जागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन?

आज जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्या शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यातच कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीस या वर्षीपासून सुरूवात होत असल्याने या वर्षीचा जागतिक मराठी दिन विशेष महत्वाचा आहे. पण जागतिक मराठी दिन साजरा होत असताना आज मराठीची नेमकी स्थिती कशी दिसते?

सोनेरी मुकुट परिधान केलेली मराठी अंगावर लक्तरे घालून मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे वक्तव्य कुसुमाग्रजांनी एकेकाळी केले होते, पण त्यांचे ते म्हणणे शासनाला उद्देशून होते. त्यावेळी मराठीला लोकाश्रय तरी होता; आज मात्र दुर्दैवाने तसे म्हणता येणार नाही. आजच्या मराठी भाषेच्या अंगावर लक्तरे काय, लज्जारक्षणासाठीही पुरेसे कपडे नाहीत असेच खेदाने म्हणावे लागेल आणि तिच्या या अवस्थेसाठी मराठी माणूस नि फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे हे कटू सत्य मान्य करून घ्यावेच लागेल. मराठी शाळा ओस पडत आहेत, मराठी पुस्तकांचे वाचन घटत आहे. दारांवरच्या नावाच्या पट्ट्यांवरून, दुकानांच्या नामफलकांवरून मराठी हद्दपार होते आहे. इंग्रजी शब्द जास्त नि मराठी शब्द कमी अशी धेडगुजरी "मराठी" वाक्ये आजचा मराठी माणूस बोलत आहे. किंबहुना त्याला मराठीची लाज वाटते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. जन्माला आलेला प्रत्येक जीव एकेदिवशी मृत्यु पावतो, भाषेचेही असेच असते. जगात पहिल्या क्रमांकावर असलेली मॅंडेरीन, स्वत:ला जागतिक भाषा म्हणवणारी इंग्रजी या भाषाही एके दिवशी अस्तंगत होणार, मग मराठी त्याला अपवाद कशी असेल? पण मराठीचे हाल असेच चालू राहिले तर तिचे मरण नैसर्गिक म्हणता येणार नाही, तो एक खून असेल, मराठीचा मराठी भाषिकांनी केलेला खून!

सर्वप्रथम, मराठी नष्ट झाली तर होणारे नुकसान हे आपले असेल हे मराठी भाषिकांनी ध्यानात घ्यायला हवे. मराठी नष्ट झाली तर जगातले भाषातज्ञ काही वेळ हळहळतील पण सगळ्यात मोठा तोटा होईल तो आपला, हे मराठी भाषिकांना का कळत नाही? आपण ओळखले जातो ते आपल्या भाषेमुळे. मराठी, गुजराथी, पंजाबी, मल्याळी हे मानवसमुह या नावांनी का ओळखले जातात? त्यांच्या भाषेमुळे. जर मराठी नष्ट झाली तर आपली ओळखच आपण गमावून बसू हे मराठी भाषकांना का समजत नाही?

इंग्रजी अर्थार्जनासाठी आवश्यक आहे हे मान्य, पण ती मातृभाषा कशी होईल? लहान मुलाला झोपताना "निंबोणीच्या झाडामागे" हीच कविता हवी, संकटांचे काळे ढग दाटून आलेले असताना धीर येण्यासाठी कुसुमाग्रजांची "कणा" कविताच हवी आणि श्रावण महिन्यात उनपावसाचा खेळ पाहून झालेला आनंद वाटून घेण्यासाठी बालकवींची "श्रावणमासी, हर्ष मानसी" हीच कविता हवी. आयुष्याच्या सुखदु:खाच्या खेळात फक्त आपली मातृभाषाच साथ देऊ शकते हे मराठी माणसाच्या ध्यानात का येत नाही?

पण आणि हा पणच खूप महत्वाचा आहे. स्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. आपण आजही मराठी वाचवू शकतो आणि वाढवूही शकतो. यासाठी मी स्वत: वापरत असलेले काही उपाय मी इथे सांगतो आहे. मराठी संवर्धनासाठीचे काही उपाय जर आपल्याकडेही असतील तर त्यांचे इथे स्वागतच आहे.

