अमेरिकायण! (भाग २: घर देता का कुणी घर..)

तर मी (एकदाचा) अमेरिकेत दाखल झालो.. आता पुढे काय? ऑफिसच्या गाडीने मला हॉटेलवर आणून सोडले होते. त्या बांगलादेशी टॅक्सीचालकाचे (माफ करा.. कॅबचालकाचे  ) मी टीप न घेतल्याबद्दल मनापासून आभार मानून हॉटेलच्या रूम मध्ये बसलो आणि दार लावून घेतलं!!

हुश्श्श्श्श!!!!! पोचलो एकदाचा. मी दोन मिनिटं अगदी शांत बसून होतो. डोळ्यासमोरून गेला महिना चित्रपटासारखा झरझर सरकत होता. ती धावपळ, गडबड, घरातलं कधी न अनुभवलेलं वातावरण, अज्ञाताची एक अनामिक भीती, नवीन जबाबदारीची चिंता, व्हिजा - तिकिटासाठीची पळापळ, पुढे कस्टम्स वगैरेची काळजी या सगळ्या गडबडीत मी या जागी येऊन पोहोचलो होतो. ती दोन मिनिट मी कधीच विसरणार नाही. मी याआधी जगणारं एक विश्व आता केवळ भावविश्व झालं होतं, आणि ज्या विश्वाला मी केवळ कल्पनेत पाहत होतो ते भावविश्व आता मी अचानक जगत होतो. एक युद्ध संपलं होतं आणि नवीन आव्हानं उभी राहायची होती. आयुष्याच्या प्रवासात काही क्षण असे येतात, जिथे उभं राहिलं की केलेला प्रवास पाहून मन भरून येत आणि पुढच्या प्रवासासाठी जिद्द निर्माण होते. तोच हा एक क्षण. खरंतर ही दोन मिनिटं म्हणजे काही फार मोठा काळ नव्हे ज्यावर अख्खा परिच्छेद खर्ची जावा, पण ही दोन मिनिटं मला एक वेगळा अनुभव देऊन गेली, स्वतंत्रपणाचा, स्वायत्ततेचा, नवीन जबाबदारीच्या जाणीवेचा.

असो. हळूहळू आता नवीन नवीन शंका जाणवू लागल्या होत्या. अनेक छोट्या शंका तर होत्याच पण सगळ्यात मोठी म्हणजे 'निवाऱ्याची सोय'! आमच्या नात्यातले कोणीही अमेरिकेत नाहीत. माझ्या इंटरनॅशनल मित्रांपैकीही इथे कोणीच नव्हतं त्यामुळे जागेचा शोध संपूर्णपणे माझी जबाबदारी होती.  त्यात अस्मादिक आजन्म मुंबईतच राहिलेले असल्यामुळे घर शोधायचं म्हणजे नक्की काय करायचं? ते कुठे शोधतात? घर घेताना नक्की काय बघायचं? असे अनेक प्रश्न आ वासून उभे होते.

एकतर इथे सगळं उलटं, खटका वर केल्यावर दिवे लागतात इथ पासून रस्त्यावरच्या वाहतुकीपर्यंत. 'नेहमी डावीकडून चालावे' असे हज्जारदा घोकणाऱ्या मला उजवी कडून चालणारी माणसं आडवी येत होती.(खरंतर मी त्यांना आडवा येत होतो  ). ह्या सगळ्या गोंधळात संपूर्ण नवीन शहरात कोणी सांगितलं की बाबा, अमुक अमुक पत्त्यावर एक घर आहे भाड्यावर देण्यासाठी, तरीही काहीही फायदा नव्हता. कारण मुळात तो 'पत्ता' कुठे आहे याचा कोणाला पत्ता होता? त्यामुळे सुरवातीचे दिवस सैरभैरच होतो. एकतर इतकं एकटं राहायची सवय नाही, त्यामुळे "फ़ॉर रेंट" अश्या पाट्या असलेल्या घरात भाड्याने भुतासारखा काही मी राहू शकत नव्हतो. आता घराचं काय? हा प्रश्न डोळ्यापुढे नाचतच होता.

