शेंगदाण्याची चटणी

  • ओल्या भुईमुगाच्या शेंगा - एक किलो
  • लसूण - चार ते पाच गड्डे (चवी/आवडीप्रमाणे वाढवावे)
  • हिरव्या मिरच्या - शंभर ग्राम (चवी/आवडीप्रमाणे वाढवावे)
  • अर्धा चहाचा चमचा तेल
  • मीठ चवीप्रमाणे
दीड तास
दहाजणांना तोंडीलावण्यासाठी

ओल्या भुईमुगाच्या शेंगा (दाणे टचटचीत भरलेल्या) धुऊन खमंग भाजून घ्याव्यात. भाजताना त्या फार कोरड्या पडणार नाहीत किंवा त्यांना जळकटून कोळश्याची चव येणार नाही याची काळजी घ्यावी.

असे करण्याचा एक मार्ग - धुतलेल्या ओल्या शेंगा कुकरामध्ये मोठ्या ज्वाळेवर पटापट हलवून भाजाव्यात. चटचटू लागल्या की ज्योत बारीक करून एक ताटली झाकावी. पाच मिनिटांनी ताटली काढून एक पाण्याचा हबका मारून ज्योत परत मोठी करावी. परत पटापट हलवून झाकण ठेवून ज्योत बारीक करावी. मग पाच मिनिटांनी झाकण काढून जरूरीप्रमाणे पाण्याचा हबका मारीत मंद आचेवर भाजाव्यात. कुकरामध्ये भाजलेले पदार्थ कढईइतक्या सहजी करपत नाहीत. मात्र हा एक चांगलाच वेळखाऊ प्रकार आहे. अर्धा तास तरी लागतो.

शेंगा उकडल्या-भाजल्या गेल्यावर त्या फोडून दाणे काढावेत आणि थंड करावेत.

लसूण सोलून घ्यावी. हिरव्या मिरच्या बारीक कातरून घ्याव्यात.

लोखंडी तवा गरम करून त्यावर अर्धा चमचा तेल पसरावे. तेल धुरावल्यावर लसूण आणि मिरच्या खरपूस भाजून घ्याव्यात. त्यात सोललेले दाणे घालून एकजीव करावे आणि ज्योत बंद करावी.

हे मिश्रण निवल्यावर त्यात चवीपुरते मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटावे. गरज पडल्यास चमच्या-चमच्याने पाणी घालावे. चटणी शक्य तेवढी कोरडी ठेवावी. पाट्यावर वाटता आल्यास पाणी घालायची गरज नाही.

टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली बरी.

(१) यात लसूण आणि मिरचीचे प्रमाण आपापल्या आवडीप्रमाणे वाढवावे/कमी करावे.

(२) ही भाकरी/पोळीबरोबर तसेच थालीपिठाबरोबर छान लागते.

(३) ही चटणी पातळ करून साबुदाणा खिचडीवरही चांगली लागते. हे मिश्रण खाल्ल्यास उपासाचे पुण्य अर्थात मिळत नाही.

(४) आवडत असल्यास कोथिंबीर (चटणी वाटताना) घालावी.

(५) ही चटणी 'तयार मसाला' म्हणून वापरून वांग्याची भाजी करता येते. फोडणीला वांग्याचे काप घालून चांगले परतावे. मग ही चटणी आणि कोमट पाणी घालून एक उकळी आणावी. अशीच दोडक्याची भाजीही करता येते.

(६) "एवढा वेळखाऊ खटाटोप का करावा?" असा प्रश्न कुणाला पडल्यास उत्तर देण्याच्या जबाबदारीतून या टीपेन्वये मी मुक्त होत आहे!

स्वप्रयोग