१) मराठीचा वापर करा. पण कुठे? शक्य असेल तिथे तिथे! दुकानात, रस्त्यावर, दूरध्वनीवर बोलताना, पत्रे लिहिताना, याद्या करताना, आपले नाव लिहिताना जिथे जिथे मराठी वापरता येईल तिथे ती वापरा. आपली मातृभाषा मराठी आहे नि इंग्रजी ही आपण फक्त अर्थार्जनासाठी स्विकारलेली परकीय भाषा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. इंग्रजी नि मराठी हे पर्याय उपलब्ध असतील तर नक्की मराठीचाच पर्याय निवडा. (एटीएम सोयीचा वापर करताना मी नेहमी मराठीचाच पर्याय निवडतो.) कायद्याचे कागद मराठीतच करा.(नुकताच आम्ही केलेला जमिनखरेदीचा व्यवहार आम्ही मराठीतच नोंदवला.) बॅंका, विविधवस्तूभांडारे, उंची हॉटेले इत्यादी ठिकाणी आवर्जून मराठी बोला. जर मराठी भाषेचा पर्याय ह्या संस्था तुम्हाला उपलब्ध करून देत नसतील तर त्यांच्याशी भांडा, पण मराठीचाच आग्रह धरा.

२) इतरांकडूनही मराठीचा आग्रह धरा. जर तुमचे मित्र इंग्रजी वापरत असतील तर त्यांना तसे न करण्याबाबत सांगा. जर वाहिन्यांवर, रेडिओवर, वर्तमानपत्रांमधील मराठीबाबत आपण समाधानी नसाल तर त्यांना तसे नक्की कळवा. आपण महाराष्ट्रात राहतो आणि या राज्याची अधिकृत भाषा असलेल्या मराठी भाषेचा आग्रह धरण्यात काहीही चुकीचे नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.

३) मराठीच्या शुद्धतेचा आग्रह धरा. फक्त सर्वनामे नि क्रियापदे मराठीत वापरणे म्हणजे मराठी बोलणे नव्हे. अंक, वारांची नावे मराठीच वापरा. (मी नेहमी माझा भ्रमणध्वनी क्रमांक मराठीतच सांगतो.) रुळलेल्या मराठी शब्दांच्या जागी जर कुणी इंग्रजी शब्द वापरत असेल तर ती चूक त्यांच्या लक्षात आणून द्या. मराठी लिहिताना तुम्ही ती शुद्ध लिहाल याची काळजी घ्या आणि इतरांकडूनही मराठीच्या शुद्धतेबाबत आग्रही धरा. मराठी अशुद्ध लिहिणाऱ्या नि वर त्याचे समर्थन करणाऱ्यांना मी एकच प्रश्न विचारून निरूत्तर करतो. जर तुम्ही तुमचे नाव लिहिताना ते अचूक लिहिण्याची काळजी घेत असाल तर इतर मराठी शब्द लिहिताना निष्काळजीपणा का दाखवता? इंग्रजी शब्द लिहिताना त्यांमधे चुका न होण्याबाबत तुम्ही खबरदारी घेता, मग मराठीबाबतच ही बेपर्वाई का?

४) अमराठी सहकाऱ्यांना मराठी शिकवा, त्यांना मराठीची ओळख करून द्या. अमराठी लोक मराठी शिकण्यासाठी नेहमीच तयार असतात असा माझा तरी अनुभव आहे. त्यांच्याशी शक्य असेल तिथे मराठी बोला. त्यांना मराठी शिकवा, साधीसोपी वाक्ये त्यांना ऐकवा, त्यांचा अर्थ त्यांना समजावून द्या.

चला तर मग! भाषिकांच्या संख्येनुसार जगातल्या पहिल्या पंचवीस भाषांमधे मोडणारी, भारतात भाषिकांच्या संख्येनुसार प्रादेशिक भाषांमधे पहिल्या क्रमाकांवर असणारी, एकाचवेळी राकट, कणखर आणि नाजूक, कोमल, फुलांसारखी मृदु असणारी अमृताहूनी गोड अशी ही आपली मातृभाषा - मराठी टिकवूया आणि वाढवूया!

टीप : सदर लेख माझी जालनिशी दुवा क्र. १ येथेही प्रकाशित करतो आहे. वास्तविक एकच लेख चार ठिकाणी प्रकाशित करणे योग्य नव्हे आणि तसे करणे काही संकेतस्थळांच्या नियमाविरुद्धही आहे हे मी जाणतो. परंतु या लेखाचा विषय पाहून (तो अनेकांपर्यंत पोचणे आवश्यक असल्याने) त्याला अपवाद करावा ही या संकेतस्थळाच्या चालकांना नम्र विनंती.