कुमार ज़ावडेकरांच्या आव्हानाला मनोगतावरील वीर बाजीरावांसारखे (दीड?) पराक्रमी (की दीड बाजीरावांसारखे वीर पराक्रमी?), रावसाहेब नि जिजींसारखे रथी-महारथी असूनही रसग्रहणाच्या रुपात अज़ून कुणीच आव्हान दिलेले नाही, हे पाहून मला स्वस्थ बसवेना. त्यातून गुरुवारी रात्री स्वयंपाकाची पाळी असली, की माझ्या अंगात अनायसे वीरश्री संचारलेली असतेच. तिचाच परिणाम म्हणून हे काहीतरी लिहितोय. हे रसग्रहण "पाडले" आहे की "झाले आहे" (म्हणजे तात्या अभ्यंकरांना कविता होते, तसे मला रसग्रहण झाले आहे, या अर्थी नव्हे!!) हे माझ्यापेक्षा इतर ज़ाणकारच जास्त चांगले सांगू शकतील. मात्र तरीही, हे जे काही आहे, ते माझ्या(च) साइज़च्या गंजीफ़्रॉकात घट्ट बसवले आहे, हे मात्र आवर्ज़ून नमूद करावेसे वाटते.