श्री समर्थांनी पूर्णब्रह्म आणि मायेच्या सत्य स्वरूपाचे विवरण केले. जे दृश्य आहे ती माया आहे, असत्य आहे. आणि सत्य जे आहे ते अदृश्य आणि निराकार आहे असे समजावले. परंतु श्रोत्यांच्या मनीचे शंकानिरसन काही होईना. जर सगुण मूर्ती स्वरूपात पुजलेले देव म्हणजे माया आहे, तर त्यांची उपासना का करावी? भजन, पूजन, कीर्तन हे सर्व निरर्थकच म्हणायचे का ?
म्हणून ते समर्थांना विचारतात ..
जे समस्त नासिवंत । त्यासी भजावे किंनिमित्य ।
सत्य सांडून असत्य । कोणे भजावे ॥
असत्याचा प्रत्यये आला । तरी मग नेम का लागला ।