सर्वसामान्य मतदार मतदानासाठी फारसा उत्सुक नसतो असे आतापर्यंतच्या निवडणुकांमधून प्रत्ययास आले आहे. म्हणून मतदानासाठी मतदारांना निरनिराळ्या प्रसारमाध्यमातून शासनातर्फे आवाहन केले जात आहे. असे आवाहन करताना मतदान हा प्रत्येक अठरा वर्षावरील नागरिकाचा हक्क आहे असा कंठरव शासन करीत असते पण तो हक्क त्यांना बजावता यावा यासाठी शासन, उमेदवार आणि त्यांचे पक्ष काहीच करताना दिसत नाहीत.याच वेळेचा आमचा अनुभव पहायला गेल्यास आमच्या संकुलातील बहुसंख्य मतदारांना उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मतदानकेंद्राची आणि त्यांच्या मतदार यादीतील क्रमांकाची पूर्वकल्पना दिली नव्हती. मतदारांच्या याद्यामध्ये जितके गोंधळ घालता येतील तेवढे मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या निमित्ताने घालण्यात आले. पुनर्रचना करण्यामागील तर्कशास्त्र काय होते हे कोणत्याही सामान्य नागरिकाच्या आकलनापलीकडले होते.आम्ही सिंहगड रस्त्यावर रहाणारे नागरिक पुण्यात असून आम्हाला बारामती मतदारसंघात का टाकण्यात आले हे एक साहेबच जाणे ! सिंहगडरस्त्यावरीलच आनंदनगर भागातील नागरिक मात्र पुणे मतदार संघात आहेत.
पुण्यातील नागरिकाला बारामती मतदार संघासाठी मतदान करण्यात काय स्वारस्य असणार आहे ? आता ही लोकसभा निवडणूक आहे म्हणून स्थानिक समस्यांचा या निवडणुकीशी काय संबंध असे राजनीतिज्ञ विचारतील, पण उमेदवार स्थानिक असेल तरच मतदान करण्याची थोडी बहुत इच्छा वाटेल. मतदान केंद्र तरी कमीतकमी अंतरावर असावे अशी साधी अपेक्षाही शासनाचे इमानी सेवक पुरी करू शकले नाहीत.आम्ही ज्या मतदानकेंद्रावर मतदानासाठी गेलो ते मतदान केंद्र (कै.चंद्रकांत यशवंत दांगट पाटील प्रशाला) कोठे आहे याची माहिती उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीपैकी कोणी दिलीच नाही परंतु तिकडे जाणारा रस्ताही वाहनांसाठी बंद ठेवून मैल दीड मैलाची पायपीट मतदारांना करावी लागेल याची दक्षता घेण्यात आली होती.इतकेच नव्हे तर त्या रस्त्यावरील शेवटचा चढ इतका अवघड होता की तेथपर्यंत आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांना नाइलाजाने मतदान न करताच परत जावे लागले..माझ्या एका मित्राला मी मोठ्या आग्रहाने मतदानाच्या घोड्यावर बसवले,त्याने आजपर्यंत एकदाही मतदान केले नव्हते.पण यावेळी माझ्या आग्रहाखातर मतदानास गेल्यावर त्याचे मतदान केंद्र शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे असे त्याला सांगण्यात आले.दोन पावलेही कष्टाने चालू शकणाऱ्या या नागरिकाला तिसऱ्या मजल्यावर मतदानासाठी जाणे ही शिक्षाच वाटल्यास नवल नाही.शिवाय शिवबाच्या मावळासारखे कर्तव्यदक्ष निवडणूक अधिकारीही काही ठिकाणी बसून अगदी द. मा. मिरासदारांनाही ओळखायला तयार नव्हते. एकूण काय तर तुम्हाला जरूर असेल तर मतदान करा आम्हाला त्याची आवश्यकता नाही असा दृष्टिकोण जर उमेदवारांनी आणि राज्यकर्त्यांनीही दाखवला तर निवडणुकीची "आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास " अशी गत होणार यात वादच नाही