रूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास

प्रदीप लाड

(पृष्ठ ४)

चिनी राजाने लीन चेशूस ह्याला सगळ्याबद्दल जबाबदार धरले, व त्याला पश्चिमेकडील सीमेपार तडीपार करण्यात आले. ज्यायुग्वानच्या किल्ल्याखाली
गिफर्डने ह्या लिनचे स्मारक बघितले. तेथे लिनचा पुतळा आहे व हताश परिस्थितील लिनने लिहीलेली कविता एका चबुतर्‍यावर कोरलेली आहे. गिफर्ड त्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन उभा राहिला. त्याला आज हा सगळा इतिहास आठवत होता. तो लिहितो, "दैवदुर्विलास पाहा, आज येथे एकही चिनी व्यक्ती लिनच्या स्मारकाकडे फिरकलेली नाही. तिथे आहे कोण? तर एक समुद्रापलिकडील माणूस. अशा देशातील, की ज्याच्या लोकांमुळे ह्या लिनला अक्षरशः परागंदा व्हावे लागले!! हा लीन, जो एकमेव चिनी माणूस त्यावेळी बाहेरील उपद्व्यापी लोकांच्या समोर खंबीरपणे उभा राहिला, त्याच्या स्मारकासमोर मी त्याच्याविषयीच्या आदराने तसेच माझ्या देशबांधवांच्या दुष्कृत्यांच्याविषयीच्या शरमेने नतमस्तक होऊन उभा आहे."

पश्चिमेतील शिनज्यांग प्रदेशातील दुनहुवांग येथील सुप्रसिद्ध प्राचीन मोगाओ गुंफांतून फिरतांना गिफर्डची भावना अशीच अपराधीपणाची होती. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटास पूर्वेकडील किनार्‍यावरून चीनवर ब्रिटिशांनी व इतर पाश्चिमात्य देशांनी हल्ले केल्यावर त्यांना तोंड देता देता चिंग (Qing) राजवट जेरीस आली होती. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस त्यांनी काही थोडेफार लोकाभिमुख होण्याचे प्रयत्न केले खरे, पण ते अपुरे पडत होते. ह्या परिस्थितीत पश्चिमेकडून ब्रिटीश, व इतर पाश्चिमात्य उत्खननकर्त्यांकडून जी लूटमार झाली तिच्याकडे लक्ष द्यावयास कुणास वेळ होता? शिंज्यांगच्या ताकलिमाकन वाळवंटाच्या खाली प्राचीन शहरे गाडली गेली आहेत, ह्या शंकेची शहानिशा करण्यासाठी तत्कालीन ब्रिटीश हिंदुस्थानच्या सरकारने ऑरेल स्टीन ह्या जाणत्या पुरातत्त्वशास्त्रज्ञास पाठवले होते. तो दुनहुवांग येथे केवळ कुतूहलाने बुद्धकालीन गुंफा बघण्यास आला. त्यावेळी त्याला सुगावा लागला की ह्या गुंफांचा राखणदार वांग युआनलू ह्याला तेथेच एक शेकडो वर्षे बंद असलेली गुंफा सापडली आहे. स्टीनने चलाखीने वांगशी संधान जुळवले. ह्या कामी त्याला सातव्या शतकात हिंदुस्थानात जाऊन आलेल्या चिनी संशोधक शुआन चांग (Xuan Zang-- ह्याचे नाव आपण चुकिने ह्यू- एन- त्संग असे घेत आलो आहोत) ह्याची अप्रत्यक्ष मदत झाली. स्टीन व वांग दोघे शुआनचे प्रशंसक होते, ह्या धाग्यावरून स्टीनने वांगला ती गुहा दाखवायची विनंती केली. ती पाहिल्यावर तो स्तिमितच झाला. तेथे चिनी, संस्कृत, तिबेटी अशा अनेक भाषांतील सुमारे ४, ००० कागदपत्रे होती. काही दिवसांच्या वाटाघाटींनंतर स्टीनने वांगकडून १३० पौंड इतक्या रकमेच्या मोबदल्यात सुमारे ३० खोकी भरून दस्तऐवज बाहेर नेला. तो पुढे इंग्लंडमध्ये अभ्यासल्यावर असे लक्षात आले की तो सगळा दस्तऐवज इ. स. १००० च्याही आधी गुहेत बंद केला गेला असला पाहिजे.

