आमच्यात ही भांडणे साडे तीनशे वर्षांनी का लावता?

काही संघटनांनी दादोजी कोंडदेवांचा उल्लेख महाराजांचे गुरू या अर्थी केला जाऊ नये अशी मागणी केली त्याबाबत हा एक प्रस्ताव आहे.

आपल्या मतांची अपेक्षा आहे.

१. ही मागणी करण्यात संघटनेचा मूळ उद्देश काय असावा?
२. आजवर सांगीतला गेलेला इतिहास असा बदलणे योग्य ठरेल काय?
३. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचाही मूळ उद्देश काय असावा?
४. जवळ जवळ ३५० वर्षांनी यातील उल्लेखांचा किंवा सत्याचा आजच्या कुठल्याही माणसाच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडेल काय?
५. महाराज तर सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते असे उल्लेख आहेत. काही इस्लामधर्मीयही त्यांच्या विश्वासातील म्हणून काम पाहायाचे. मग आपल्याच धर्मातील परजातीतील लोकांबाबत स्वतः महाराजांनी कधी अनादराची भूमिका घेतली असती काय? जर त्यांनीच घेतली नसती असे उत्तर असेल तर इतरांनी तशी घेण्याची काही कारण आहे काय? ( हा मुद्दा क्रमांक १ सारखाच प्रश्न वाटणे साहजिक आहे. )
६. एकाद्या ब्राह्मण जातीतील माणसाला दादोजी कोंडदेवांचे किंवा रामदास स्वामींचे इतिहासातील महत्त्व कमी केल्याचे जसे दुःख होऊ शकेल तसाच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनी आनंदही होऊ शकेल.  एखाद्या मराठा समाजातील माणसाला कदाचित नेमके उलटे वाटू शकेल. पण आपली उर्जा, शक्ति, बुद्धी, वेळ या गोष्टींवर घालायला भाग पाडणे हे राजकीय संघटनांचे चुकीचे वर्तन नाही काय?
७. विशाळगडावर तोफा धडाडेपर्यंत लढून शेवटी स्वतःचा जीव घालवणारे बाजीप्रभू देशपांडे यांचाही उल्लेख हळू हळू टाळणार काय? मुरारबाजी पुरंदऱ्यांचा उल्लेखही टाळणार काय?
८. 'अफजलखानाचा कोथळा' वगैरे उल्लेख काढून टाकावेत या स्वरुपाच्या मागण्यांना काही अर्थ आहे काय? जे झाल्याचे आजवर सांगीतले गेले आहे त्यात आज बदल करण्याची मागणी करणे हे चुकीचे नाही काय?
९. मराठ्यांनाही अनेक पराभव सहन करावे लागले. त्यांचे उल्लेख काढून टाकणार काय?
१०. महाराजांच्या दैदीप्यमान कारकीर्दीत इतर कुठल्याही किंवा ब्राह्मण जातीतील कुणीही योगदान दिले नाही असे सिद्ध करण्याचा हा खटाटोप आहे काय?
 
माझे वैयक्तिक मत असे आहे की यातील कुठल्याच संघटनेची / पक्षाची भूमिका वा मूळ मागणी ही आजच्या लोकशाही शासन प्रणालीत व संपूर्ण भारत एक असताना पूर्णपणे अनावश्यक आहे. आपल्याकडे जेव्हा ( साधारणपणे ) रामदास स्वामी मनाचे श्लोक लिहीत बलोपासनेचा प्रचार करण्यासाठी सर्वत्र विहार करत होते तेव्हा परदेशात मार्कोनी रेडिऑचा शोध लावत होता. आपण अजूनही त्याच त्याच इतिहासात आपला वेळ व उर्जा घालवून एकमेकांचा विरोध का करत बसतो? ( आपण म्हणजे सदर संघटना किंवा पक्ष ).

मागे एका प्रतिसादात श्री टग्या यांनी एक अत्यंत योग्य मुद्दा मांडला होता. आजही कशालाही ( रस्ता, संस्था, पूल वगैरे ) नाव द्यायची वेळ आली की बिचाऱ्या महाराजांनाच वेठीला धरतात. आपण स्वत"ला त्या काळाची आठवण व शिकवण ही करून घेतलीच पाहिजे, पण त्या काळावरून आज भांडणे करण्यात काय अर्थ आहे? अशी भांडणे करायला लावणाऱ्यांना कोण काय सांगणार?