ती एक आई

तिचा एक लहान मूल ते आई हा पूर्ण प्रवास मी पाहिला आहे. दोन वर्षापूर्वीची गोष्ट, पण अगदी आताआताची वाटणारी. 


'बाहेर गॅलरीत काय करतेयस सकाळी सकाळी?आंघोळीचं पाणी वाहून चाललंय.'
'हो रे, ती बघ ना, किती छान शिकवतेय मुलाला..तेच बघतेय.'


'आता बिल्डिंगमध्ये कोणाचं लहान मूल आहे बरं?' विचार करत आशू कुतूहलाने बाहेर गेला. पाहतो तर काय, समोर कुंपणावर एक मांजर आणि तिचं अगदी लहान पिल्लू. मांजर पांढरं शुभ्र. पिल्लू पांढरं ,काळं आणि सोनेरी. बहुधा आंतरजातीय विवाहाचं अपत्य असावं! कुंपण अर्धं दगडी,वर अर्धं तारेचं. आणि मध्ये थोडी मोकळी जागा. मांजर सारखी कुंपणातून अंग चोरून पलीकडे जायची, आणि पिल्लाकडे बघून 'म्यांव' करायची. 'म्यांव!!कळत कसं नाही तुला, हे बघ, मी पुन्हा दाखवते. हे असं अंग चोरायचं, हा असा पाय वरती घ्यायचा आणि मग भोकातून पलीकडे जायचं.' पिल्लू बहुतेक शिकण्याच्या मूडमधे नसावं. 'काय कटकट आहे!!मला नाही जमत. आणि नाही जमलं तर काय फरक पडणार आहे?' म्हणून ते शांतपणे आईकडे बघत होतं. आई फारच वैतागली. जोरात 'म्यांव!!!' करुन त्याच्यावर ओरडली. 'मूर्ख!! निमूटपणे मी सांगते तसं कर नाहीतर बोक्याला बोलावीन हं!!'
अंघोळ करून पटापट जायचं म्हणून अनिच्छेने मी अंघोळीला वळले. ही शिकवणी बरेच दिवस चालली होती. शेवटी एक दिवस ते पिल्लू आईला कुंपणातून बाहेर येऊन दाखवत होतं. आईने लाडात येऊन 'म्यांव' केलं. 'गुणाचं माझं पोर ते!! अरे आपल्या जातीला चपळपणा शिकावाच लागतो. नुसतं बसून कसं चालेल?'


रोज सकाळी बाहेर निघायची घाई आणि संध्याकाळी कामांची.. आई आणि पिल्लू यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच सवड नव्हती. मधे मधे अशीच उंदीर पकडायची किंवा लांब उडी मारायची शिकवणी चालताना दिसायची तितकीच. ती दोघं काय खायची कोणास ठाऊक. पण त्यांना कधी दूध चोरताना कोणी पाहिलं नाही. हळूहळू तीही दिसायची बंद झाली.


दोन वर्षानंतर..
बिल्डिंगमध्ये खाली  गणपतीचे कार्यक्रम चालू होते. 'आभारप्रदर्शन आणि श्रीफळ दान समारंभ' चालू झाला.
'चल रे, जरा चक्कर टाकून येऊया बिल्डिंगभोवती. अजून गाण्याच्या भेंड्या सुरू व्हायला वेळ आहे.' 
बिल्डिंगच्या मेंदीच्या कुंपणातून एक राखाडी डोकं बाहेर आलं. 'म्यांव!!म्यांव!!' करुन पायाला घासू लागलं. पाऊस पडत होता.
'बघ ना, किती गोड आहे. आणि मनमिळाऊ पण. किती पटकन आलं जवळ.'
'हे मी पाहिलं आहे. त्या काळ्या पांढऱ्या सोनेरी मांजरीचं हे पिल्लू.'
पिल्लू साधारण किशोरवयीन असावं. त्याच्या डोळ्यात 'मी एकटा पडलोय' अशी भावना स्पष्ट दिसत होती. उचललं तर ते पटकन सरसर खांद्यावर जाऊन बसलं. (गेली गं बाई माझी चांगली ओढणी!!)
'दूध आण पटकन वरुन.'
'दूध संपलंय.'
'मग मारी बिस्कीट आण. आज नेमकी पोळी पण नाही उरलेली.'
'मारी बिस्कीट' आवडणाऱ्यांपेक्षा न आवडणाऱ्यांची संख्याच जास्त. पिल्लू पण त्यापैकीच एक असावं. ते नुसतं बिस्कीटाकडे पाहून म्यांव! करत होतं. बिस्कीटाचा चुरा केला आणि तो हातावर ठेवला. पिल्लाने चुरा मात्र खाल्ला. त्याला वरती घेऊन गेले.    
'अगं, सवय लागेल त्या पिल्लाला आत यायची. उद्या आपण नसताना शी शू करुन ठेवली तर कोण निस्तरणार?'
'आता कसं सोडू? बाहेर पाऊस आहे. हे तर अंधारात कोणाला दिसणार पण नाही. एखादी गाडी गेली तर?'
'पण आपण ठेऊन दिवसभर घरात तरी असतो का त्याची काळजी घ्यायला? आणि तळमजला पण नाही. दुसऱ्या मजल्यावर त्याला शी लागली तर ते काय खाली उतरुन मातीत जाणार आहे?का आपण नसताना सार्वजनिक प्रसाधनगृहाची भिंतीला अडकवलेली किल्ली घेऊन तिथे जाणार आहे?'
'तू भलते फाटे फोडू नकोस रे! मला माहिती आहे सगळं. बिचाऱ्याला या पावसात सोडवत नाहीये म्हणून थोडावेळ वर आणलं.'


