"द मॅट्रिक्स" हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे.
म्या सदा येळकाढूकर, मुक्काम मुंबै !! माज्या बापाची गांवी शेती हाये. पन् म्या शिकावं अशी माज्या आयबापाची लई विच्छा. तसा म्या गेलो साळंत, पन् म्यॅट्रिकला गाडी फेल ! लई धडका मारल्या बगा पन् काईच उपेग नाय जाला. टकुर्याचा भुगा व्हायची येळ आलती. म्हंजी व्हायाचं काय की मला झ्वाप यायची कंदीबी, झ्वापलेला असताना काय भन्नाट सपानं यायची राव ! पर कोनाला सांगाया ग्येलं तर येडं हाय म्हनायची. शेवटी बा थकला. मुंबैहून बारक्या आलावता गांवाकडं, त्याला म्हन्ला, याला चिटकव गड्या कुठतरी तिकडच, आता शेतीतबी काय र्हायलेलं न्हाई.
म्या आलो मंग हिकडच् बारक्यासंगट. बारक्याच्याच हापिसात लागलो. हापिस येकदम् झ्यॅक बगा. निसत्या चौकोनी छोट्या छोट्या उघड्या खोल्या येका साईडीला अन् दूसरीकडं ही केबिनांची रांग. खोल्यांमदी बसल्येली मानसं उबी र्हायली तरच दिसायची. हापिस येकदम आरश्यावानी चकाचक, अन् बाप्ये पन. बाया तर हिरवीनीसारकी कापडं घालून टकाटका चालायच्या. माजं काम सक्काळी साफसफाई, पानी भरनं आन् समद्या काचा पुसनं. सायेब लोकंबी चांगली. म्हंजी दुपारी थोडी डुलकी लागली तरी बोलायची न्हाईत. फायली येळच्यावेळेत नेउन दिल्या की जालं. माजी सपानं बगन्याची संवय चालूच व्हती. पन् सांगनार कुनाला अन् आईकनार कोन् ? बारक्या तर मला येडाच म्हनायचा.
येक दिवस बारक्या म्हनला, ये सद्या, लेका तुला म्यॅट्रिक व्हतां आलं न्हाइ कंदी. आता म्यॅट्रिक नांवाचा पिक्चर आलाय् आन् समदी लोकं खुळी जालीत त्याच्यापायीं. आपल्या सायबाची टायपिस ऍैन वक्ताला रुसली म्हनून मला दोन तिकटं दिलीत त्यानं. तर येनार का बगायला फुकटात ? तो बगितल्यावर तरी म्यॅट्रिक व्हशील लेका. म्या म्हनालो, जाऊ की, काय नाय तर थंडगार हवेत झ्वाप तरी मिळंल निवांत.
थेटर बगूनच गपगार झालतो, पिक्चर तर काय जबरी व्हतं राव माला जे समजलं तसं सांगतो तुमास्नी. पैल्याछूट येका बिल्डिंगीवर पोलिस आन् काळ्या गोगल घातलेल्या मानसांचा वेढा मंग गोळीबार. येक काळ्या कापडांतली बया कांपुटरवर, काळे चष्मेवाले तिला पकडायला बगतात. त्येच्या मायला, ती बया पळाया लागते, येका बिल्डिंगीवरुन दुसरीवर. गावंतच न्हाइ, जाते पळून. मंग येक पोरगा दिसतो, त्येला कांपुटर उठवतोय्, ते मंग हापिसात जाताय तेच्या. थितं फोनवर येक बाप्या सांगतो, तुज्या मागावर मानसं लागलीयात् तंवा पळ काढ लेकां. त्ये खाली वाकून पळतंय येका केबिनमंदी. थितं फोनवाला बाप्या तयाला खिडकीभाईर जायला सांगतो. ह्ये जातंय् पन् मोबाईल पाडतं खाली. मंग घाबरुन आंत येतं. काळे चष्मेवाले पकडतात आन् आडवा करुन येक र्हइमानी किडा त्याच्या प्वाटांत घालतात. त्ये बोंबलू पाहतं तर व्होठ शिवलेलं. जागं हुतं तर घरात खाटल्यावर. मायला, म्हंजी हा माज्यासारकाच दिसतुय, सपान बगनारा.