महाभारत कथा (१७)

महाभारत कथा (१७)
महाभारताच्या महायुद्धामागे खरे कारण नेमके काय होते?
द्रौपदीच्या अपमानापासून ही कथा सुरू झाली... की वैराची बीजे त्याआधीच रोवली गेली होती?
कुंती, पांडव, कौरव, कर्ण आणि दुर्योधन यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची एक गुंतागुंतीची साखळी या प्रश्नाचे उत्तर देते.
कारण युद्धाचा शेवट जरी रणांगणावर झाला, तरी त्याची सुरुवात त्याही आधी झाली होती...

महाभारतकथेमध्ये सद्गुणी आणि दुर्गुणी अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तिरेखा आहेत. त्या सर्वांच्या चरित्राचे वर्णन मात्र तटस्थ आणि त्रयस्थ दृष्टिकोनातून केलेले आढळते. कोण चांगला? कोण वाईट? याबद्दल न लिहिता फक्त घटना आणि प्रसंगांची वर्णने केलेली आहेत. कथा वाचणाऱ्याने/ ऐकणाऱ्याने त्यावरून निष्कर्ष काढावा. दुर्योधन हा तर कथेतील खलनायक आहे. त्याने अनेक कुटील कारस्थाने केली आणि त्याच्या सत्तालालसेमुळे कुळाचा विध्वंस झाला. परंतु तो उत्तम योद्धा आहे. श्रीकृष्णाचे बंधू बलराम यांचा तो पट्टशिष्य आहे. तसेच कर्णाची आणि त्याची मैत्री सुद्धा उल्लेखनीय आहे. कर्ण हा तर प्रत्यक्ष सूर्यदेवांचा पुत्र -- त्याचे शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्ता याचेही वर्णन कथेमध्ये येते. कर्णाने सतप्रवृत्त पांडवांशी वैर केले, खलप्रवृत्तीच्या दुर्योधनाला शेवटपर्यंत सहकार्य केले त्यामुळे तोही खलनायकच ठरला. परंतु त्याचे दुर्दैव, त्याच्यावर झालेला अन्याय याचेही वर्णन कथाकार करतात त्यामुळे कर्णाला सहानुभूती मिळते.

महाभारतामध्ये अनेक प्रभावी व्यक्तिरेखा आहेत त्यातील काही इतिहास घडविण्यास किंवा बदलण्यास कारणीभूत ठरल्या असे म्हणता येईल. काही विद्वान आणि कथालेखकांच्या मते द्रौपदी हीच महाभारत युद्धाचे कारण आहे. तिने स्वयंवर मंडपात कर्णाचा अपमान केला, मयसभेमध्ये दुर्योधनाची कुचेष्टा केली, तो राग मनात ठेवूनच दरबारामध्ये तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. द्रौपदीचा भरसभेमध्ये अपमान करण्यात आला म्हणून महायुद्ध घडले.

पण हे पूर्ण सत्य नाही. कुंती आणि पाच पांडवांनी हस्तिनापुरामध्ये प्रवेश केल्यापासूनच वैर उत्पन्न झाले होते. द्रौपदीच्या गृहप्रवेशाआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये कौरव पांडवांमध्ये असलेले वितुष्ट समोर येते.

