ह्यासोबत
सहा महिन्यासाठी भारताबाहेर राहण्यात माझ्या दृष्टीने महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या काळात इकडल्या कोठल्याही कार्यालयाचे तोंड पाहावे लागत नाही.इथल्या कार्यालयात मग ते कोणतेही असो ,जायचे म्हणजे माझ्या अंगावर अगदी काटा उभा राहतो. अगदी आपल्या आपुलकीच्या माणसांची अशी जाहिरात केलेल्या बँकेतसुद्धा जायचे माझ्या जिवावर येते.आता ए.टी.एम्. वर पैसे काढण्याची सोय झाल्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जायचे काम कमीच पडते म्हणा पण त्यामुळे तर कधीतरीच बँकेत जाताना छातीत आणखीच धडधडू लागते.ए. टी. एम् . मुळे प्रत्यक्ष बँकेत जावे लागले नाही तरी तेथूनही दूरनियंत्रणाने ग्राहकास छळता येतच नाही असे नाही. एकदा माझ्या मित्राने एका नामवंत बँकेच्या पुणे विद्यापीठ द्वारावरील ए. टी. एम्.मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण बहुधा यंत्रातील कॅश संपल्यामुळे किंवा आणखी कोणत्यातरी कारणामुळे पैसे काही मिळाले नाहीत मात्र जी स्लिप यंत्रातून बाहेर पडली त्यावरून पैसे खात्यातून मात्र वजा झाले होते.त्या बिचाऱ्याचे धाबे दणाणले.त्याने लगेच तेथूनच बँकेला फोन केला पण त्यांनी उलट निर्ढावल्यासारखे त्यालाच विचारले,"तुम्हाला पैसे मिळाले नाहीत कशावरून?"ते प्रकरण नंतर बरेच दिवस चालू होते.
मला मात्र एकदा कर्मधर्मसंयोगाने बँकेला छळण्याचा योग लाभला.त्यावेळी मी औरंगाबादला होतो आणि त्याच महान बँकेत माझे खाते होते.आणखी सुदैवाने माझे तेथील एका खिडकीधारकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे मला पैसे काढायला काही त्रास व्हायचा नाही.त्यावेळी पैसे चेकने काढण्याऐवजी बँकेतील स्लिप भरूनच काढले जायचे.(आजही त्या बँकेचा आग्रह असतो की चेकचा कागद महाग असल्यामुळे पैसे स्लिपनेच काढा किती ही काटकसर !)त्यामुळे पासबुकच्या नोंदीवरूनच आपली शिल्लक(असलीतर) काय आहे हे कळायचे.माझे पासबुक संपले होते आणि मी मागणी करूनही मला नवे पासबुक मिळाले नव्हते तसे मी शाखाप्रमुखांच्याही निदर्शनास आणले होते.त्यामुळे माझ्या खात्यात शिल्लक आहे का नाही आणि असल्यास किती आहे याची कल्पना मला नव्हती. खिडकीवरील मित्राने शिल्लक असेल या कल्पनेने मला हवी ती रक्कम दिली आणि मी खिडकी सोडली.त्यानंतर माझी बदली औरंगाबादहून सोलापूरला झाली आणि मला त्वरित सोलापूरला जावे लागले.सोलापूरला मी थोडा स्थिरस्थावर होईतोवर एक दिवस अचानक आमच्या घरी त्या बँकेचे मॅनेजरमहोदय हजर झाले.मला आश्चर्यच वाटले कारण त्यांचा आणि माझा परिचय असला तरी लगेच सोलापूरला माझ्या घरी येऊन माझी गाठ घ्यावी इतका दृढ नव्हता.त्यांचे बँकेचे काम तेथे निघाल्यामुळे आलो अशी सुरवात करून अंदरकी बात नंतर उघड करत ते म्हणाले ," अहो,तुमच्या खात्यात रक्कम नसताना तुम्ही पैसे काढलेत आणि इकडे आलात आता आमची पंचाईत झाली आहे." यावर मी बँकेकडून नवीन पासबुक न मिळाल्यामुळे असे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणल्यावर आता झाले ते झाले पण आता लवकर पैसे भरून टाका अशी विनंती त्यांनी केली.मी बँकेला पत्र लिहून माझी चूक नसताना असे झाल्यामुळे मला शक्य होईल त्यावेळी आणि त्या पद्धतीने मी पैसे भरेन असे कळवले आणि तसेच केले.
