रूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास

प्रदीप लाड

(पृष्ठ ३)

'हूटर्ज़' रेस्ट्राँटमधील एक ललना

गिफर्डने शहरातील सुशिक्षित तरूणांच्याही भेटी घेतल्या. त्यांतून त्याला शहरी जीवनातील झपाट्याने ढासळणारी नैतिकता तीव्रतेने जाणवली. गेल्या तीस वर्षांतील वेगाने वाढणार्‍या सुबत्तेचा हा परिपाक होय. शांघायमध्ये तो ये शा नामक रेडियो- टॉक शोच्या निवेदिकेला भेटला तेव्हा तिने ह्या मर्मावार अचूक बोट ठेवले. "चिनी युवक स्वतःला हरवून बसलाय", ती म्हणाली. "आताच्या वयस्क लोकांकडे पाहा, त्यांनी सांस्कृतिक क्रांतीच्या वेळेस खूपच भोगले आहे. आता त्यामानाने सर्व आलबेल आहे. तरीही ही माणसे त्या काळाबद्दलच आपुलकीने बोलतात. ह्याचे कारण तेव्हा नैतिकतेला जीवनात महत्त्व होते. पूर्वीच्या काळी चिनी मुलांना चांगली व्यक्ती होणे आवश्यक आहे असे सांगण्यात येई. आता तसे काहीच नाही." 

पण हाच ढासळलेल्या नैतिकतेचा मुद्दा अगदी प्रखरपणे गिफर्डसमोर आला तो शियान येथे सू नावच्या एका तरूण कलाकाराशी वार्तालाप करतांना. सू आणि गिफर्ड चिनी कलेच्या गेल्या अनेक शतकांच्या वाटचालीबद्दल बोलत होते. प्राचीन काळापासून चिनी चित्रकलेत नैसर्गिक घटकांवर भर देण्यात आलेला आहे. चित्रे पहाड, पाणी, आकाश ह्या घटकांच्या एकात्म्याबद्दल असत. युरोपियन कलेत मानवी जीवनाला जे महत्त्व आहे, त्याच्या इथे नेमके उलटे. चिनी जगतात पूर्वापार, इतरत्र होते तसेच, कलेच्या बाबतीतही वैयक्तिक प्रकटनास काहीच स्थान नाही. वैयक्तिक विचारांचे आदान प्रदान उघडपणे होऊच शकत नाही. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस कन्फ्युशियन तत्त्वप्रणालीला तत्कालीन राजवटीकडून तिलांजली देण्यात आली तेव्हा कलेच्या माध्यमात मतस्वातंत्र्याला थोडा वाव मिळाला खरा, पण त्यापुढील कम्युनिस्ट राजवटीत तो अशक्य होता. मग माओंच्या निधनानंतर, मुक्त बाजारपेठेच्या अंगिकाराबरोबरच वैयक्तिक विचारही मुक्तपणे प्रकाशित करणे थोडे सोपे झाले. ह्याचा परिणाम मिश्र होता. काही एकदम जुनाट तर काही सर्वच बंधने झुगारणारे, टोकाचे आधुनिक म्हणावे असे. ह्या आधुनिक कलेने खरे तर अगदी पाश्चिमात्यांवरही ताण केला असे म्हटले तर ते अतिशयोक्त होणार नाही. सूने गिफर्डला बैजिंगमधील एका कला-प्रदर्शनात विक्रीस ठेवण्यात आलेला फोटो दाखवला, तो होता दोन म्रूत अर्भकांचा. ती मृत अर्भके एकमेकांना बिलगून बसली होती, दुकानातील पुतळ्यांप्रमाणे!! हे बघून गिफर्ड शहारला. "त्याचे काय आहे, चिनी जीवनच पाशवी आहे, आणि शेवटी कला ही जीवनाचेच प्रतिबिंब नव्हे का? म्हणून आमची आताची ही कलाही अशीच, आमच्या जीवनासदृश्य आहे." सू म्हणाला. "तुमच्या येथे खरे तर मुक्त विचारांना नेहमीच सहज वाव आहे, तरी देखिल तेथील कलाकारांनी त्यांच्य कलेच्या माध्यमातून जेव्हा काही वेगळेच करून दाखवण्यास सुरूवात केली, तेव्हा तुमच्या समाजात त्याची वादळे उठली. ह्याचे कारण तुमच्या समाजात धार्मिकतेचा नाही म्हटले तरी पगडा आहेच. व त्यातून येणार्‍या नीती- अनीतीच्या कल्पना तुमच्यातले अनेकजण मानतात. आमच्या येथे तसले काही नाही, आम्ही अधार्मिक माणसे. आमच्या कम्युनिस्ट तत्त्वात धर्म बसतच नाही. तेव्हा आम्ही तुमच्या कलाकारांहूनही अतिमुक्त अशी निर्मिती करू शकतो". गिफर्डला येथे शांघायची ये शा समाजातील नैतिकतेच्या र्‍हासाबद्दल जे काही म्हणाली होती, ते आठवले.

