रूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास

प्रदीप लाड

पृष्ठ ५

आता पुढे ह्या देशाचे काय होईल, हा प्रश्न गिफर्डला सतत सतावत राहिला आहे. कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आला तो शेतकर्‍यांच्या भरघोस पाठिंब्यावर. १९३०-४० ह्या दशकांत एकीकडे चिआंग कायशेक ह्यांच्या सैन्याचा व दुसरीकडे आक्रमण करून आलेल्या जपान्यांचा मुकाबला करतांना शेतकरीच त्या पक्षाच्या पाठीशी भक्कम उभे राहिले होते. पुढे पन्नाशीच्या दशकातील ‘मोठ्ठी झेप’ ह्या चक्रम मोहिमेत शेतकर्‍यांना जोरदार झळ पोहोचली, कारण माओंनी सर्वांनाच पोलादाच्या निर्मितीत गुंतवले होते. त्यापुढे झालेल्या ‘सांस्कृतिक क्रांती’तही ते होरपळून निघाले. पण ह्या सर्वांत त्यांची पक्षावरील निष्ठा कायम राहिली, आणि पक्षही हे जाणून होता. त्यामुळे सुरूवातीपासून शेतकर्‍यांना विनामूल्य आरोग्य-सेवा इत्यादी काही सेवा नियमित रूपाने मिळत होत्या. परंतु, गिफर्डच्या निरीक्षणानुसार, नव्वदीच्या दशकापासून मुक्त बाजारपेठेच्या मागे लागत पक्षाने शेतकर्‍यांकडे जणू पाठच फिरवली. ह्याने हवालदिल झालेले शेतकरी त्याने ह्या प्रवासाच्या निमित्ताने बघितले. तो हेही नमूद करतो की खेड्यापाड्यातून कुठल्याही प्रकारचा, सर्वसामान्य जनतेचा प्रक्षोभ आपल्याला महागात पडेल हे कम्युनिस्टांनी ओळखले आहे. व त्यानुसार गेल्या तीन-चार वर्षात उपाययोजनाही करणे सुरू झालेले आहे. 

हफए ह्या शांघायपासून सुमारे दिडशे मैलावरील शहरात नुकतेच निर्माण करण्यात आलेले सायन्स पार्क व टेक्नॉलॉजी पार्क गिफर्डला बघता आले. दोन्ही भव्य दिव्य आहेत, व तेथील स्थानिक अधिकार्‍यांच्या त्यांच्या यशाबद्दल जोरदार कल्पना आहेत. गिफर्ड मात्र त्यांच्या ‘आम्हाला येथे दुसरी सिलिकॉन वॅली निर्माण करायची आहे’ ह्या आकांक्षेबद्दल सांशक आहे. अशा महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी स्खलनशील विचारांची आवश्यकता आहे. इथे तर मुक्त विचारांवर बंदी. तेव्हा हे कसे जमणार, असे तो विचारतो.

गिफर्डच्या निरीक्षणानुसार चीमधील युवा पिढीला राजकीय चळवळींबद्दल अजिबात आस्था नाही. वयस्क पिढीतील विचारवंतांनी आत्मबचावासाठी राजकीय बदलाचे स्वतःचे विचार पूर्णपणे बासनात गुंडाळले आहेत, व तेही आर्थिक सुबत्तेची फ्ळे चाखण्यात मश्गूल आहेत. तेव्हा पुढे नक्की काय होईल? हा देश कुठल्या मार्गाने जात राहील? ह्याबद्दल आत्ताच नक्की काही सांगणे कठीण आहे, अशा संभ्रमित अवस्थेत गिफर्डने ह्या पुस्तकाचा समारोप केला आहे. अगदी त्याच्या मनात असलेल्या सामाजिक व राजकीय परिवर्तनाच्या विषयातील ठोस उत्तरे ह्या प्रवासानंतर तो वाचकांपुढे ठेऊ शकत नसला, तरीही त्याचे असे सर्वसामान्य चिनी लोकांमध्ये मिसळणे आणि त्यांचे प्रश्न आत्मीयतेने समजावून घेणे मनाला भिडते. त्याच्या सर्व लिखाणात नकळतही कोणताही अभिनिवेष नाही, स्वतः ‘कुणीतरी’ आहोत, आणि चिनी आम जनतेशी बोलतांना व त्यांच्या अपरोक्ष त्यांचा उल्लेख करतांना एका उच्च पातळीवरून ‘खाली’ बघत केले आहे, असे कुठेही अजिबात जाणवत नाही. ह्यामुळे तर गिफर्ड अनुभवाला इतका थेट भिडू शकला. ह्या संग्राह्य पुस्तकानंतर रॉब गिफर्डच्या पुढील लिखाणाबद्दल विशेष अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. 

चायना रोड

 

[‘चायना रोड’, रॉब गिफर्ड, ब्लूम्सबरी पब्लिकेशन्स पी. एल. सी., ISBN 9780747588924]