भारतात कोणत्याही कामासाठी शासकीय वा निमशासकीय कचेरीत जायचे म्हणजे माझे मानसिक संतुलन तेथे जाण्यापूर्वीच आपल्याला कोणते अनुभव येणार या कल्पनेने बिघडायला सुरवात होते कदाचित हा माझाही दोष असू शकेल. कोणत्याही ऑफिसच्या खिडकीमागील व्यक्ती आपल्याकडे शत्रुवत् पाहत आहे असे उगीचच वाटते. तरुण वयात अंगात रग असल्याने अशा व्यक्तीशी आवश्यक असल्यास भांडण्याची खुमखुमी होती पण आता तो उत्साह उरला नाही. ऑफिस ऑफिस ही पंकज कपूरची मालिका जरा अतिशयोक्तिपूर्ण असली तरी त्यातील निरनिराळ्या ऑफिसात येणारा अनुभव बऱ्याच अंशी आपल्याला येणाऱ्या अनुभवांशी मिळताजुळता असतो.कोणत्याही ऑफिसात न जावेसे वाटण्यामागे हेच कारण असते. त्यामुळे अमेरिकेत अशा कामाविषयीचे काही अनुभव मुलाकडून ऐकल्यावर येथील सामान्य नागरिकाचा हेवाच वाटू लागला.
माझ्या मुलाला ग्रीनकार्ड मिळण्याच्या वेळी जन्मतारखेचा दाखला आवश्यक होता.आजपर्यंत त्याच्या एस्.एस्. सी. च्या प्रमाणपत्रावरील तारखेवर काम भागत होते पण आता मात्र येथील कार्यालयाला त्याचा जन्म ज्या तहसील वा ग्रामपंचायत क्षेत्रात झाला त्यांचाच म्हणजे सुजितच्या बाबतीत औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्यविभागाचाच हवा होता.जन्ममृत्यूच्या दाखल्याविषयी आकाशवाणीवरील (त्यावेळी टी.व्ही. ऊर्फ दूरदर्शन नव्हते) निवेदक कानीकपाळी ओरडत असतानाही नेहमीच्या आळशी प्रवृत्तीनुसार लगेच आवश्यक नसल्यामुळे त्याच्या जन्माचे प्रमाणपत्र ताबडतोब घेऊन ठेवावे असे काही मला वाटले नाही. मुलांना शाळेत घालतानासुद्धा आम्हाला या दाखल्यांची जरुरी पडली नव्हती त्यामुळे सुजितचा जन्माचा दाखला आपण घेतलाच नाही याची आठवण जेव्हा त्याने आम्हाला फोन करून त्याची अडचण सांगितली तेव्हा झाली .त्याच्या एका मित्राचा जन्म सोलापूरला झाला होता त्यालाही अशीच अडचण उपस्थित झाली होती.आपापल्या महापालिकांमध्ये आम्ही पालकांनी बऱ्याच चकरा मारण्यासाठी कंबर कसली. कारण इतक्या पूर्वीचे प्रमाणपत्र मिळवायचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख शोधण्यासारखे इतिहाससंशोधनाचे काम होते आणि ते महापालिका कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे होते. त्यामानाने मी सुदैवी ठरलो कारण सुजितचा जन्म शासकीय रुग्णालयात झाला होता आणि सुजितच्या जन्माचे रेकॉर्ड रुग्णालयातून महापालिकेला गेल्याचा पुरावा उपलब्ध झाला त्याचा उपयोग होऊन शिवाय थोडासा हात मोकळा सोडल्यावर काम झाले.
