प्रायश्चित्त


आज १४ सप्टेंबर आज हिंदी दिवस आहे. त्यानिमित्ताने एका हिंदी कथेचा मी केलेला मराठी अनुवाद इथे देत आहे.
मूळ कथेचे शीर्षक : प्रायश्चित्त   लेखक : भगवतीचरण वर्मा.  
टीपः कथेतील काळ बराच जुना आहे, त्यामुळे त्यातील काही संदर्भ धक्कादायक वाटण्याचा संभव आहे.

 
कबरीला सबंध घरात सर्वांत प्रिय कोण असेल तर रामूची बायको आणि रामूच्या बायकोला घरातल्या कुणाचा सर्वांत जास्त राग येत असेल तर तो कबरीचा! रामूची बायको लग्न होऊन दोन महिन्यांपूर्वीच सासरी आली होती. नवऱ्याची आवडती होतीच पण सासूचीही लाडकी होती. जेमतेम चौदा वर्षांच्या त्या मुलीच्या हातात सासूनं कोठीच्या खोलीच्या किल्ल्या दिल्या. त्या किल्ल्या सुनेच्या कमरेला मोठ्या रुबाबात लटकायला लागल्या, घरातले नोकरचाकरही तिला मालकिणीसारखाच मान द्यायला लागले आणि मग सासूनं निश्चिंत होऊन देवाधर्मात मन गुंतवलं.

हे सगळं छान होतं पण काही झालं तरी सूनबाई होती फक्त चौदा वर्षांची एक लहानशी मुलगी! त्यामुळे व्हायचं काय? कधी कोठीचा दरवाजा उघडा राहायचा तर कधी कोठीच्या खोलीत बसल्या बसल्या तिला झोप लागायची. मग काय! कबरीचं चांगलंच फावायचं आणि ती दुधा-तुपाचा फन्ना उडवायची! कबरीच्या ह्या उद्योगांनी रामूच्या बायकोला अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. एकदा कढवलेलं तूप बरणीत ओतता ओतताच रामूची बायको पेंगायला लागली आणि उरलेलं तूप कबरीच्या पोटात! रामूची बायको दुधावर झाकण ठेवून स्वयंपाकीण काकूंना शिधा काढून द्यायला गेली. तेवढ्यात दूध खलास! पण एवढ्यावरच थांबलं नाही. रामूच्या बायकोच्या हलगरजीपणामुळे कबरीची चंगळ असायची. त्यामुळे कबरीला रामूच्या बायकोचा लळाच लागल्यासारखं झालं. पण त्यामुळे रामूच्या बायकोला जगणं मुश्किल झालं. तिनं रबडीची वाटी रामूच्या खोलीत नेऊन ठेवली तर रामू येईपर्यंत कबरीनं वाटी साफ करून टाकली होती! बाजारातून मलई मागवली होती त्यावेळी रामूची बायको विडा करत होती. तिचा विडा करून होतो न होतो तेवढ्यात मलई गायब.

रामूच्या बायकोनं मनातल्या मनात निश्चय केला की आता घरात मी तरी राहीन नाहीतर कबरी तरी! रणनीती आखली, दोन्ही पक्ष सावधपणे वावरायला लागले. मांजर पकडायचा पिंजरा आणला. त्यात दूध, साय, तूप एवढंच नव्हे तर उंदीरही ठेवले पण कबरीनं तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही.

कबरीचा उत्साह जास्तच वाढला. इतके दिवस ती रामूच्या बायकोला थोडीतरी भीत होती. आता तिला तिची भीती वाटेनाशी झाली. उलट ती तिच्या मागे मागे असायची, मात्र सुरक्षित अंतर ठेवून. कबरीच्या ह्या वाढत्या धीटपणामुळे रामूच्या बायकोची अवस्था आणखीच वाईट झाली. ती सासूची कितीही लाडकी असली तरी दूधदुभत्याची अशी वाट लागल्यामुळे तिला मधूनमधून सासूची बोलणी खायला लागायची आणि रामूला दुधातुपाशिवायचं जेवण जेवायला लागायचं.