पिल्लाला खाली घेऊन आले. दुचाकीच्या सीटवर ठेवलं आणि मागे वळले. ते लगेच उडी मारुन धावत मागे आलं. 'म्यांव!! मला सोडून जाऊ नको ना! मी पण येतो!' मग त्याला परत उचललं. पाऊस पडतच होता. मेंदीच्या कुंपणात त्यातल्या त्यात कोरड्या जागी त्याला सोडून मागे वळले. 'मी यांना नको आहे' हे पिल्लाला  त्या वयातही कळलं असावं बहुतेक. ते आता मागे न येता नुसतंच कुंपणातून डोकं काढून म्यांव!! म्यांव!! करत होतं. त्याच्या डोळ्यातले भाव सांगत होते..'नको ना मला इथे सोडूस!! इथे पाऊस आहे. मला घर हवं, प्रेम हवं, काळजी घेणारी माणसं हवीत..' आवंढा गिळत मागे फिरले. वाटेत वॉचमन भेटला.  'काका, त्या पिल्लाकडे जरा लक्ष ठेवा हं. रात्रीचं कोणाला दिसणार पण नाही. गाडीखाली वगैरे आलं तर..' 


सकाळी येता जाता डोक्यात तोच विचार. 'कुठे गेलं असेल बरं? हल्ली कुंपणात दिसत का नाही?'
दारावरची घंटा वाजली.
'काय गं लक्ष्मी?'
'बाई, ते त्या दिवशी तुमच्याकडे होतं ते पिल्लू लिफ्टच्या मागे मान मुरगळून पडलंय. वास येतोय.'
मला त्याची त्या दिवशीची नजर आठवली. 'तेव्हा त्याला राहू दिलं असतं तर.. बिचाऱ्याला इतकं वाईट मरण तरी नसतं आलं.' 


चार दिवसांनी सकाळी..
'अनु, बाहेर तुझे पाहुणे आलेयत बघ.'
'माझे पाहुणे? सकाळी सकाळी?'
दार उघडून बघते तर एक अगदी चिमुकलं पिल्लू चपलांपाशी कुडकुडत बसलं होतं. फारच लहान असावं. त्याला चालता पण येत नव्हतं. दूरुन 'म्यांव!!' आवाज आला. तीच काळी पांढरी सोनेरी आई बघत होती. 'मी जरा याच्या बाबांबरोबर बाहेर जाऊन येते हं! नीट काळजी घ्या त्याची.' 
पाऊस पडला होता. हवेत गारवा होता. पिल्लू अगदी अशक्त होतं.
'त्याला दूध द्यायला पाहिजे.'
दुधाची ताटली त्याच्याजवळ ठेवली. 'दूध ताटलीत ठेवतात आणि ते पिण्यासाठी असतं' ही संकल्पना त्याच्यासाठी नविन असावी. ते पुढे येऊन त्या ताटलीत पाय ठेऊन बसलं.
'अरे मूर्खा, दूध प्यायचं असतं. त्याच्यात पाय नसतात ठेवायचे.'
'त्याला दुधाची चव कळली पाहिजे. मग पिईल ते.'  
म्हणून कापसाचा बोळा दुधात बुडवून त्याच्या तोंडात पिळला. चव आवडली कि नाही माहित नाही, पण ते प्यायलं.


