पितांबर व पुजेचे वस्त्र
धार्मिक प्रसंगी पीतांबरासारखे वस्त्र किंवा पूजा तसेच विवाहदी मंगल कार्ये खास कपड्यांवर करण्यामागे काही शास्त्रीय व वैज्ञानिक कारणे असल्याचे दिसून आले आहे.
'गणवेश' ही कल्पना विविध क्षेत्रांत प्रचलित झालेलीच आहे. वातावरण निर्मीती होण्यास आपण घातलेले कपडे हे मदतच करतात. देवकार्य म्हणजे पूजा, होम व नित्य आन्हिक आणि पितृकार्य (म्हणजे श्राद्ध) या धार्मिकप्रसंगी अंगावर नेहमीचे कपडे असणे योग्य नाही. यामागे नुसता धार्मिक दंडक आहे असे नाही तर वैज्ञानिक कारणेही आहेत. उदाहरणार्थः विवाहादिप्रसंगी कडक सोवळे पाळणे हा मुळीच उद्देश नसतो. (ज्या धार्मिकप्रसंगी पुण्याहवाचन केले जाते तेथे स्वयंपाकधरात व बाहेरही कडक सोवळ्याची मुळीच अपेक्षा नसते.) परंतु विवाहादि धार्मिक प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा जास्तीत जास्त परिणाम देह, मन, बुद्धी ह्यांवर व्हायचा असेल तर त्या व्यक्तीने समाजात वापरलेला, कुसंस्कारांनी भरलेला पोषाख वरवर स्वच्छ दिसत असूनही वापरू नये. शिवाय ईतरांपेक्षा निराळा पोषाख परिधान केल्यावर त्या व्यक्तीबरोबर इतरांनी संपर्क साधण्याची क्रिया आपोआपच मंदावल्यामुळे धार्मिक कार्यांत त्याचे पूर्ण लक्ष लागण्यास मदत होते.