एक दिवस रामूच्या बायकोनं नवऱ्यासाठी प्रेमानं खीर केली. दूध खूप आटवून अगदी दाट खीर बनवली. त्यात काजू, बदाम, पिस्ते यांचे काप घातले, मग ती खीर काचेच्या एका नक्षीदार वाडग्यात काढली, त्यावर सोन्याचा वर्ख लावला आणि तो वाडगा एका कोनाड्यात ठेवला. कोनाडा इतका उंच की कबरीची काय बिशाद तिथपर्यंत पोहोचायची! मग ती निवांतपणे विडे करायला लागली. कबरी वासाचा माग घेत त्या खोलीत आलीच. आत आल्यावर आटवलेल्या दुधाचा खमंग वास तिला आला. तिच्या लक्षात आलं, माल भारी आहे! कोनाड्याखाली उभं राहून तिनं उंचीचा अंदाज घेतला. इकडे रामूच्या बायकोचे विडे करून झाले होते. ती सासूबाईंना विडा द्यायला गेली आणि कबरीनं उंच उडी मारून काचेच्या वाडग्यावर पंजा मारला. त्यासरशी वाडगा खाली आला आणि जमिनीवर पडून त्याचा खळ्ळकन आवाज झाला.

आवाज ऐकताच रामूच्या बायकोनं घाईघाईनं सासूसमोर विडा जवळजवळ फेकलाच आणि धावत खोलीत आली. पाहाते तो काय? काचेच्या नक्षीदार वाडग्याचे तुकडेतुकडे झालेले आहेत, खीर जमिनीवर सांडलेली आहे आणि कबरीबाई त्यावर ताव मारताहेत! रामूच्या बायकोची चाहूल लागताच कबरीने सूं बाल्या केला!

आता मात्र रामूच्या बायकोच्या रागाने कळस गाठला. ती मनात म्हणाली आता तर हिला मी घरातूनच नाही तर जगातून नाहीसं करणार. रात्रभर तिला झोप आली नाही. कबरीवर कसा हल्ला केला तर आपला हेतू साध्य होईल हा एकच विचार तिच्या मनात रात्रभर चालला होता. सकाळ झाली. रामूच्या बायकोला जाग आली. तिनं डोळे उघडून बघितलं तर समोरच कबरी खोलीच्या उंबऱ्यावर बसून तिच्याकडे प्रेमाने बघत होती!

रामूच्या बायकोनं मनातल्या मनात काहीतरी ठरवलं आणि ती गालातल्या गालात हसत खोलीबाहेर पडली. पाठोपाठ कबरी पण गेली. रामूच्या बायकोनं एक दुधानं भरलेली वाटी उंबऱ्यावर ठेवली आणि ती दुसरीकडे गेली. हातात पाटा घेऊन ती हळूच आली तेव्हा कबरी लपलप दूध पिण्यात मग्न होती. संधी चालून आलेली पाहून रामूच्या बायकोनं सगळी शक्ती एकवटून पाटा कबरीच्या अंगावर आपटला. कबरी जरासुद्धा हलली नाही, ओरडली नाही, आरडली नाही, फक्त ती उलटी झाली आणि निपचित पडली.

पाट्याचा आवाज ऐकताक्षणी कामवाली केरसुणी टाकून, स्वयंपाकीण काकू स्वयंपाक अर्धा टाकून आणि रामूची आई पूजा अर्धवट सोडून घटनास्थळी पोहोचल्या. रामूची बायको अपराध्यासारखी खाली मान घालून उभी होती.

कामवाली म्हणाली, "अरे देवा! मांजरी मेली! बाईसाहेब, सूनबाईंच्या हातून मांजरी मेली. फाऽऽर वाईट झालं!

स्वयंपाकीण काकू म्हणाल्या, "बाई, मांजर मारणं आणि माणूस मारणं सारखंच असतं. जोपर्यंत सूनबाईच्या डोक्यावर हे पाप आहे तोपर्यंत मी नाही ह्या घरात स्वयंपाक करायची!"

