...चुकले असावे

वागणे चुकले असावे
बोलणे चुकले असावे

पोचलो येथे कसा मी?
चालणे चुकले असावे

आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे

"अंतरे मिटलीच सारी"
मानणे चुकले असावे

ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे

गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!

तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे

.

(जयन्ता५२)