ही बातमी पाश्चिमात्य जगात पसरली आणि तो ऐवज लुटणार्‍यांची रीघ सुरू झाली. १९२३ साली हार्वर्ड येथील फॉग म्युझियमने प्रा. वॉर्नर ह्यांना तेथे पाठवले. ह्या महाशयांना भिंतीवरील कोरीवकाम अलगद काढण्याची कला अवगत होती, ही कला त्यांनी ह्या गुहेत सढळ हस्ते वापरली, व तिथल्या बर्‍याच कोरीवकामाची रवानगी अमेरिकेत केली. हे सर्व ह्या एकाच गुहेत झाले असे नव्हे, तर जवळच्याच गांसू प्रदेशातील इतर काही गुहांतही झाले.

मोगाओ गुहा पाहिल्यावर ह्या सर्व इतिहासाची आठवण जागी झाल्याने गिफर्डला पुन्हा एकदा आपल्या देशबांधवांची आत्यंतिक शरम वाटली.

.....

शियाह(Xiahe) येथील बौद्ध भिख्खू

चीनच्या पश्चिम भागात गेल्यावर तिबेट व शिंजियांगच्या प्रश्नांबद्दल काही माहिती प्रत्यक्ष करून घेणे हे साहजिकच आले. इतिहासाचा धांडोळा घेत गिफर्ड लिहितो की ह्या दोन्ही भागांबद्दल चीनचे दावे काहीसे अतिशययोक्त आहेत. उदा. तिबेटशी आमचे सातव्या शतकापासून 'बंधुत्वाचे' नाते आहे, असे चीन म्हणतो. सातव्या शतकात चिनी साम्राज्य व तिबेटी राजवट ह्यांची काही देवाणघेवाण झाली हे खरे, पण ते तेव्हढेच राहिले. १७२० सालात चीनच्या कांगशी (Kangxi) राजाने ल्हासामध्ये प्रथम आपले सैन्य तैनात केले. आताच्या शिनज्यांगला पूर्वी पूर्व अथवा चिनी तुर्कस्थान म्हणत असत. गिफर्डच्या माहितीनुसार चिनी तेथे प्रथम गेले ख्रि. पू. २ साली. त्यावेळीच्या हान राजवटीने तेथील शिओंगू नामक टोळीचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. ह्यानंतर सातव्या शतकात पुन्हा चीनची नजर ह्या प्रांताकडे वळली. तेव्हा चीनमध्ये दंग राजवट होती. पण ह्यावेळी त्यांना धर्माने मुस्लिम असलेल्या अरबी शत्रूशी मुकाबला करावा लागला. त्याची परिणती युद्धात झाली व त्यात चिनी पुन्हा हरले. इथेही तिबेटप्रमाणेच अठराव्या शतकात चियानलाँग (Qianlong) राजाने ह्या प्रदेशात नीट पाय रोवले.

परंतु, गिफर्ड लिहितो की तिबेटी व चिनी तुर्कस्थानातील विघुर अठराव्या शतकानंतरही चिनी राजास नजराणे पाठवीत. त्याचे मांडलिकत्वच जणू त्यांनी घेतले होते म्हणा ना! ह्याव्यतिरिक्त चिनी राजवटीलाही ह्या दोन्ही प्रदेशात विशेष रस नव्हता. गिफर्डच्या म्हणण्यानुसार चिनी मुळी ह्या दोन्ही प्रदेशात गेले ते फक्त स्वतःच्या राज्याभोवती बाहेरील शत्रूपासून रक्षण करणारा प्रांत असावा म्हणून. तिबेटी व विघुर प्रजा आपापल्या प्रदेशात स्वतःच्या रीतिरिवाजांचे व धर्मांचे पालन करत कालक्रमणा करीत होती. आपली चिनी संस्कृती जगातील सर्वात श्रेष्ठ आहे, ह्या समजुतीमुळे चिनी राजांना व राज्यांच्या सल्लागारांना इतरेजनांबद्दल तुच्छ भावना होती. त्यामुळे तिबेटी व विघुर हे त्यांनी तेथील प्रदेशांवर त्यांचा बर्‍यापैकी ताबा असतांनाही खऱ्या अर्थाने 'आपले' मानले नाहीत. हान वंशावळीचे, कन्फ्युशियसचे तत्त्वज्ञान शिरोधार्य मानणारे नागरिक जिथे राहतात, तोच आपला देश, ही त्यांची देशाबद्दलची कल्पना होती.