सासू म्हणाली, "बरोबर आहे तुझं. जोपर्यंत सूनबाईच्या डोक्यावरून हे पाप उतरत नाही तोपर्यंत घरातल्या कुणाला अन्न काय, पाण्याचा थेंब सुद्धा घेता येणार नाही. सूनबाई, अगं हे काय करून बसलीस?"

तेवढ्यात कामवाली हळूच म्हणाली, "बाईसाहेब, गुरुजींना बोलवायचं का?"

हे ऐकून रामूच्या आईच्या जिवात जीव आला. ती म्हणाली, "अगं हो, खरंच, जा गुरुजींना बोलावून आण."

मांजर मेल्याची बातमी विजेसारखी सगळीकडे पसरली आणि रामूच्या घरी शेजारपाजारच्या बायकांची रीघ लागली. सगळीकडून प्रश्नांचा नुसती भडिमार चालला होता आणि सूनबाई आपली खाली मान घालून बसली होती.

पंडित परमसुख गुरुजींना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ते पूजा करत होते. बातमी ऐकताच त्यांनी घाईघाईनं पूजा आटोपली आणि स्वयंपाकघराकडे तोंड करून मोठ्या खुशीत येऊन बायकोला म्हणाले, "ऐकलंस का? स्वयंपाक करू नकोस. लाला घासीरामच्या नातसुनेनं मांजर मारलं. आता त्यांना  शास्त्रानुसार त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आपल्याला चांगलं गोडाधोडाचं यथेच्छ जेवायला मिळेल."

पंडित परमसुख चौबे रामूच्या कुटुंबाचे पुरोहित होते. गुरुजी ठेंगणे आणि स्थूल होते. उंची चार फूट दहा इंच आणि पोटाचा घेर अठ्ठावन्न इंच. गुरुजींचा चेहरा गोरापान, गुबगुबीत होता, मिशा मोठ्या मोठ्या आणि शेंडी जवळजवळ कमरेपर्यंत पोहोचत होती. असं म्हणतात की मथुरेत जेव्हा पट्टीच्या जेवणाऱ्या ब्राह्मणांचा शोध घेत असत तेव्हा पंडित परमसुख गुरुजींचा नंबर त्या यादीत पहिला असे.

गुरुजी रामूच्या घरी पोहोचले आणि कोरम पुरा झाला. रामूची आई, स्वयंपाकीण काकू, किसनूची आई, छन्नूची आजी आणि गुरुजी अशी पंचायत बसली. बाकीच्या बायका जवळ बसून सुनेबद्दल सहानुभूती व्यक्त करत होत्या.

किसनूच्या आईने सुरुवात केली, "गुरुजी, मांजर मारल्यावर कोणता नरक मिळतो?" गुरुजींनी पंचांग पाहिलं आणि म्हणाले, "नुसतं मांजर मारलं यावरून कोणता नरक ते कळत नाही. कोणत्या वेळेला ही घटना घडली ते पण कळलं पाहिजे. तरच नरकाचं नाव कळू शकेल."

स्वयंपाकीण काकू म्हणाल्या, "साधारण सकाळी सात वाजता असेल."

गुरुजींनी पंचांगाची पानं उलटली, त्यातलं काही तरी वाचलं. मग डोक्याला हात लावून काही तरी विचार केला. त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या, भुवया पण जरा वक्र झाल्या आणि मग गंभीर आवाजात म्हणाले,  "हरे कृष्ण, हरे कृष्ण! फार वाईट झालं! ब्राह्म मुहूर्तावर मार्जारहत्या! ह्याला शास्त्रात कुंभीपाक नरक सांगितला आहे. रामूच्या आई, हे फार वाईट झालं! 

रामूच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. रडवेल्या सुरात ती म्हणाली, "गुरुजी, आता तुम्हीच सांगा, काय करायचं?"