कुंतीदेवी तिच्या पाच पुत्रांसह हस्तिनापुरामध्ये वास्तव्यासाठी आली तेव्हाच कलहाची बीजे रोवली गेली होती. पांडव जन्मजात दैवीअंश होते, अनेक उत्तम गुणांनी युक्त होते. माता कुंतीने त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेले होते. पांडव विनम्र, आज्ञाधारक आणि सदहृदयी होते. पितामह भीष्मांनी गुरु द्रोणाचार्यांना राजपुत्राच्या शिक्षणाकरता आमंत्रित केले. विद्याभ्यासात पांडव कौरव कुमारांपेक्षा सरस होते. धर्मराजा विद्वान होता. धर्म, अर्थ, न्याय आणि युद्धनीती या विषयातील त्याचे ज्ञान अजोड होते. वायुपुत्र भीम द्वंद्व युद्धामध्ये निष्णात होता. गदायुद्धामधे त्याची बरोबरी करू शकेल असा कुणीही वीर नव्हता. दुर्योधनाला गदायुद्धाचे उत्तम ज्ञान होते पण तरीही भीम त्याच्यापेक्षा काकणभर सरस होता. अर्जुन श्रेष्ठ धनुर्धारी होता, द्रोणाचार्यांनी त्यालाच ब्रह्मास्त्र विद्या दिलेली होती. काही कारणाने त्याला वनवासी होऊन राहायला लागले तेव्हा त्याने अखंड साधना करून अनेक उत्तम अस्त्रे आणि शस्त्रे प्राप्त केलेली होती. नकुल आणि सहदेव उत्तम अश्व परीक्षक होते. रथांना जोडलेले अश्व हे युद्ध प्रसंगी फार महत्त्वाचे असतात. त्यांना उत्तम प्रशिक्षण दिलेले असेल तर कठीण प्रसंगी ते मार्ग काढू शकतात. अशातऱ्हेने पाचही राजपुत्र राजपदास आवश्यक असलेल्या सर्व विद्यांमध्ये पारंगत होते. कुंतीने ते सदैव एकोप्याने राहतील याची काळजी घेतली होती आणि नंतर द्रौपदीने त्यांची एकी अभंग राखली. कारण त्या दोघीजणी जाणून होत्या, पांडव एकत्र असतील तेव्हाच अजिंक्य असतील.

पांडवांचे सतत होणारे कौतुक, विविध प्रसंगी त्यांच्याकडून पत्करावी लागलेली हार, दुर्योधन, दुःशासन इत्यादी कौरव कुमारांना त्रासदायक वाटत असे. पांडवांविषयी त्यांना मत्सर वाटत असे आणि पराकोटीचा द्वेषही. द्वेष इतका की पांडवांना ठार मारण्याचे त्यांनी असंख्यवेळा प्रयत्न केले होते. कधी विषप्रयोगाने तर कधी पाण्यात बुडवून तर कधी लाक्षागृहामध्ये जिवंत जाळून त्यांची हत्या करण्याचे प्रयास केले होते. या सर्व अनुभवांनी पांडव सावध झाले होते. माता कुंती आणि महात्मा विदुर पांडवांच्या रक्षणाकरता जागरूक असत.

कौरव आणि पांडवांच्या व्यतिरिक्त अन्य काही कुमार द्रोणाचार्याचे शिष्य होते, जसे अश्वत्थामा आणि कर्ण. अश्वत्थामा द्रोणपुत्र असल्याने त्याला नेहमी विशेष वागणूक दिली जात असे. या उलट कर्ण केवळ सूतपुत्र होता. त्याला नाईलाजाने (बहुदा भीष्मांच्या विनंतीवरून) गुरुकुलामध्ये प्रवेश दिलेला होता. कर्ण असामान्य योद्धा होता, उत्तम धनुर्धारी होता आणि म्हणून की काय ? त्याला अर्जुनाला मिळणाऱ्या प्रशंसेचे नेहमी वैषम्य वाटे. राजपुत्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर जनतेसमोर त्याच्या ज्ञानाचे, गुण आणि कौशल्याचे  प्रदर्शन घडविण्यात येणार होती. एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ज्यामुळे जो उत्तम असेल त्याला सन्मानित केले जाईल. स्पर्धेमध्ये कर्णाला प्रवेश नाकारण्यात आला होता कारण तो सामान्य प्रजाजन होता. दुर्योधन त्याचा परम मित्र होता, त्यानेच कर्णाला अंगदेशीचे राज्य दिले होते. कर्ण राजा होता त्यामुळे त्याला स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार होते. या प्रसंगी कुंती त्या स्थळी उपस्थित होती आणि कर्ण तिचाच पुत्र आहे हेही ती जाणत होती. परंतु तिने त्याची अवहेलना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रसंगाचे वर्णन अतिशय नाट्यमय पद्धतीने केलेले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास उत्सुक विद्यार्थी आणि त्याला नाकारणारे गुरु. 