पुढचे दोन दिवस पिल्लू नुसतं झोपत होतं. आई त्याला सकाळ संध्याकळ बघून जायची. पण ती शिष्ठ असावी. माणसं असताना कधीच जवळ नाही यायची. आणि दुरुनच रागाने बघून 'म्यांव! म्यांव!' करत रहायची. 'मेलं मला सारखं बाहेर जावं लागतं म्हणून माझं मूल तुमच्यासारख्यांच्याकडे ठेवावं लागतं. नाहीतर मी कुण्णाची मिंधी नाही.' हे तिचं तत्व. पण पिल्लू अशक्त आणि त्याच्या कै. भावापेक्षा मंद असलं तरी त्याच्याशी गट्टी जमली होती. दार किलकिलं ठेऊन आईला पिल्लापाशी येऊ देऊन त्यांना नकळत पाहणं हा आता सर्वांचाच आवडता उद्योग होऊन बसला होता.


'काकू, मी घेऊन जाऊ पिल्लाला माझ्याकडे?'
'नको रे, ते लहान आहे ना?त्याची आई रडेल ना! तुला कोणी घेऊन गेलं तर तुझ्या आईला भिती वाटेल ना? बरं झालं आणि जरा मोठं झालं कि घेऊन जा हं!' 


पिल्लाचा अशक्तपणा कमी झाला होता. बाहेर पडलेल्या चपला चावणे हा त्याचा आवडता उद्योग होता. त्याला पाहिलं कि उचलून घ्यावंसं वाटे. 'माझं सोनुलं माऊलं गं ते! असाच लवकर लवकर मोठा हो.' तितक्यात म्यांव!! आवाज आला. आई खाली बसून रागारागाने बघ्त होती. 'ही माणसांची जातच वाईट! माझ्या लेकराला कायम त्रास देत असतात. मी नाईलाज म्हणून त्याला बाहेर सोडून गेले तर हे सर्व त्याच्या हात धुवून मागेच लागले!! काहीतरी दुसरी व्यवस्था करायलाच पाहिजे.'


असेच एका संध्याकाळी पिल्लू चपलेशी खेळत होतं. सर्वांनाच पिल्लाचा लळा लागला होता. बिल्डींगमधली चिंटीपिंटी जमा होऊन कुतूहलाने बघत होती. तितक्यात आई आली. 'मेल्या! तुला सांगितलं होतं ना, या माणसांच्या नादी लागू नकोस म्हणून! कधी खेळापायी तुला त्रास देतील सांगता येत नाही. चल!!' म्हणून ती पिल्लाला तोंडात धरुन निघून गेली.
'हो गं बाई, आता घेऊन गेलीस. परत पाऊस झाला कि बरोब्बर येशील घेऊन. मी वाट पाहीन.' 


'अगं अनु, तुझ्या त्या मांजरीचं पिल्लू नेलं कोणीतरी!! कालपासून नुसती भेसूर ओरडते आहे आणि इकडेकडे फिरते आहे.'  


'बघ ना रे!! तिचं बिचारीचं पिल्लू नेलं कोणीतरी.आपल्याकडे निदान सुरक्षित तरी राहिलं असतं. ती खूप ओरडते आहे.'
'तुझ्या त्या बिचारीने काल सकाळी दारातली अर्धा लिटरची दुधाची पिशवी ओढून वाया घालवली. मांजराची जात अशीच!'
'असं काय बोलता रे? तिला काय कळतंय? तिला भूक लागल्यावर ती काय स्वतः दोन पोळ्या करुन घेणार का ओम मार्केटमधे दहा रुपये टाकून दूध विकत घेणार?'
'हो गं बाई! तुला माझ्यापेक्षा त्या मांजराचंच प्रेम जास्त. माणसापेक्षा मांजर झालो असतो तर बरं. '


सकाळी दुचाकी काढली. समोरुन करुण म्यांव!! आवाज आला. आई होंडाच्या सीटवर बसून दुःखी आणि रागावलेल्या नजरेने पाहत होती.
'काय केलंत चांडाळांनो माझ्या लेकराचं? तरी म्हणत होते त्याला, ही माणसाची जमातच अविश्वासू. कुठे लपवलंयस माझ्या पिल्लाला? तूच सारखी उचलायचीस त्याला.'
' माझ्यावर नको रागावूस बाई. मी काही नाही केलं तुझ्या पिल्लाला. जिथे असेल तिथे ते सुखी असू दे इतकी एकच देवाकडे प्रार्थना.'


बघता बघता तिची दोन उमदी पिल्लं एकापाठोपाठ एक तिच्या डोळ्यासमोर गायब झाली.अजूनही ती त्या पिल्लाला शोधतेय. आणि मीही..