मराठी-मोबाईल-वेड्यांसाठी उपयुक्त माहिती!

नोकिया ५२२० - एक्स्प्रेस म्यूझिक... या फोनवर 320 x 240 ची स्क्रीन, संगीत, इंटरनेट, पुश ईमेल, ब्लू टूथ या बऱ्याच विशेषांसोबत आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे देवनागरी इनपुट आहे! एसेमेस, ईमेल वा या फोनच्या कुठल्याही मेन्यूमध्ये मला वाटलं तर देवनागरीत मी लिहू शकतो.

 

 
(चित्रांची गुणवत्ता तितकीशी बरी नाही. पण भावना पोहोचाव्यात. )

पार्श्वभूमी:

गेली एखाद दोन वर्षं ज्या एका गोष्टीची मी मनापासून वाट बघत होतो ती हाताशी गवसल्यावर सगळ्यांना ओरडून ओरडून दाखवावी असं वाटलं नि या वाटेला आलो. बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात एक सल होता. भारतीय मोबाईल कंपन्या त्यांच्या ’खालच्या’ (low end) मॉडेल्सवर देवनागरी लिहिण्याची सुविधा देतात, पण जसजशी ’वरची’ मॉडेल्स बघत जावीत तसतशी ही सोय हळूच काढून घेतलेली आढळते. जर तुम्हाला ब्लू टूथ, ईमेल, चांगलं संगीत असल्या गुणांनी युक्त मोबाईल हवा असेल, तर मग देवनागरीवर पाणी सोडा!

मोबाईल कंपन्यांना दोष का द्या; आपल्याच लोकांना मराठी - हिंदी भाषा मोबाईलवर / संगणकावर / मित्रमंडळींत आवर्जून वापराव्याश्या कुठे वाटतात? मोबाईल वा कुठल्याही उत्पादनाने / सेवादात्याने मराठी - हिंदीला अनुल्लेखाने मारलं तर आपल्याला राग कुठे येतो?

गेली पाच सात वर्षे कोरिया चीन देशांत राहिल्यामुळे, हे लोक त्यांच्या भाषांना कसा अग्रक्रम देतात ते अनुभवल्यामुळे आपली ही स्थिती पाहून स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यावसं वाटणं म्हणजे काय याचा पुरेपुर अनुभव मी घेत होतो. भारतात परतल्यावर एक नोकिया घेतला. तो थोडा खालचा होता. पण देवनागरी लेखन सुंदर होतं. प्रवासात ईमेल बघायची तर मोठ्या स्क्रीनचा फोन हवा म्हणून तो बदलला. मोठ्या म्हणजे 320 x 240 pixels स्क्रीनचा. घेताना त्यात पाहिलं तर मराठी नव्हती, पण हिंदी होती. म्हटलं अडचण नाही. घरी येऊन पाहिलं तर लक्षात आलं की ही हिंदी भाषा केवळ मेन्यू दाखवण्यापुरती आहे. हिंदीत एसेमेस, ईमेल काही लिहिता येत नाही. हिंदी इनपुटच नाही. ही तर तोंडाला पानं पुसण्याचीच लाईन! परत दुकानदाराकडे जाऊन फायदा तर नव्हताच. मग नोकिया सेवा केंद्रात निष्फळ चकरा झाल्या. त्यांच्या दूरध्वनी मदत सेवेकडे, संकेतस्थळावर तक्रारी झाल्या पण काय फायदा नाय. फोनवरून एक बया माझ्याशी बोलली, मी सांगितलेल्या तक्रारी / अडचणीबाबत खोटं सौजन्य तिनं दाखवलं, पण यात कंपनीची काही चूक आहे असं म्हणायला ती तयार नव्हती. नोकिया फोरमवर जाऊन याविषयी बोंब मारली. तिथे हीच अडचण असणारे बरेच भिडू भेटले. अभिव्यक्ती-हिंदी या हिंदी पाक्षिकात एक लेखही या विषयावर छापून आला.

या सर्वाचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून असेल नसेल, पण नुकताच नोकियाने एक ’वरचा’ मोबाईल देवनागरी लेखनासकट बाजारात आणला... ’नोकिया ५२२० - एक्स्प्रेस म्यूझिक’.

या फोनवर 320 x 240 ची स्क्रीन, संगीत, इंटरनेट, पुश ईमेल, ब्लू टूथ या बऱ्याच विशेषांसोबत माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे देवनागरी इनपुट आहे! एसेमेस, ईमेल वा या फोनच्या कुठल्याही मेन्यूमध्ये मला वाटलं तर देवनागरीत मी लिहू शकतो. मित्रहो, हा एक मोठा बदल आहे. तरूणाईमध्ये मराठी - हिंदीबाबत नव्याने आस्था निर्माण होते आहे, याची मोबाईल कंपन्यांना घ्यावी लागलेली ही दखल आहे. याचा प्रसार आपण अवश्य केला पाहिजे. म्हणजे नोकियाच्या बाकीच्या मॉडेल्समध्ये नि बाकिच्या कंपन्यांच्या हस्तध्वनींमध्येही देवनागरी लेखन वाचन शक्य होऊ शकेल.

मी सध्या चीनमध्ये राहतो. चीनमध्ये कुठलीही कंपनी कुठलंही उत्पादन चीनी भाषेसकटच देऊ शकते; इंग्रजी मेन्यू तोंडी लावण्यापुरता ठेवला तर ठेवते. पण चीनी भाषेला नजरेआड करू शकत नाही. भारतात इंग्रजीला हद्दपार करावी असं कुणी म्हणू नये, पण भारतीय भाषांना नजरेआड करण्याची कुठल्याही नफेखोराला हिम्मत होऊ नये अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. हं, पण यात ’वयं पंचाधिकं शतम’ ही भावना हवी.