गुरुजी हसून म्हणाले, "रामूच्या आई, काही काळजी करू नका. अहो, आम्ही पुरोहित कशासाठी आहोत? शास्त्रामध्ये प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. ते केलं की सगळं ठीक होईल."

रामूची आई म्हणाली, "गुरुजी, म्हणून तर तुम्हाला बोलावलं. आता सांगा काय काय करायला लागेल?"

"विशेष काही नाही, एक सोन्याचं मांजर करून ते सूनबाईंच्या हातानं दान द्या म्हणजे झालं. जोपर्यंत हे दान दिलं जात नाही तोपर्यंत घर अपवित्र राहाणार. दान दिल्यानंतर एकवीस दिवस पाठ करायला लागेल."

छन्नूची आजी म्हणाली, "हो, गुरुजी बरोबरच सांगतायत. मांजराचं दान आता लगेच करावं आणि मग एकवीस दिवस पाठ करावा."

रामूची आई म्हणाली, "बरं. मग गुरुजी, किती तोळ्याचं मांजर करावं लागेल?"

गुरुजी हसले आणि आपल्या गरगरीत पोटावरून हात फिरवत म्हणाले, "किती तोळ्याचं मांजर?? अहो रामूच्या आई, शास्त्रात लिहिलंय, मांजराच्या वजनाइतक्या वजनाचं मांजर करावं. पण आता कलियुग आलंय, धर्मकर्म काही राहिलं नाही, लोकांच्या मनात श्रद्धा नाही. तेव्हा रामूच्या आई, मांजरीच्या वजनाइतक्या वजनाचं मांजर कोण बनवणार ह्या दिवसात! कारण मांजरीचं वजन वीस-एकवीस शेराहून कमी असणार नाही. आता एकवीस शेर नाही तरी निदान एकवीस तोळ्याचं तरी मांजर करून ते दान द्यावं असं माझं मत आहे. ह्याउपर आता ज्याची त्याची श्रद्धा!"

रामूची आई डोळे विस्फारून गुरुजींकडे बघायला लागली. "अरे बापरे, एकवीस तोळे सोनं! गुरुजी, एका तोळ्याच्या मांजरीनं काम नाही का भागणार?"

गुरुजी हसून म्हणाले, "रामूच्या आई, एका तोळ्याचं मांजर! सूनबाईपेक्षा पैसा जास्त आहे का? सूनबाईच्या डोक्यावर एवढं मोठं पाप आहे. अशा वेळी पैशाचा इतका लोभ बरा नाही!" मग वाटाघाटी सुरू झाल्या आणि अकरा तोळ्याच्या मांजरावर येऊन थांबल्या.

मग पूजापाठ करण्यासंबंधी चर्चा सुरू झाली. गुरुजी म्हणाले, "रामूच्या आई, त्याची काही काळजी करू नका. अहो, आम्ही कशाला आहोत? मी आमच्या घरी पाठ करत जाईन. तुम्ही आमच्या घरी पूजेचं साहित्य पाठवण्याची व्यवस्था करा."

"पूजेचं सामान काय काय लागेल?"

"फार नाही लागणार. मी अगदी शक्य तितक्या कमी खर्चात पूजा करीन. दान देण्यासाठी दहा मण गहू, मणभर तांदूळ, मणभर डाळ, मणभर तीळ,  पाच मण चणे, चार पासरी तूप आणि हो, मणभर मीठही लागेल. एवढ्यात मी भागवीन."

"असे बापरे, एवढं सामान! याला तर शे-दीडशे रुपये खर्च येईल."  रामूची आई जरा रडवेली होऊन  म्हणाली.

"पण ह्याच्यापेक्षा कमी सामानात होणार नाही. रामूच्या आई, खर्चाकडे बघण्यापूर्वी सूनबाईच्या डोक्यावर पाप केवढं आहे ते बघा! त्या पापाचं हे प्रायश्चित्त आहे. ही काही साधीसुधी गोष्ट नाही. शिवाय ज्याची जशी ऐपत तसा खर्च त्याला प्रायश्चित्तात करावा लागतो. तुम्ही गावातले चांगले सधन लोक. तुम्हाला शे-दीडशे म्हणजे काही जास्त नाहीत."

