दिवाळीच्या सुमारास पिके तयार होतात त्यामुळे सणाला घरात धान्यधुन्य भरलेले असे. फराळाला 'घरी कांडलेल्या' पोह्यांचा चिवडा, रव्याचे लाडू, करंज्या, शंकरपाळे आणि कडबोळी असत. चकल्या केलेल्या आठवत नाहीत. दिवाळीच्या पहाटे पाणचूल रसरसून पेटवत असू. अंगाला आई तेल लावत असे आणि घरातच तयार केलेले उटणे लावून अभ्यंगस्नान होई. त्याच दिवशी वासाचा एकुलता एक साबण ]हमाम' लावत असू. लक्स, मोती सारखे इतर सुवासिक साबण तर आम्हाला माहितीच नव्हते. इतर वेळी अंघोळीकरता रिंगे म्हणजे रिठे लावत असू. बायकामाणसे रिठे व शिकेकाईने न्हात असत. नंतर देवाला नैवेद्य दाखवून फराळ केला जाई.