आले माहेरी माहेरी माझ्या विठाईच्या दारी
फारा दिसांनी ग झाली माझी पंढरीची वारी
वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा
नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना
खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली
नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी
काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या
वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या
नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर
नव्या आठवांची घेते घेते भरून घागर
आता पाय स्पर्शू किती घेऊ आशीर्वाद किती
किती मातीचे ओघळ ओघळवू मी या हाती
माझी पंढरीची वाट वाट सूर्याची पूर्वीची
आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची
गेलं माहेर माहेर झाला वळसा वळसा
चंद्रभागेच्या पाण्यात माझा बुडला कळसा