सुजितच्या मित्राच्या वडिलांना म्हणजे माझ्या सोलापूरच्या मित्राला महापालिकेने बऱ्याच चकरा मारायला लावून शेवटी काही ताकास तूर लागू दिली नाही.त्यांचा लगेचच अमेरिकेस जाण्याचा बेत होता त्यामुळे बरोबरच प्रमाणपत्र घेऊन जायचे त्याने ठरवले होते पण आता ते शक्य नव्हते म्हणून त्यांनी अमेरिकेत गेल्यावर तेथे तसे शपथपत्र (ऍफिडेविट)करायचे असे ठरवले. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर अगदी प्रथम ते काम करायचे त्यांनी ठरवले.त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने नोटरीच्या कार्यालयात फोन करून अशा प्रकारचे ऍफिडेविट करावयाचे आहे त्यासाठी पूर्वसम्मती मागितल्यावर त्याला नोटरीने एका विशिष्ट दिवशी वडिलांना घेऊन येण्यास आणि काही कागदपत्र पुरावा म्हणून घेऊन येण्यास सांगितले. माझा मित्र त्या दिवशी सांगितलेल्या वेळी गेला. नोटरी त्याच्या टेबलावर सर्व कागदपत्र घेऊन वाटच पाहत होते.त्याची जी काही फी होती ती भरून पावती त्यांना दाखवल्यावर त्यांनी माझ्या मित्राच्या सह्या त्या ऑफिसने तयार केलेल्या कागदपत्रावर घेतल्या हे काम साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटात झाले आणि भारतात असलेल्या नोटरीच्या अनुभवानंतर देण्याघेण्याच्या वाटाघाटी काय करायच्या या चिंतेत असणाऱ्या मित्राला अधिकाऱ्यानेच "तुमचे काम झाले आहे आता तुम्ही जाऊ शकता" असे सांगितल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने नंतर मला हे सांगितल्यावर आपणही उगीचच महापालिकेच्या चकरा मारल्या असे वाटून गेले.
वरील घटना केवळ अमेरिकेत सामान्य नागरिकांना लहानसहान कामासाठी कसा त्रास होत नाही याचे उदाहरण म्हणून सांगितली.मात्र अशा सोप्या पद्धतीने गोष्टी होत असल्याने जन्माचा दाखला किंवा खोटे पासपोर्टसुद्धा दहशतवादी किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार कसे मिळवतात याचे वर्णन ऑर्थर हेली यांच्या द इव्हिनिंग न्यूज या कादंबरीत वाचायला मिळाल्यावर सामान्य नागरिकास त्रास झाला तरी चालेल पण देशाचे नुकसान व्हायला नको या हेतूने प्रेरित झाल्यामुळेच भारतीय पालिका, पोलिस किंवा पासपोर्ट ऑफिसमधील कर्मचारीही आपले काम एवढ्या बारकाईने करतात हे ध्यानात येऊन त्यांच्या दक्षतेचे कौतुक करावेसे वाटले मात्र त्यांच्या या दक्षतेतून नेमकी नको असलेले (किंवा पोलिसांना हवे असलेले)लोकच कसे सुटतात हे कोडे मात्र उलगडले नाही.