चिनी समाजाची जडणघडण त्या देशाच्या राजकीय संदर्भात समजून घेण्यासाठी गिफर्ड इतिहास व समाजशास्त्राचे अनेक तपशिलवार संदर्भ ह्या पुस्तकात देतो. चीनची तुलना तो प्राचीन व अर्वाचीन युरोपशी करतो. त्याचे म्हणणे असे की चीनला तसेच युरोपला प्राचीन संस्कृती आहे. तसेच प्रत्येकात अनेकविध उपसंस्कृतींचे लोक आहेत, त्यांच्या त्यांच्या भाषा, खाण्यापिण्याचे रीतिरिवाज ह्यांसकट. आणि तरीही, हे सर्व एका समान सूत्राने बांधले गेले आहेत. सातव्या- आठव्या शतकात जेव्हा युरोप अंधार व मध्य युगात वावरत होता, तेव्हा चीन बराच प्रगत झालेला होता. बाराव्या शतकात तर चीनने त्याच्या भरभराटीचा उच्चतम बिंदू गाठला होता. पुढे मात्र युरोपात यंत्रयुग अवतरले, 'पुनरुत्थान' आले. तेथे सामाजिक उलथापालथीही झाल्या, लोकशाहीची मुळे रुजली व वाढू लागली. तसे चीनमध्ये न होण्याची गिफर्डच्या मते तीन कारणे आहेतः राजकीय, तात्त्विक आणि सामाजिक.

चीन शिउव्हांग (Qin Shihuang) राजाने ख्रि. पू. २२१ साली चीन एक देश म्हणून प्रथम एकवटला (व म्हणूनच त्याच्या नावाने तो देश आज ओळखला जातो). हे काम त्याने ना सफाईदार वाटाघाटी करून केले, ना कूटनीती वापरून. त्याने हे बळाचा, शस्त्राचा वापर करून केले. त्याची कार्यपद्धती कायदे, चोख पालन करणार्‍यांना बक्षिस व न करणार्‍यांना कठोर सजा, ह्या सूत्रावर आधारित होती. गिफर्ड म्हणतो की २००० वर्षांनंतरही ह्या राजकीय प्रणालीत काहीही बदल झालेला दिसत नाही! चीन शिउव्हांगने निर्माण केलेल्या राज्यावर नीट राज्य करण्यासाठी राजास बलाढ्य असणे जरूरीचे होते, इतके ते राज्य मोठे होते. आपल्या हाती सर्वंकष सत्ता असावी ह्या हेतूने त्याने प्रथम विद्वानांचे ग्रंथ जाळून टाकले, व नंतर विद्वानांनाच मारून टाकले. राजाच्या विरूद्ध कुणीही काहीही म्हटले की त्याचा समाचार कसा घ्यायचा ह्याचा त्याने जणू तेव्हा पायंडाच घातला म्हणा ना! आताही हीच विचारसरणी येथे वापरात आहे असे दिसते, अशी टिप्पणी तो पुढे करतो.

हे असे केवळ मनगटशाहीवर राज्य करणे कठीण असावे, कारण चीन शिउव्हांगच्या मृत्यूनंतर अवघ्या बारा वर्षातच त्याच्या घराण्याची राजवटही संपुष्टात आली. ह्यापासून बोध घेऊन नंतर सत्तेवर आलेल्या हान (Han) घराण्याने चीनच्या 'कायद्या'च्या राज्यास कन्फ्युशियसच्या तात्त्विक मुलाम्याची जोड दिली. सरकारी नोकरी करण्यासाठी कन्फ्युशियन तत्त्वप्रणालीची परीक्षा देणे ह्यापुढे सक्तीचे झाले. ह्या तत्त्वप्रणालीनुसार प्रत्येक व्यक्ती मूलतः चांगली असते, आणि म्हणून ती शिकू शकते व स्वतः हून स्वतःचा उद्धार करण्यास समर्थ असते. ह्या तत्त्वप्रणालीनुसार राजाने व त्याच्या विश्वस्तांनी स्वतःच्या चांगल्या वागणूकीचा आदर्श देशापुढे ठेवला पाहिजे. गिफर्ड इथे युरोपात विकसित झालेल्या 'कायद्याचे अधिपत्य असलेले राज्य' ह्या संकल्पनेशी तुलना करतो व असे प्रतिपादन करतो की सदर चिनी संकल्पनेत सुधारणेसाठी बाह्य अंकुश (checks and balances) असण्याला काही वावच नाही. त्याच्या म्हणण्यानुसार ह्याचा परिपाक राजघराणी व त्यांनी चालवलेली सरकारे भ्रष्ट होण्यात झाला.

