ऍडमिशन

मीटिंगची वेळ सकाळी साडेनऊची होती. बरोबर साडेनऊ वाजले होते. शिरस्त्याप्रमाणे कॉलेजचे काही विश्वस्त, सगळे स्टाफ मेंबर, सपोर्ट स्टाफ आणि मुख्य म्हणजे ऍडमिशनच्या कामाशी संबंधित सगळा स्टाफ प्रिन्सिपॉल मॅडमच्या केबिनमध्ये आला होत. दयारामने मोठे मीटिंग टेबल सुरेख चकचकीत पुसून घेतले होते. प्रत्येक खुर्चीपुढे टेबलवर त्या त्या फॅकल्टीचे छोटेसे फोल्डर ठेवलेले होते. मॅडमच्या खुर्चीसमोर जराशी जाडसर फाईल, थोडेसे पुढे उजव्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे लख्ख घासलेले तांब्याभांडे, उजवीकडे एका छोट्याशा फ्लॉवरपॉटमध्ये कॉलेजच्याच बागेतली गुलाबाची चार टपोरी फुले आणि एका काचेच्या बाऊलमध्ये मॅडमच्या खास आवडीची मोगऱ्याची फुले ठेवली होती. कॉलेजच्या पंचवीस वर्षांच्या शिस्तीत वाढलेल्या दयारामला काही सांगावे लागत नसे. शिस्त, पण अभिमान बाळगावा अशी शिस्त - दयारामला वाटत असे. कर्तव्यपूर्तीचे आणि निष्ठेचे अपूर्व समाधान - फारसे शिक्षण न झालेल्या दयारामला कदाचित या शब्दांत नसते सांगता आले, पण रोज सकाळी कॉलेजचा युनिफॉर्म अंगावर चढवताना त्याची मान अभिमानाने ताठ होत असे. कॉलेजच्या प्रवेशद्वाराशीच लावलेल्या गोरे सरांच्या भव्य तैलचित्राकडे बघताना त्याचे मन काठोकाठ भरून येत असे. आधी सर, आणि आता सरांच्याच मुशीत घडवलेल्या मॅडम... आदराने मान लवावी अशी ही माणसे - आपल्यासारख्या साध्या शिपायाला यांची सेवा करायला मिळाली ही आपली पूर्वजन्मीची पुण्याईच - त्याच्या भाबड्या मनाला वाटत असे.
"बसा ना. " मॅडम त्यांच्या नेहमीच्या मृदू स्वरात म्हणाल्या. मोगऱ्याचा अस्पष्ट वास केबिनमध्ये पसरत होता. 'जुलै सुरू झाला तरी मोगऱ्याचा बहार टिकून आहे.. ' मॅडमना वाटून गेलं. डाव्या हाताने त्यांनी चष्मा सारखा केला. " हं, काय शिल्पा, झाली का तयार मेरिट लिस्ट? "
"हो मॅडम. तुमची सही झाली की आज जाईल नोटीस बोर्डवर" शिल्पा म्हणाली.
"आणि आशिष, त्या आऊट ऑफ स्टेट विद्यार्थ्यांची... "
दारावर टकटक झाली. मॅडमच्या कपाळावर एक बारीक आठी आली. स्टाफ मीटिंग सुरू असताना कुणी डिस्टर्ब केलेलं त्यांना आवडत नसे. आणि हे बाहेर असलेल्या दयारामलाही चांगलं माहीत होतं. आणि हे तर ऍडमिशनचे दिवस. एकेक तास महत्त्वाचा होता.
दार किलकिलं झालं. दयारामचा चेहरा किंचित अपराधी झाला होता. "मॅडम... " खालच्या आवाजात तो म्हणाला.
"काय, दयाराम? "
"काही मंडळी भेटायला आली आहेत, मॅडम.. "
"दयाराम, मीटिंग सुरू आहे.मी कामात आहे. बसायला सांग त्यांना" मॅडमचा आवाज किंचितही वर गेला नव्हता. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणंच हसरा पण निश्चयी होता.
