जानेवारी २००० मध्ये आम्ही अमेरिकेस आलो. मुंबापुरीतील घामाच्या धारांच्या गुलामीतून सुटून एकदम शून्यांच्या खाली तापमान असलेल्या प्रदेशात पोहोचलो. थंडीने दातखीळ बसली आणि पाठीच्या मणक्याचा पार निकाल लागला. हळूहळू आम्ही रुळलो. भुरभूर पडणारा, ऊन असतानाही तुषारासारखा अंगावर रुजणारा बर्फ, शेंबड्या बोरापासून ते मोठ्या गराळ बोरापर्यंतच्या गारांचा मारा कसा होतो आणि कसा लागतो ते अनुभवून झाले. काड्या झालेली झाडे बर्फमिश्रीत पाण्याच्या पुंगळ्या लेऊन समाधी लावून बसलेली असताना अचानक पडलेल्या लख्ख सूर्यप्रकाशाने काचेची होतात हे वर्णनातीत दृश्य डोळे भरून पाहून झाले.