अमेरिकेतील ऑफिसचा आणखी एक अनुभव माझ्या मुलाला मोटर चालन परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) घेण्याच्या वेळी आला.त्याला भारतात चारचाकी वाहन चालवण्याचा कायम स्वरूपाचा परवाना होताच पण येथील नियम वेगळे शिवाय लेफ्ट हँड ड्राइव्ह असल्यामुळे त्याला येथील आर. टी. ओ. (त्याला येथे डिपार्टमेंट ऑफ मोटर व्हेइकल्स म्हणतात)कडे जाणे आलेच.आमच्या घराजवळील ऑफिसला त्याने भेट दिली तेव्हा ते डी. एम्. व्ही. ऑफिस नसून एकाद्या छोट्या आय.टी.कंपनीचे ऑफिस असावे असे त्याला वाटले. आत शिरताच त्याला एक छोटा फॉर्म स्वागतिकेकडून मिळाला आणि तो भरून दिल्यावर लेखी परीक्षेसाठी एका संगणकाकडे त्याला पाठवण्यात आले. वाहन चालनाच्या नियमांविषयी ३० प्रश्न संगणकावर त्यांना विचारण्यात येतात आणि त्यातील ८०% प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे आवश्यक होते.माझ्या मुलाने अगोदरच तयारी केल्यामुळे त्याने २४ प्रश्नांची उत्तरे ओळीने बरोबर दिल्यावर त्याला पुढचे प्रश्न न विचारताच तू पास झाला आहेस असे संगणकावर सूचित करण्यात आले.त्यानंतर प्रत्यक्ष गाडी चालवण्यास सांगतील असे त्याला वातलए पण तसे काही न होता एकदम त्याच्या हातात परवानाच देण्यात आला,कारण त्याला पुणे आर.टी.ओ.कडून चारचाकी वाहन चालवण्याचा कायम परवाना मिळालेला होता आणि बहुधा पुण्यात गाडी चालवणारा जगात कोठेही गाडी चालवू शकेल याचा त्यांना विश्वास असावा. तसा परवाना नसलेल्या त्याच्या बायकोलाही काहीही कटकट न करता परवाना मिळाला मात्र तिला प्रथम शिकाऊ परवाना काढून काही दिवसांनी लेखी ( संगणकापुढील) परीक्षा देऊन प्रत्यक्ष गाडी चालवून दाखवावे लागले.
याच ऑफिसने एका स्त्रीला या टेस्टसाठी जवळ जवळ २५-३० वेळा यायला लावले होते आणि इतक्या चकरा मारायला लावल्यावर तिने टेस्ट व्यवस्थित दिल्यामुळेच तिला परवाना देण्यात आला असे एका बातमीत मी वाचले होते. कदाचित त्या तरुणीने आपले नाव गिनीज बुकमध्ये यावे या हेतूने असे मुद्दामच केले असल्यास न कळे.पण आणखी एक मजेची गोष्ट म्हणजे एकदा मोटर ड्रायव्हिंग स्कूलची फी भरली की परवाना मिळेपर्यंत कोणतीही ज्यादा फी न घेता त्या व्यक्तीला ट्रेनिंग द्यावे लागते म्हणे.आपल्याकडे मात्र एकदा फी भरली की एका महिन्यात तुम्हाला गाडी चालवता येवो अथवा न येवो मोटर ड्रायव्हिंग स्कूल परवाना मिळवून देण्याची हमीच घेत असते.काही वेळा तुम्ही टेस्ट न देताही परवाना घरपोच मिळतो इतक्या सुविधा असल्यावर उगीचच आर .टी. ओ.कडे जाण्याची तसदी कशाला घ्यायची?
अमेरिकन शासकीय कार्यालये जरी सामान्य माणसाचा असा विचार करत असली तरी काम बारकाईने आणि शक्य तेवढ्या कंटाळवाण्या पद्धतीने करण्याचा भारतीय बाणा आपण सोडायला तयार नसतो. याचा अनुभव आपल्या पर्वण्यांचे नूतनीकरणाच्या वेळी माझ्या मुलांना आला. न्यूयॉर्कमधील भारतीय [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]पासपोर्ट ऑफिससुद्धा कोणत्याही भारतीय शहरातील पासपोर्ट ऑफिसच्या तोंडात मारेल इतके गचाळ आणि तितकेच अकार्यक्षम आहे. न्यूयॉर्कमधील एका जुनाट इमारतीच्या तळघरातील दोन खोल्यांमध्ये हे थाटलेले आहे.[/float] पासपोर्ट आणि व्हिसासंबंधित वेगवेगळी कामे सांभाळण्यासाठी यात आठ खिडक्या किंवा टेबले आहेत,पासपोर्टचीच कामे जास्त असतात कारण भारतात जाण्यासाठी व्हिसा मागायला अमेरिकन नागरिकांची अजून गर्दी व्हायला सुरवात झाली नाही.(मध्ये एका पेपरमध्ये एक कार्टून आले होते त्यात रुपया इतका वधारलाय की भारतात जायला व्हिसा मिळत नाही याबद्दल एक अमेरिकन नागरिक खट्टू झाल्याचे दाखवले आहे`.)त्यामुळे खरे तर पासपोर्टचेच काम महत्त्वाचे असून त्यासाठी तीन खिडक्यांचा वापर करण्यात येतो आणि इतर बिनमहत्त्वाच्या कामासाठी बाकीच्या खिडक्यांचा! त्यामुळे पासपोर्टच्या खिडक्यांसमोर बऱ्याच लांब रांगा असतात बऱ्याच वेळा एवढ्या माणसांना उभे राहायला पुरेशी जागाही त्या ऑफिसात नाही.
पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी लागणारे सर्व कागदपत्र घेऊन आणि जुना पासपोर्ट घेऊन आपण त्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यावर रांग लावायच्या जागेपासून अडचणीस सुरवात होते इतकी ती जागा आकाराने लहान आहे,नेहमीप्रमाणे या खिडकीवर नको त्या खिडकीवर जा असे होऊन एका खिडकीवर कागदपत्र स्वीकारले जाऊन त्याची पावती मिळाल्यावर खास भारतीय पद्धतीनुसार आमच्या चिरंजीवांना एक आठवड्यानंतर पासपोर्ट न्यायला येण्यास सांगण्यात आले .आता परत एक दिवस रजा काढून येण्याऐवजी त्यातल्या त्यात प्रयत्न करायचा म्हणून त्यांनी सांगितलेल्या दिवशी ऑफिसमधून जरा लवकर निघून पासपोर्ट मिळतो का पाहावे असा त्याने विचार केला.पासपोर्ट ऑफिसमधील बऱ्याच खिडक्यांपैकी एकावर उभा राहिल्यावर त्याचा नंबर आल्यावर पावती पाहून ही पावती ज्या खिडकीवर मिळाली त्याच खिडकीवर जा असा सल्ला देण्यात आला.त्या खिडकीवर बरीच गर्दी होती शिवाय त्या रांगेतील पहिला क्रमांक खिडकीतून दिसणाऱ्या माणसाशी हुज्जत घालत होता त्याअर्थी आपले काम आज होत नाही अशी चिरंजीवांची खात्री पटली पण तेवढ्यात त्या खिडकीवर जास्त गर्दी आहे असे पाहून त्यावरील काही व्यक्तींनी शेजारच्या खिडकीवर जावे अशी सूचना करण्याचे सौजन्य दाखवण्यात आले खरे पण झटपट ती खिडकी गाठणाऱ्या माझ्या मुलाने ती पावती दाखवताच त्या खिडकीतील कर्मचाऱ्याने मात्र त्या सौजन्याची ऐशी तैशी असे म्हणत हा क्रमांक माझ्याकडे नाही असे म्हणून हात झटकले पण माझ्या मुलाने दोनच मिनिटापूर्वी तुम्हीच अशी घोषणा केली होती असे सांगितल्यावर आणि सुदैवाने शेजारील खिडकीतील व्यक्तीकडे त्या क्रमांकाचा पासपोर्ट होता हे ध्यानात आल्यामुळे त्याला तो मिळाला खरा पण पुढच्या लोकांना मात्र दुसऱ्या दिवशीच या असे सांगण्यात आले. हा अनुभव ऐकल्यावर आपण भारतातच आहोत असे वाटून गेले.तरीही आपल्याकडे पासपोर्ट नूतनीकरण म्हणजे अगदी पुनश्च हरी ओम् असा जो प्रकार असतो म्हणजे पुन्हा पोलिस चौकशी वगैरे सव्यापसव्यास तोंड द्यावे लागते तेवढा तरी येथे नसतो एवढीच त्यातल्या त्यात जमेची बाब!