चिरंजीवी चिन्मयीस,

लेखन प्रकार: आत्मसंवाद/ स्वसंवाद (monologue)




चिरंजीवी चिन्मयीस,

 

अनेक आशीर्वाद. काल अनिलाचा फोन आला होता. तिच्याकडून तुझी हालहवाल कळली. तू घर सोडून गेल्याला आठवडा झाला आहे. अनिलाकडे कितीदा फोन केला मी; पण तुला बोलायचंच नाही माझ्याशी आणि आपल्या घरांतले वाद लोकांसमोर सुरू करणे नको वाटते म्हणून मी ही टाळते आहे. मला माहित्ये की आपल्या दोघींच्या मनात वादळ सुरू आहे. परंतु ते न बोलता कसं शमणार? समोरासमोर बसून पूर्वीसारखं बोलणं किती होईल ते ही नाही सांगता येत आणि कुठेतरी आपण दोघींनी संवादातला सहजपणा गमावलाय की काय असा प्रश्न डोक्यात येतो, म्हणूनच हे पत्र लिहायचं ठरवलं आहे.

 

ऍक्सिडेंट मध्ये तुझा बाबा गेला ना तेंव्हा तू फक्त दोन वर्षांची होतीस. बाबा म्हणून तुला फक्त भिंतीवर लावलेला फोटो माहीत आहे. मी ही वयाने काही फार मोठी नव्हते. तिशीही गाठली नव्हती. माझं आयुष्य अचानक तिथल्या तिथे थांबून गेलं. सगळ्या आशा, इच्छा, आकांक्षा जश्या एका दिवसांत संपल्या. माझा मुलगा नसला तरी गळ्यांतलं मंगळसूत्र काढू नकोस असं तुझ्या आजीने सुचवलं तेंव्हा कुठेतरी त्या वणव्यातही मन सुखावून गेल्यासारखं वाटलं. आजीचं किती कौतुक वाटलं होतं सर्वांना आणि मलाही. पण जसजशी वर्षे उलटली तेंव्हा लक्षात आलं की मी कुठेतरी तुझ्या बाबाच्या संसारातून मोकळी झाले होते आणि तरीही हयात नसलेल्या इसमाची बायको म्हणून मिरवत होते.


तुझा बाबा असताना श्रीकांत काका हक्काने घरी यायचा, कुटुंबातला एक सदस्य असल्यासारखाच वावरायचा. बाबा गेला तसं त्यानेही येणं जाणं कमी केलं. फोन वरून चौकशी करायचा. कधीतरी क्वचित माझ्या ऑफिसमध्ये चक्कर टाकायचा. बाहेरच्या बाहेर काही मदत लागली, अडलं सवरलं तर मात्र धावून यायचा. काही महत्त्वाच्या कामानिमित्त कधीतरी घरी उभ्या उभ्याने चक्कर टाकायचा. त्यालाही स्वत:च्या घरच्या अनेक अडचणी होत्या. घरात कर्ता सवरता तोच होता. मागच्या बहिणींची लग्न झालेली नव्हती. सर्वांच करण्यात तो सडाफटिंगच राहिला.


तुझ्या प्रत्येक निकालानंतर श्रीकांत काका एखादं बक्षीस घेऊन यायचा. तुझे लाड करायचा. तुला आठवतं तू १२ वर्षांची असताना तुझं ऍपेंडीक्सच ऑपरेशन होतं. तेंव्हा सर्वप्रथम श्रीकांत काकाच धावून आला होता. तुझ्या दहावीच्या निकाला नंतर तुझ्यासाठी नवीकोरी सायकल घेऊन दारांत उभा असलेला काका आठवतो का गं तुला?


आजी गेली तशी तुझ्या सख्ख्या; रक्ताच्या काकाने घरावर दावा लावला. मी एकटी बाई कुठे कोर्ट कचेऱ्यांच्या वाऱ्या करणार होते? कोण लागतो गं श्रीकांत काका आपला? तुझ्या बाबांचा शाळामित्रच ना; तो देवासारखा पाठीशी उभा राहिला आणि त्या संकटातून आपण तरून गेलो. त्याचे उपकार नाही काढून दाखवत पण माणसं अशा सहवासाने जवळ येऊ शकतात हे सत्य कसं टाळायचं? माझी पन्नाशी जवळ आली आहे, त्याची उलटून गेली आहे. ज्या वयांत शारीरिक आणि मानसिक ओढ होती, तेंव्हा नाही जवळ आलो कारण पदरांत तू होतीस, सासूबाई होत्या,  नातेवाईक होते, समाज होता. सगळ्यांची काळजी करताना आयुष्य कसं सरलं ते कळलंच नाही. अगं, पण आशा-आकांक्षा नव्हत्या असं आहे का? आणि वय वाढलं म्हणून त्या संपतात असं ही कुठे असतं? तुला हे सर्व त्या दिवशी सांगायचा प्रयत्न केला तर तू अद्वातद्वा बोललीस. म्हणालीस की नको त्या वयांत थेरं सुचताहेत तुम्हाला. असं कसं गं? या वयातही एकमेकांची गरज असते. माणसाला त्याचं स्वत:च आयुष्य असलं तरी साथ द्यायला जोडीदार लागतो, सोबत लागते. तू माझी जोडीदार नाही होऊ शकत, तुला तुझं स्वतंत्र आयुष्य आहे. उद्या तुझं लग्न होईल, मुलं बाळं होतील. मी अगदी एकटीच राहीन की काय अशी भिती भेडसावते की मलाही कधीतरी.


वाढत्या वयानुसार मलाही शारीरिक तक्रारी आहेत, व्याधी, चिंता आहेत. आपल्या समवयस्क अशा कुणाशी तरी त्या वाटून घ्याव्यात, हलक्या कराव्यात असं वाटणं साहजिक नाही का? श्रीकांत काकाही आता सर्व जबाबदाऱ्यांतून मोकळा आहे. घरचं करता करता आपल्यासाठी कुणी जीवाभावाचं उरलं नाही असं म्हणून गेला एके दिवशी; आणि सहजच त्याने हा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. कुठेतरी माझ्या अतृप्त मनालाही तो सुखावून गेला. तू माझ्या काळजाचा तुकडा म्हणून तुझ्याकडे मन मोकळं केलं तर तू गैरसमज करून घेतलास. बाळा! तुझ्यापेक्षा जवळचं या जगात काही असतं ना तर ते या पूर्वीच मिळवलं असतं. तुला दुखवून कुठला निर्णय मी घेईन असं कसं वाटलं गं तुला?

 

हे तुझं हक्काच घरं ते सोडून तू परक्या लोकांबरोबर राहते आहेस या कल्पनेने जीव तीळ तीळ तुटतो. तुझं जीवन सुखकर व्हावं, सुरळीत चालावं म्हणून इतकी वर्षे संन्यस्त जीवन जगले मी, आता या वयांत गमावलेलं सगळं मिळालंच पाहिजे अशी वेडी अपेक्षा नाहीये गं माझी.  काही दिवसांपूर्वी मनात आलेले हे सगळे विचार मी पुसून टाकले आहेत. हे पत्र वाचून तू जशी आहेस तशीच उठून घरी ये बेटा.  तुझ्या परतून येण्याची मी आतुरतेने वाट पाहते आहे.

 

तुझीच,
आई.