गिफर्ड म्हणतो की ही परिस्थिती एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत अशीच होती. त्यानंतर मात्र चिनी विचारसरणीत एक आमूलाग्र बदल झाला. पूर्वेकडून आलेल्या युरोपियनांच्या आक्रमणाचा तो परिपाक होता. हे आक्रमक चिन्यांच्या संस्कृतीचे वर्चस्व अजिबात मानत नव्हते. ते चिन्यांबरोबर बरोबरीच्या पातळीने वागत होते. तेव्हा ह्यापुढे चिन्यांनी हान संस्कृतीपुरती मर्यादित असलेली देशाच्या सीमांची व्याख्या बदलण्यास प्रारंभ केला आणि मग त्यांनी तिबेट व पूर्व तुर्कस्थान ह्यांना आपल्या देशाच्या सीमेत सामावून घेतले!

गांसू ह्या प्रामुख्याने तिबेटी जनता असलेल्या प्रांतातून प्रवास करीत असतांना बसमध्ये गिफर्डला एक तिबेटी शिक्षक भेटला. त्याचे चिनी नाव होते, शियाओ लीन. शियाओ एका तिबेटी शाळेत चिनी भाषा शिकवीत होता. तो लांजू ह्या मुख्य शहरास स्वतःच्या प्रशिक्षणाकरिता गेला होता, व आता आपल्या गावाकडे परतत होता. "तू स्वत तिबेटी असूनही तुझे बांधव ज्यांना आक्रमक समजतात, त्यांची भाषा शिकवणे तुला तापदायक वाटत नाही?" शियाओचे उत्तर प्रामाणिक होते, आणि वास्तवाची भान असणारेही. "माझ्यापुढे पर्याय काय आहेत? ही अशी नोकरी करणे अथवा भुकेकंगाल होणे." मग त्याने त्याची कहाणी गिफर्डला कथन केली. लहानपणी त्याच्या तिबेटी गावात तो सर्वात हुशार समजला जाई. त्याच्या तिबेटी शाळेत तो वर्गात नेहमी पहिला असे, त्यामुळे त्याला चिनी शाळेत शिकण्याची संधी देण्यात आली. तेथेही त्याचा नंबर वर्गात बराच वरचा असे. त्याच्या ह्या हुशारीमुळे शालेय शिक्षण संपल्यावर त्याला पश्चिम चीनमधील एका नामवंत विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. पदवी घेतल्यानंतर त्याला ही शिक्षकाची नोकरी देण्यात आली. चीनशी मिळते घेऊनच पुढे जाणे हे वास्तव आहे, कारण ह्यातूनच आपल्या समाजास दैन्यातून बाहेर पडता येईल, असे त्याचे म्हणणे होते. अशा चिनी शिक्षणामुळे, तसेच बाहेरून तेथे येणाऱ्या हान चिन्यांच्या मुळे आपल्या संस्कृतीस धोका आहे, हे शिआओस मान्य आहे. पण प्राप्त परिस्थितीत दुसरा काही पर्याय नाही, असे तो म्हणाला. असे करतांना काही मर्यादा त्याने स्वतःभोवती आखून घेतल्याचेही गिफर्डला दिसून आले. आपण कधीच हान चिनी मुलीशी विवाह करणार नाही, हा त्याचा निर्धार होता.

नेमके असेच गिफर्डने त्याच्या प्रवासात पुढे तुर्पान ह्या शिंजियांग प्रदेशातील वाळवंटात वसलेल्या गावात तेथल्या एका हुन्नरी विघुर मुस्लिम तरूणाकडून ऐकले. मुरादची व गिफर्डची भेट तेथील एका खानावळीत झाली. त्या रात्री मुराद व गिफर्ड मिळून नजिकच्या एका वाळूच्या टेकडीवर गेले. चांदण्या रात्री रेड वाईनचे घुटके घेत त्याने व मुरादने तेथील विघुर मुस्लिमांच्या परिस्थितीबद्दल गप्पा केल्या. "आपण विघटनवादी तरूणांच्या शौर्याची व निष्ठेची दाद देतो", मुराद सांगत होता, "पण ह्या मार्गाने पुढे हाती काही लागणार नाही. त्याला भवितव्य नाही. आहे त्या परिस्थितीत चिनी सत्तेशी जुळवून घेत शिक्षणाच्या मार्गाने पुढे जाऊन जे काही लाभ मिळत असतील ते आमच्या समाजाने घ्यावेत. येथून पूर्वेकडे जाऊन शिकून मग आमच्या मुलांनी आमच्या समाजासाठी काही भरीव कार्य केले पाहिजे". मुरादचा धाकटा भाऊ शिक्षणात चांगला होता, त्याने पुढे चिनी विद्यापीठात शिकून डॉक्टर व्हावे व येथे येऊन आपल्या समाजाची सेवा करावी, अशी मुरादची भूमिका होती.