संवाद साधण्याच्या कला-

काही व्यक्तींचे मुद्दे अचूक असतात फक्त ते मांडताना त्यांना इतकी घाई होते... किंवा ते उत्तेजित होतात की, त्यांच्या चांगल्या बाजूकडे दुर्लक्ष होऊन त्यांची वाईट बाजू समोर येते. काही काळ गेल्यावर त्यांच्या भोवतीच्या मंडळींना ते काय म्हणाले होते ते आठवते व त्यावेळी त्यांचे मुद्दे बरोबर असूनही ते मांडण्याची रीत चुकल्याने त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. परंतू तोवर वेळ निघून गेलेली असते.


नुकतेच घडलेले उदाहरण द्यायचेच झाल्यास-
"संजय दत्त हा अतिरेकी नाही, शस्त्रास्त्रे बाळगण्याचा मूर्खपणा त्याने केला असेल परंतू त्यासाठी त्याला सरसकट देशद्रोही ठरवण्याची गरज नाही-" इति बा.ठा. ही गोष्ट असेल १९९३ च्या बॉम्ब स्फोट खटल्यानंतरची. सुनील दत्तने अतोनात प्रयत्न करूनही तुरुंगातून सोडवू न शकलेल्या त्याच्या पुत्राला काँग्रेसने नव्हे तर ठाकरेंनी साथ दिली होती.
न्या. कोदे ह्यांचा कालचा निर्णय तेच दर्शवतो. फक्त साहेबांची सांगण्याची पद्धत वेगळी होती म्हणून राईचा पहाड केला गेला होता.
तीच गोष्ट पाकिस्तानाशी क्रीडा संबंध ठेवावेत की नाही ह्या बाबत !


ह्याच संदर्भात काही उदाहरणे अजून देता येतील. 
अभ्यासाच्या वेळी एक विद्यार्थी बागेत इकडे-तिकडे हिंडत होता. त्याला दुसऱ्या विद्यार्थ्याने विचारले, "तुला अभ्यासाच्या वेळेत इकडे-तिकडे हिंडण्याची परवानगी मिळाली ?" "हो" पहिला बोलला.
"पण मी विचारले असता, शिक्षक 'नाही' म्हणाले".
"तू विचारले असशील, 'अभ्यास करताना मी इकडे-तिकडे हिंडू का ?' मी विचारले, ' इकडे-तिकडे हिंडत असताना मी अभ्यास करू शकतो का !"   


आपण काय बोलतो त्यापेक्षा ते कसे बोलतो हेही महत्त्वाचे असते.


एक मुलगा प्रथमच आपल्या मैत्रिणीला नृत्यासाठी घेऊन जाणार होता. त्याने आपल्या दुसऱ्या अनुभवी मित्राला सल्ला विचारला.
"तुम्हा दोघांना सुरुवातीला जरा अवघडल्यासारखे होईल, अस्वस्थता दूर करण्यासाठी मैत्रिणीची कोणत्या तरी चांगल्या गोष्टीबद्दल स्तुती कर !"
नृत्य करताना त्याला आपल्या अनुभवी मित्राचा सल्ला आठवला.....
"प्रिये, तुझ्यासारख्या लठ्ठ मुलीला नृत्य जमणार नाही असे मला वाटले होते परंतू तू फारच छान नाचतेस !"
पुढे काय झाले असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी !


पुण्यातल्या पाट्या जगप्रसिद्ध आहेत. एका चहाच्या दुकानात पाटी होती.....
"जे गिऱ्हाईक आपला उष्टा ग्लास फळीवर ठेवतील व सिगारेट ची रक्षा रक्षापात्रातच टाकतील त्यांच्याकडे मालक सुट्टे पैसे मागणार नाहीत"
अशीच युक्ती एका उंच इमारतीत केलेली होती. तेथे दोनच लिफ्ट्स होत्या व गर्दी फार होई. सतत तक्रार आल्यावर तिकडच्या सचिवाने लिफ्ट्स च्या भोवती पूर्ण उंचीचे आरसे लावले. स्वतःला आरशात न्याहाळताना लिफ्ट यायला वेळ  लागतो हे तक्रारदार विसरूनच गेलेत. मी स्वतः आमच्या इमारतीतला सूचना फलक लिफ्ट जवळ हालवला जेणेकरून "आम्हाला माहीतच नव्हते" चा सूर आपोआप कमी झाला.