पंचांच्या मनावर गुरुजींच्या ह्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम झाला! किसनूची आई म्हणाली, "गुरुजी बरोबरच म्हणतायत. मांजर मारणं म्हणजे काही लहानसहान पाप नाही. मोठ्या पापासाठी मोठा खर्च करायलाच पाहिजे." पाठोपाठ छन्नूची आजी म्हणाली, "नाही तर काय? दानधर्म केल्यानंच पापं फिटतात. दानधर्मात काटकसर बरी नाही." मग स्वयंपाकीण काकू म्हणाल्या, "आणि बाई, तुम्ही तर बडे लोक! एवढासा खर्च तुम्हाला जास्त नाही."

रामूच्या आईनं पाहिलं, सगळे पंच गुरुजींच्या बाजूनं आणि गुरुजींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य! गुरुजी म्हणाले, "रामूच्या आई, एका बाजूला सूनबाईसाठी कुंभीपाक आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला थोडा खर्च करावा लागणार आहे. तेव्हा त्याला नाही म्हणू नका."

रामूची आई नाईलाज झाल्यासारख्या सुरात म्हणाली, "आता काय तुम्ही सांगाल ते करायलाच पाहिजे."

गुरुजी चिडून म्हणाले,"रामूच्या आई, ही स्वखुशीनं करायची गोष्ट आहे, तुम्हाला हे करताना एवढा त्रास होणार असेल तर हा मी चाललो." असं म्हणत पंचांग वगैरे आवरून ते जायला निघाले. तेवढ्यात स्वयंपाकीण काकू, किसनूची आई आणि छन्नूची आजी एका स्वरात म्हणाल्या, "अहो गुरुजी, असे चिडू नका. रामूच्या आईला काही त्रास बीस होणार नाही. अहो, त्या बिचाऱ्या किती दु:खात आहेत. तुम्ही असे चिडू नका."

रामूच्या आईनं तर गुरुजींचे पाय धरले. मग गुरुजींनी पुन्हा बैठक मारली. रामूची आई म्हणाली, "आणखी काय काय करायला लागेल?"   

गुरुजी म्हणाले, "एकवीस दिवसांच्या पाठाचे एकवीस रुपये आणि एकवीस दिवस रोज पाच-पाच ब्राह्मणांना दोन वेळा जेवायला घालायला लागेल."  थोडं थांबून पुढे म्हणाले, "पण त्याची चिंता करू नका. मी एकटाच दोन्ही वेळेला येऊन जेवेन. माझ्या एकट्याच्या जेवणानं तुम्हाला पाच ब्राह्मणांना जेवायला घातल्याचं पुण्य मिळेल."

स्वयंपाकीण काकू किसनूच्या आईच्या कानात कुजबुजल्या. "हे बरीक खरं हो! गुरुजींच्या पोटाचा घेर तर बघा!" हे ऐकून किसनूची आई तोंडावर पदर धरून हसली. सुदैवानं हे गुरुजींच्या कानावर गेलं नाही. ते आपल्या बोलण्यातच गर्क होते. "तर, रामूच्या आई, आता कामाला सुरुवात करूया. अकरा तोळे सोनं काढा, मी मांजर बनवून आणतो. दोनेक तासात मी परत येईन. मधल्या वेळात पूजेची तयारी करून ठेवा. आणि हे बघा, पूजेसाठी.."

गुरुजींचं बोलणं पुरं व्हायच्या आत मोलकरीण धापा टाकत आली आणि सगळे एकदम चमकले. रामूची आई आधीच गांजून गेली होती. तिला वाटलं आता आणखी काय उद्भवलं? चिडून मोलकरणीला  म्हणाली, "अगं गधडे, लवकर सांग की काय झालंय ते!"

मोलकरणीच्या तोंडातून कसेबसे हे शब्द बाहेर पडले, "बाईसाहेब, मांजरी तर उठून पळून गेली."
---------------------------