फलज्योतिषातला फोलपणा

फलज्योतिष हे प्रकरण संपूर्णपणे बेगडी आणि पोकळ आहे अशा मताचा मी आहे.  याला महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या गृहितकांवर हे उभं आहे ती गृहितकंच पूर्णपणे चुकीची आहेत.  यातली  काही गृहितकं आणि त्यांतील चुका खालील प्रमाणे -



  1. गृहितक - आकाशाचे बारा काल्पनिक भाग करण्यात आले आहेत.  ज्यांना राशी म्हटलं जातं.  प्रत्येक ग्रहाची भ्रमण कक्षा या राशींमधून जाते.  त्यामुळे विशिष्ट ग्रह विशिष्ट काळानंतरच विशिष्ट राशीत येतो आणि विशिष्ट काळ त्या राशीत रहातो.  या वास्तव्यात तो विशिष्ट प्रकारची फळं देतो. चूक - मुळात खगोलशास्त्रानुसार राशी बारा नसून तेरा आहेत. तेराव्या राशीचं नाव आहे ऑफीअश्यूस (ophiuchus).  म्हणजेच अमुक ग्रह अमुक वेळेस अमुक राशीत असण्याचं गणितच चुकीचं आहे कारण प्रत्येक ग्रहाला बारा नाही तेरा राशीतून भ्रमण करायला लागतं.  याचाच अर्थ अमुक एका ग्रहाला एका राशीतून जाऊन पुन्हा त्या ठिकाणी यायला तेवढा जास्त वेळ लागतो. अर्थातच विशिष्ट काळी विशिष्ट प्रकारची फळं देण्यासाठी तो ग्रहच त्या ठिकाणी हजर नसतो!

  2. गृहितक - सूर्य (रवि) हाही एक ग्रह आहे आणि तोही पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो कारण पृथ्वी या सौरमंडळाच्या केंद्रस्थानी आहे.  चूक -  शाळकरी मुलगाही यातली चूक दाखवेल.

  3.  गृहितक - चंद्र हाही एक ग्रह आहे आणि इतर ग्रहांप्रमाणेच त्याचाही माणसाच्या जीवनमानावर प्रभाव पडतो.  चूक - चंद्र  हा ग्रह नसून उपग्रह आहे.  आपल्या सौरमालिकेत लहान मोठे असे कमीतकमी पन्नास तरी उपग्रह आहेत.  त्यातील काही तर चंद्राच्या दुप्पट आकाराचे पण आहेत.  त्यांचा माणसाच्या जीवनमानावर काहीच प्रभाव कसा पडत नाही?

  4. गृहितक - राहू आणि केतू हेही ग्रह आहेत आणि इतर ग्रहांप्रमाणेच त्यांचाही माणसाच्या जीवनमानावर प्रभाव पडतो. चूक - राहू आणि केतू हे ग्रह नसून दोन फक्त काल्पनिक बिंदू आहेत.  जर हे काल्पनिकच आहेत तर हे तुमच्या आमच्या जीवनात ढवळाढवळ कशी काय करु शकतात?

  5.  गृहितक -  फलज्योतीष हे एक शास्त्र आहे.  चूक -  शास्त्राधारित गोष्ट ही विज्ञान, तर्क, विचार आणि प्रयोग यांच्या पायावर उभी रहावी लागते आणि गणित आणि प्रयोगांद्वारे पुनःपुन्हा सिद्ध करता यावी लागते.  फलज्योतीषाबाबत हे कधीच शक्य होत नाही.

फलज्योतीषाची उभारणी चुकीच्या पायावर करण्यात आली आहे, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येत नाही.


आपली मतं कळली तर आभारी होईन. 


- मिलिंद