काही वेळा नेमके काय सांगायचे आहे ते पानभर लेखनानेही वाचकाला कळणार नाही.....
काही वेळा मुलाकडे टाकलेला वडिलांचा फक्त एकच कटाक्ष बरेच काही सांगून जातो.


संवाद साधणे ही कला आहे असे म्हटले जाते.
माझ्या मते फक्त कलाच नाही तर ती एक मोठी प्रक्रिया आहे.... तो एक अनुभव पण आहे.
संवादात आशयाबरोबर उच्चार, भाषेची शुद्धता, लेखनाची सवय, वाचन करून आलेली प्रगल्भता व ग्रहण शक्ती, नेमक्या वेळी नेमके शब्द आठवण्या इतपत स्मरणशक्ती. वक्ता असल्यास नेमका हजरजवाबी पणा, समोरच्यावर झालेला परिणाम ग्रहण करण्याची कला (फिडबॅक ग्रास्पींग पॉवर) ह्या क्वॉलीटीज् (मराठी शब्द ?) यायला पाहिजेत.
छोटीसी जांभई किंवा (विलासराव देशमुख झोपले होते तशी) एखादी 'नॅप' श्रोत्याला बरेच काही सुचवते.
मनोहर जोशींना माझ्या मुलींच्या शाळेत भाषण देताना ऐकले होते. त्यांचे भाषण इतके खुसखुशीत होते की हसून हसून मुरकुंड्या वळल्या. विषय राजकारणाचा नव्हता व फक्त शिक्षणाचा होता हे सर्वात महत्त्वाचे.


संवादासाठी समोर असलेले माध्यम काय ते संवाद साधण्यापूर्वी समजावून घेणे नेहमीच चांगले. नोकरीच्या मुलाखतीला जाताना सिनेमाला जायचे ते कपडे घालून जाणे किंवा एखाद्या मित्राशी बोलावे तसे... "या मॅन आ कॅन डू दॅ" सारखी भाषा वापरल्यास कल्याणच होणार !
स्वतःचा पूर्वानुभव हे मोठे परिणामकारक हत्यार आहे; ते संवाद साधताना नेहमी वापरावे. लिंग, बौद्धिक/शैक्षणिक क्षमता, सामाजिक दर्जा व राहणीमान हे काही महत्त्वाचे घटक नक्कीच लक्षात ठेवावेत.  
काही महत्त्वाच्या मुलाखतींना जाताना तोंडात कुठलीही वस्तू चघळणे टाळावे. शक्य असल्यास परफ्यूम किंवा सौम्य अत्तराचा यथायोग्य वापर करावा. बोलण्याची पद्धत विनम्र व आवाज स्वतःच्या ताब्यात असावा. संवादात भावनिक आव्हानांपेक्षा वस्तुनिष्ठता असावी. संवाद आटोपशीर (पाल्हाळ न लावणारा) असावा पण म्हणून त्रोटक किंवा उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत.
समोरची व्यक्ती विचारत असलेले प्रश्न किंवा सांगत असलेली गोष्ट माहीत असली तरी पूर्ण ऐकून घ्यावी. लक्ष देणे ही देखील एक कला आहे. आपली मते वेगळी असल्यास सकारण व सादोहरण पटवून द्यायला कचरू नये परंतू वाद विवाद टाळावेत. गीव्ह & गेट हे तत्त्व लक्षात ठेवावे.
लक्ष दिल्यास मिळेल.....
मित्रता दिल्यास मिळेल..
मान दिल्यास मिळेल.....   


नुकताच मनोगतच्या प्रशासकांनी मनोगतींशी जो 'संवाद' साधला आहे;
हे संवाद साधण्याच्या कलेचे एक द्योतकच आहे......!