? तमाम कवी आणि गीतकार तर झोपेच्या प्रेमात पडलेले. झोपण्यावर गाणी, झोप न येण्यावर गाणी, झोपेतून उठवण्यासाठी गाणी. बाळा जो जो रे, लिंबोणीच्या झाडामागे, नीज माझ्या नंदलाला, निजल्या तान्ह्यावारी माउली,पहाटे पहाटे मला जाग आली, तरुण आहे रात्र अजुनी, उठी उठी गोपाळा सारखी अनेक मधुर गीते आहेत. असो. आता हे निद्रापुराण आवरते घेतो नाहीतर तुम्हाला वाचताना जांभया यायच्या:)