राजगडला मी पहिल्यांदा गेलो तो युवाशक्ती आणि यूथ हॉस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या सिंहगड ते रायगड मोहिमेत. पण त्या मोहिमेत रायगड सोडता सगळेच किल्ले पहिल्यांदा पाहत होतो त्यामुळे 'परत यायला हवे' असेच सिंहगड-राजगड-तोरणा या त्रिकूटाबद्दल वाटले. त्यानंतर त्यातला सिंहगड कॉलेजच्या पहिल्या सेमिस्टरमध्येच आठवड्यात किमान एकदा असा झाला. कॉलेजला दांडी मारल्यावर राहुल, अलका किंवा सिंहगड इतकेच पर्याय प्रशांत आणि माझ्या संयुक्त यादीत होते. आणि आठवड्याला तीन दांड्या ही आमची सरासरी होती.
पण कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी जाईस्तोवर सिंहगडाचे कौतुक ओसरले होते. आणि मी परत प्रेमात पडलो होतो.