"मी सांगितलं मॅडम. पण ते ऐकायला तयार नाहीत. बाहेर गोंधळ होतोय मॅडम. साहेबांनी पाठवलंय म्हणतात.. " अचानक कुणीतरी धक्का दिल्यासारखा दयाराम धडपडून दोन पावले पुढे आला. मागचं दार उघडून बाहेरची मंडळी आत घुसत होती. "जय भीम म्याडम, म्हनलं आर्जंट हाये, तवा भेटूनच जावं... " वय साधारण पस्तीस, लालसर गोरा सुजकट चेहरा, स्थूल, ओघळलेलं शरीर, झगमगीत लाल रंगाची साडी, कानात तीनचार ईयररिंग्ज, गळ्यात तर दागिन्यांची एक लहानशी शोकेसच, डोळ्यात काजळ आणि या सगळ्या साजशृंगारावर पसरलेला चेहऱ्यावरचा एक विलक्षण माजकट, मग्रूर भाव - अशी ती ठेंगणी बसकट बाई होती. "या, या, म्याडम आपल्याच हायेत... " तिनं तिच्यामागच्यांना म्हटलं तसे मागचे तीघेही आत शिरले. त्यांच्या अंगावरच्या पांढऱ्याशुभ्र खादीच्या आणि स्टार्च केलेल्या कपड्यांसोबत आणि हातातल्या जाड अंगठ्या आणि गळ्यातल्या लॉकेटांबरोबर काहीतरी जबरस्त अशुभ आणि हिडीस केबीनमध्ये आलं होतं. आणि त्याबरोबरच कसल्यातरी उग्र अत्तराचा आणि गुटख्याचा मिश्र वास.
"खासदारसायबांचा फोन आलावता. ते म्हनले म्याडमना मी सांगितलंय म्हनून सांगा. तुमी वळखत आसालंच मला... " बाई म्हणाल्या.
"ह्ये काय बोलनं झालं का ताई? तुमानी वळखत न्हाई असं व्हयील का कवा? काय म्याडम? " पहिला इसम म्हणाला.
"हे बघा, आमची मीटिंग सुरू आहे. " मॅडम शांतपणे म्हणाल्या. "तुम्ही बाहेर थांबा पंधराएक मिनिटं. मग बोलावते मी तुम्हाला. "
"थांबलो आस्तो हो म्याडम." दुसरा इसम म्हणाला "पन ताईंना जायचंय उद्गाटनाला. तवा म्हनलं, की म्हनलं, जाताजाता पाच मिंटात ह्ये कामबी करून टाकावं. आपल्याला काय जास्ती टाइम न्हाई हो लाग्नार. हां ताई, त्ये कागद.. "
ताईंनी तेवढ्यात आपली सोनेरी रंगाची पर्स उघडून त्यातून आपलं कार्ड काढलं होतं. कार्डावर ताईंचं नाव आणि फोटो - कुठल्याश्या समितीचं नाव -आणि सगळ्यात मोठा जाणवणारा असा दलितकैवारी खासदाराचा दाढीदारी फोटो. सोबत कुणाची तरी मार्कलिस्ट आणि एक ऍप्लीकेशन फॉर्म.
"खासदारसायेब म्हनले, म्यानेजमेंट कोट्यातनं तेवडी ऍडमिशन करून टाकायची बरं का म्याडम. " ताई म्हणाल्या.
"ए, गनपत, खुर्ची घे रं ताइन्ला" दुसरा इसम म्हणाला. मॅडमनी दयारामला नजरेनंच खुणावलं तशी दयारामनं खुर्ची आणली. ताईंनी खुर्ची ओढून घेतली आणि त्या जवळजवळ मॅडमना खेटूनच बसल्या. "खासदारसायेब म्हनले.. " बाईंनी मॅडमच्या दंडाला धरून बोलायला सुरुवात केली.
" हे बघा, " आपला दंड सोडवून घेत मॅडम म्हणाल्या, "ऍडमिशनसाठी असे बरेच फोन येत असतात आम्हाला दर वर्षी. आमच्या ऍडमिशन या मेरिटवर होतात.मेरिट लिस्ट तयार झाली आहे, आज लागेल नोटीस बोर्डवर. "
"म्याडम, तुमाला कळंना आमी काय म्हंतो त्ये. ह्यो काय जनरल कँडिडेट न्हाई आपला. एस. शी. कोट्यातला हाये."