--- कर्ण हा कुंतीचा विवाहापूर्वी जन्मलेला पुत्र होता. विवाहानंतर अनेक वर्षे ती अपत्यहीन होती. वनवासामध्ये पतीच्या आज्ञेने तिने बीजमंत्राचा जप केला आणि पांडवांचा जन्म झाला. अशीच कथा सांगितली जाते. याचाच अर्थ कर्ण वयाने पांडवांपेक्षा (किमान काही वर्षांनी) ज्येष्ठ होता,

--- स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश राजपुत्रांची विद्या आणि कौशल्य यांचे जनतेस दर्शन घडविणे असाच होता. त्यामुळे कर्णास स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध कारणे चूक ठरत नाही,

--- दुर्योधन हा द्रोणांचा विद्यार्थी होता आणि राजपुत्र होता. असे असताना हस्तिनापूर साम्राज्याच्या अंकित असलेल्या थोड्या भूभागाचे राजेपद त्याने कर्णाला बहाल केले. तो अधिकार स्वतः सम्राट किंवा ज्येष्ठ दरबारी यांचाच असू शकतो. याचा अर्थ त्यावेळीसुद्धा दुर्योधनाचा शब्द मोडण्याचे साहस कुणीही करत नव्हते असाच आहे.

या घटनेमुळे कर्ण दुर्योधनाचा आजन्म ऋणी झाला होता आणि त्याच्याही मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण झालेला होता. भविष्यातील सूड आणि वैराची ती सुरुवात होती असे म्हणणे वावगे होणार नाही.

राजकुमाराचे अध्ययन पूर्ण झाल्यावर द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्रुपद राजाला बंदी करून आणण्यास सांगितले. प्रथम कौरवांनी पांचाळ देशावर ससैन्य आक्रमण केले, त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. प्राणभयाने रणांगणातून त्यांना पलायन करावे लागले होते. त्यानंतर पांडवांनी द्रुपदाला युद्धाचे आव्हान दिले. भीम आणि अर्जुनाच्या पराक्रमासमोर द्रुपदसेना दुबळी ठरली होती. द्रुपदाला कैद करून द्रोणांसमोर आणण्यात आले, त्याच्या राज्यातले सारे गोधन लुटून आणण्यात आले होते. द्रोणांनी द्रुपद राजाला अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या अपमानकारक प्रसंगाची आठवण करून दिली. द्रुपदाने क्षमायाचना केल्यावर त्याला मुक्त करण्यात आले. द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा देऊन पांडवांनी शिष्यांचे कर्तव्य निभावले होते. द्रोणाचार्यांना त्याच्या अपमानाचा सूड घेतल्याचे समाधान मिळाले होते. या प्रसंगातसुद्धा पांडव कौरवांपेक्षा सरस ठरले होते.

महाभारत कथेमध्ये कौरव आणि पांडवांमधील वैराचे असे अनेक प्रसंग वर्णन केले आहेत. कुमारवयातदेखील दुर्योधन पांडवांचा द्वेषच करीत होता आणि पांडवांच्या गुणश्रेष्ठतेमुळे प्रजाजनांना मात्र त्यांच्याविषयी आदर आणि कौतुक होते. म्हणूनच केवळ एका प्रसंगामुळे युद्ध घडले असे म्हणता येणार नाही. महाभारत अशा अनेक प्रसंगांची मालिकाच आहे, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग केवळ निमित्तमात्र आहे असेच म्हणावे लागेल. "कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली" असे म्हणावे हवे तर.

***