ऑफिस मध्ये त्यांचे बॅकग्राऊंड चेक (माझ्याबद्दलच्या सत्यासत्यतेची पडताळणी) करून झाल्यावर शेवटी एकदाच महाजाल (इंटरनेट) हाती लागलं आणि ऑफिस मधल्यांच्या मदतीने जवळचे भाग कोणते, लांबचे कोणते कळू लागलं होतं. प्रत्येक जण वेगवेगळे अनुभव सांगत होता. त्यातलाच हा एक अनुभव थोडक्यात सांगतो: "माझ्या एका मित्राच्या मित्राची हि कथा. तो ही असाच आला होता अमेरिकेला पहिल्यांदा. एक घर त्याला आवडलं. त्याच्याकडे लागणाऱ्या डिपॉझिटच्या पेक्षा $२०  कमी होते. तो म्हणाला मालकाला मी पटकन ए.टी.एम. मधून पैसे काढून आणतो. तर मालक म्हणतात कसे , "पूर्ण पैसे भरल्याशिवाय हे घर तुम्हालाच देईन याची खात्री बाळगू नका". त्या मित्राने फारसं लक्ष न देता अर्ध्या तासात पैसे काढून आणले. पण तोपर्यंत ती जागा दुसऱ्या पूर्ण पैसे भरणाऱ्याला गेली होती."

एक ना दोन अश्या अनेक अनुभवींच्या गोष्टी कानावर पडत होत्या. मी पत्त्यांची यादी घेऊनच निघालो होतो घर खरेदीला. मला काही इथली घरं पसंतच पडेनात. एकतर सगळी घरं लाकडी त्यात कित्येक वर्ष जुनी. सगळीकडे तो बल्बचा पिवळा उजेड. (मला तर त्यावेळी ह्या पिवळ्या उजेडाची विलक्षण चीड आली होती. त्या पिवळ्या उजेडाने घराचं वातावरण दु:खी वाटू लागतं.) त्यातून प्रत्येक घराची तऱ्हा निराळी. कुठे विलक्षण गचाळपणा तर कुठे तिथे राहणाऱ्यांच्या अटीच भरपूर. काही घरात ३ खोल्यांत मिळून ७-८ जण राहत होते, तर काहींचा परिसर फारच भयाण!!! मी काही फार स्वच्छतेचा भोक्ता, किंवा फार टापटीप किंवा वक्तशीर असा काही नही आहे. पण मी फार अजागळ, अगदी कसाही राहू शकणारा असाही नाही आहे. त्यामुळे घराला साजेसं भाडं भरून ३-४ जणां बरोबर राहण्याचा माझा मानस होता.

मी ज्या जर्सी सिटी नामक शहरात राहतो त्याला गुजरातचं उपनगर म्हटलंत तरी चालेल. पण त्यामुळे जितक्या सोयी इथे आहेत तितकाच गचाळपणाही ह्या भागाला आला आहे. त्यामुळे मला एकतर कोणतीही जागा पसंत पडेना. आता अगदी शुक्रवार आला होता. उद्या ऑफिसच्या खर्चावर हॉटेलमध्ये राहण्याचा शेवटचा दिवस होता. मी आणि माझा एक ऑफिस मधला मित्र मला हवी तशी जागा मिळत नसल्याने अगदी वैतागलो होतो. आत हातातल्या यादीमध्ये शेवटचा पत्ता उरला होता. तो वाचताच मित्र म्हणाला अरे हि तर ४-५ मजल्यांची इमारत आहे. मला वाटले चला आणखी एक वेगळं घर!! दार वाजवलं! आतून एका गोऱ्या उंच आणि दणकट अश्या मुलाने दार उघडलं. "अहाहा! चक्क सफेद उजेड..!!! " मी तो उजेड पाहूनच खूश झालो  बाकी घरही ठीक होतं. पसारा होताच पण मुख्य म्हणजे स्वयंपाकघर आणि न्हाणीघर ह्या दोनही जागा स्वच्छ होत्या. एक दिवाणखाना, दोन बेडरूम्स, स्वयंपाकघर आणि दोन्ही बेडरूम्सवर त्यांच्या इतकाच मोठ्ठा माळा होता आणि माळ्यावर जायला जिना!! इतकी जागा आम्हा चौघांसाठी खूप होती

मी एकदाचा हिरवा बावटा दाखवला. आता एकच प्रश्न होता, त्या घरातलं कोणीही मराठी नव्हतं. इतकंच काय पण त्यातल्या दोघांनातर हिंदीसुद्धा येत नव्हतं. तरीही मी ठरवलं आता आपलं नवं घर हेच आणि हेच नवे मित्र!! ह्या घरात मला एकही शब्द कळत नसे पण तिघांनीही मला फार सांभाळून घेतलं त्या घरात आलेले अनुभव पुढे येतीलच. एकही मराठी / हिंदी शब्द ना बोलता राहायची मानसिक तयारी करून शुक्रवारी हॉटेलचा दिवा मालवला. डोळ्यांपुढे काहीच नव्हतं कारण जे घडत होतं ते इतकं नवीन होतं की मन आता नवीन गोष्टी शोधण्यापेक्षा जुन्यातच गुंतत होतं. आता ह्या नव्या पर्वातील नवा अध्याय चालू होणार होता.