कोटीच्या-कोटी - भाग-४
कोटीच्या कोटी- भाग-४
* शेजारच्या बाबुरावांना पायजाम्यात नाडा घालणे जमले नाही, की तो पायजामा बायकोच्या हाती देऊन " मी नाडी-परीक्षेत आज पुन्हा नापास झालो" असे म्हणतात.
*********
* दूरदर्शन वरील कार्यक्रमांचा दर्जा बघुन, 'सुचना व प्रसारण' खात्याचे नाव बदलून ते 'सुचेना प्रसारण खाते' करावे असे माझा एक मित्र नेहमी म्हणतो.
*********
* नातेवाईकांच्या घरी रात्री खूप डास चावल्यावर, रावसाहेब सकाळी उठुन, 'मला काल रात्री सार्थ डास-बोध झाला' असे म्हणतात.
*********
*आमच्या कार्यालयात कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ आहेत, कामात अतिशय 'थंड'!- माझा मित्र त्यांना, "हे खऱ्या अर्थाने 'कुल'कर्णी आहेत असे म्हणतो.
*********
* न कळणाऱ्या गझलेला 'पझल' का म्हणु नये?
*********
* माझ्या एका मैत्रीणीच्या नवऱ्याचे नाव अविनाश आहे, त्यामुळे आम्ही तिला, "त्याच्या सहवासातील प्रत्येक क्षण तुझ्यासाठी 'अवि-स्मरणीय'च असेल असे म्हणत असतो.
*********
* 'बांगला देश' च्या विरुद्ध कोणीही कितीही शतके ठोका, किंवा त्यांना कितीही मोठ्या फरकाने कितीही वेळ हरवा; त्यांची बिचाऱ्यांची अजिबात तक्रार नसते- त्यांना खरे तर 'बांगला देश' ऐवजी 'चांगला देश'च का म्हणु नये?
*********
* पर्यावरणावरील एका घरगुती, पण गंभीर चर्चेत आमच्या आत्याने' " पर्यावरण जरा बाजुला ठेवा,आधी पिठल्याला पर्याय म्हणुन वरण चालेल का, ते सांगा; कारण घरात बेसन नाहीये " असे म्हणून एकच खस-खस पिकवली.
*********
*केंद्र सरकारची 'इंदिरा आवास योजना'- किती सार्थ नाव आहे, नाही? नेहमीप्रमाणेच सगळे अधिकारी 'आ वासुन 'उभे... ; माझा हिस्सा मला कधी मिळतो ह्याची वाट पहात!...आणि आता झोपडपट्टी पुनर्वसन योजना, तिचे संक्षिप्त नाव 'झोपु' आहे, ते काय चुकीचे आहे?( झोपु सदाच आम्ही, तैसा ठराव आहे!)
*********
*माझ्या मित्राचे वडील, आणि दोन आत्या बरेच वर्षांनी एका घरगुती कार्यक्रमानिमित्त एकत्र आले.कार्यक्रमात त्य तिघांचा एक ग्रुप फोटो काढण्यात आला; आणि तिघांनाही डायबिटीज असल्यामुळे त्या फोटोला अल्बम मधे 'विलोपले मधुमेहात ह्या' असे सार्थ शीर्षक देण्यात आले.
*********