ह्या द्विपादी राज्यप्रणालीचा वापर इथून पुढे दीर्घ मुदतीपर्यंत म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत सुरू राहिला. कन्फ्युशियसच्या तत्त्वज्ञानाच्या अशा वापरामुळे दोन गोष्टी झाल्या-- सर्वच शिक्षित माणसे सरकारी नोकरीत काम करू लागली, व दुसरे बौद्ध धर्माच्या पीठांना राज्यसत्तेवर कोणताही अंकुश ठेवणे अशक्य झाले. इथे गिफर्ड परत युरोपातील चर्चेसनी तेथल्या राज्यसत्तेवर अंकुश ठेवण्याचे कार्य कसे केले, त्याची आठवण करून देतो.

तिसरे कारण सामाजिकतेबद्दलचे आहे. युरोपात सरदारघराणी खूपच शक्तिवान होती, व त्यांनी राज्यघटनेत ढवळाढवळ करण्याची हिम्मतही दाखवली ('मॅंग्ना कार्टा'). चीनमध्येही सुरूवातीस सरदारघराणी शक्तिमान होती. पण त्यांच्या उपद्रवामुळे दंग (Tang) राजवटीत व पुढे आलेल्या साँग (Song) राजवटीत (इ. स. ९६० -१२७९) त्यांची मुळेच छाटली गेली. खरे तर चिनी समाज हा उतरंडप्रिय. पण कुठल्याही सर्वसामान्य घराण्याच्या कर्त्या पुरूषाच्या निधनानंतर त्याच्या जमिनीचे समभागात वाटप त्याच्या मुलांत केले गेले पाहिजे ह्या दंडकामुळे सरदारघराण्यांकडे वर्षानुवर्षे, शतकांनुशतके खूप मोठ्ठ्या जमिनींची मालकी राहिली नाही. म्हणूनच, गिफर्ड सांगतो की युरोपात असतात तशी मनोर-घरे इथे चीनमध्ये दिसून येत नाहीत. इथेच तो हेही नमूद करतो की कुणालाही कन्फ्युशियसच्या तत्त्वप्रणालाची परीक्षा देता येणे व सरदारघराण्यांकडे असलेले मोजकेच बळ, ह्यामुळे चीनमध्ये सामाजिक एकसंधता दिसून येते. अधिकार कुणालाही वडिलोपार्जित चालत येत नसत, अथवा नाहीत. ते परीक्षा देऊन मिळवता येत.

चीनच्या अलिकडच्या इतिहासात डोकावतांना गिफर्ड ब्रिटिशांच्या कावेबाजपणावर कोरडे ओढण्यास कचरत नाही. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी चीनमध्ये अफू विकण्यास सुरूवात केली. त्याच्या बदल्यात ते चिनी सिल्क, पोर्सेलीन व चहा खरीदत. चिनी राजवटी नेहमीच स्वतःच्या संस्कृती व देशाबद्दल गोड गैरसमज बाळगून होत्या. आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत, हा तो समज. ह्यामुळे सुरूवातीस त्यांनी ह्या प्रकारास म्हणावा तसा पायबंद घातला नाही. मग १८३९ साली त्यांच्या लीन चेशू (Lin Zexu) ह्या सैन्याधिकार्‍याने, राजाच्या परवानगीने अफूची दोनशे खोकी जप्त करून समुद्रात बुडवली. ब्रिटीश अशा काही संधीची वाटच पाहत होते. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती. त्यांनी दक्षिण चीनचा बराच प्रांत बेचिराख केला. ह्यावरून चीन व ब्रिटीश ह्यांच्यात युद्ध झाले, ते पहिले अफू युद्ध म्हणून ओळखले जाते. ह्या युद्धात चीनने मार खाल्ला. त्यावेळी (१८४२) झालेल्या नानजिंगच्या तहात चीनला त्यांचा भौगोलिक महत्त्वाचा हाँगकाँग, हा ब्रिटिशांच्या हवाली करावा लागला. तसेच शांघायसारख्या पूर्व किनार्‍यावरील अनेक बंदरी शहरात ब्रिटिशांसाठी काही प्रदेश 'मोकळा' सोडण्यात आला, जेथे चिनी सत्ता चालू शकत नव्हती. १८६० साली दुसरे अफू युद्ध झाले, त्याचीही परिणती अशीच झाली.