आपापली आवडती पुस्तके

'मनोगता'वर येणाऱ्या अनेकांना वाचनाची आवड असेल. आतापर्यंत आपण साऱ्यांनी अनेक पुस्तके वाचली असतील. काही पुस्तकांचा आपल्या मनावर दूरगामी असा परिणाम झाला असेल..


यातूनच मला सुचले - आपण आपल्याला आतापावेतो सर्वाधिक आवडलेल्या पुस्तकांच्या महितीची देवाणघेवाण करावी...


अनेक लेखक/लेखिका आपल्याला १००% आवडतात. मला वाटते - प्रत्येक लेखकाचे १ पुस्तक असे बंधन घालून घ्यावे..


मला आवडलेली काही पुस्तके -


जीएंची सारीच, पण निवडच करायची तर ...'रमलखुणा'. एखाद्या तपस्व्याने आपल्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचे सार कुठेतरी लिहून ठेवावे तसे जी एंच्या या कथासंग्रहांबद्दल झाले आहे.(माझ्यापुरते तरी...)


ज्या कथांनी आयुष्याकडे पहायची दिशाच बदलून टाकली त्या कथा यांत आहेत.


सुनीताबाई देशपांडे -'आहे मनोहर तरी' ... स्त्रीत्वाच्या संकल्पनेचा याहून तेजस्वी, याहून काव्यात्म आविष्कार मला मराठीतच काय पण अन्यत्रही सापडलेला नाही...


पुलंचे कुठले पुस्तक या यादीत असणार नाही ? पण माझ्यामते "हसवणूक"मधील लेख हे त्यांच्या कारकीर्दीतील सुवर्णाच्या कळसासारखे काहीसे वाटते खरे..


(क्रमशः)