"हो, मान्य आहे मला, पण रिझर्व कॅटेगरीच्या ऍडमिशन्सही मेरिटवरच होतात. संस्थेचे तसे स्पष्ट नियम आहेत. त्यात मला काहीच करता येणार नाही. "
"तुमी थांबा जरा अंकुशराव, " ताई म्हणाल्या, "म्याडम, यवडं ह्ये काम करून टाकायचं आपलं. एकच ऍडमिशन हाये आपली. ती पन रिझर्वेशनमदली. अंकुशराव, तुमी बसून घ्या. बसा ना तितल्या सोफ्यावर. म्याडम करनार आपलं काम, मी सांगते ना तुमाला. "
अंकुशराव आणि त्यांच्याबरोबरचे दोघे शेजारच्या सोफ्यावर बसले. अंकुशरावांनी आपला एक पाय दुसऱ्या पायावर टाकला आणि ते पायातला पांढराशुभ्र बूट हलवायला लागले. आपल्या हाताची त्यांनी आपल्या डोक्यामागे चौकट केली.
"तर म्याडम, खासदारसायेब काय म्हनले, की म्यानेजमेंट कोट्यातनं आप्ला एक दलित क्यांडिडेट घेतील म्हनले म्याडम. "
"हो का? " मॅडम म्हणाल्या. "त्यांना माहिती नसेल कदाचित, पण आमच्या संस्थेत असा मॅनेजमेंट कोटा वगैरे नसतो. आणि हे बघा, मीही संस्थेची नोकर आहे. मलाही संस्थेच्या नियमाबाहेर जाऊन काही करता येणार नाही. "
"म्हंजे आपलं काम नाय व्हनार म्हना की म्याडम.. " अंकुशरावांबरोबर आलेला इसम आता परत उभा राहिला होता.
"नाही. मेरिट लिस्टमध्ये तुमच्या कँडिडेटचा समावेश नसेल तर नाही. "
"आन म्याडम, तुमच्या ह्या लिष्टमदली नावं झाली काई क्यान्सल तर? तर भरनारच की न्हाई तुमी भायेरची पोरं?"
"हो, पण त्यालाही एक प्रोसिजर असते. अशा ऍडमिशन्स कॅन्सल होणार हे आम्ही गृहीत धरतोच. त्यामुळे आमच्या चार-पाच मेरिट लिस्ट लागतात. " मॅडम त्या इसमाकडे पाहत म्हणाल्या.
"म्याडम, म्हनजे इतं वकिली शिकाया तुमी भटा-बामनाचीच पोरं भरनार म्हना की. येका राष्ट्रीय पार्टीच्या आध्यक्षाचापन मान न्हाई ठेवायचा तुमाला. एका दलीत पोराला तुम्ही बाजूला काडताय म्याडम... "
"जातीचा इथं काही संबंध नाही ताई. आणि जातीचा आमच्या कॉलेजमध्ये कधीच काही संबंध नसतो. म्हणून तर आमच्या कॉलेजचं सगळ्या देशात नाव आहे... "
"ठीक आहे, म्याडम, आता आमाला काय करायचं ते आमी बगून घिऊ. "
"तुमची मर्जी. तुम्ही जाऊ शकता ताई. "

ताई आणि त्यांच्याबरोबर आलेले तीघे तिरिमिरीने बाहेर पडले. आशिष आणि शिल्पा आतूनबाहेरून हादरून गेले होते. कॉलेजचे  एक जुने विश्वस्त आणि कॉलेजचे माजी प्राचार्य मंदपणे हसले. किंचित कौतुकानं. फर्स्ट ईयरच्या डिबेट कंपिटिशनपासून फायनल इयरच्या मूट कोर्टापर्यंत प्रत्येक कसोटीत, वादात कणखरपणाने उभी राहिलेली ही त्यांची विद्यार्थिनी... आसपासचे सगळे आदर्श कोसळत असताना ताठ कण्यानं उभी राहिलेली ही ..  ही मॅडम.
"बसा, बसा... " अभावितपणे उठून उभ्या राहिलेल्या आशिष आणि शिल्पाला मॅडम मोकळेपणाने म्हणाल्या. समोरच्या तांब्यातलं पेलाभर पाणी त्यांनी ओतून घेतलं. मोगऱ्याचं एक फूल उचलून त्याचा एक दीर्घ, खोल श्वास घेतला आणि एखादी घट्ट गाठ मारल्यासारख्या आवाजात त्यांनी विचारलं, "हां, तर ते त्या आऊट ऑफ स्टेट विद्यार्थ्यांचं काय म्हणत होतास तू आशिष? "

(सत्य घटनेवर आधारित)