बोले तैसा चाले..

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले असे म्हटले आहे. ते सार्थ आहे. बोलबच्चन खूप असतात पण जे बोलतात ते करून दाखवणारे फार थोडे.


प्राणांतिक उपोषणाच्या बाता मारणारे भरपूर, पण तुम्ही जीव घेऊ शकता, जीवन देऊ शकत नाही हे इंग्रजांना दाखवून देण्यासाठी आपल्या ध्येयाप्रत उपोषणाने प्राण देणारे फक्त तीन महान हुतात्मे हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेत होऊन गेले जे इतिहासात अजरामर आहेत; हुतात्मा जतीन दास, हुतात्मा महावीरसिंग आणि हुतात्मा मणिंद्रनाथ बॅनर्जी. आज १३ सप्टेंबर, हुतात्मा जतीन दास यांची पुण्यतिथी.


 


jatin das


शालेय जीवनातच जतिंद्रनाथ दास हे देशकार्यात पडले. ते अनुशीलन समितीचे सक्रिय सदस्य होते. १९२४ साली त्यांना सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाल्याबद्दल अटक झाली होती व तुरुंगवासही भोगावा लागला होता. सुटल्या नंतरही त्यांच्यावर पाळत होती. अर्थात पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने ते गप्प होते. मात्र त्यांचा संशय अनाठायी नव्हता.


स्वा. सावरकरांनी बाँब बनवण्याची कृती विलायतेतून इकडे हिंदुस्थानात पाठवली आणि बंगाली तरुणांना बाँबचा ध्यास लागला. लवकरच अनेक बंगाली तरुण बाँब बनवण्यात यशस्वी झाले. बंगाली तरुणांनी बाँबस्फोटाने इंग्रजांना हादरवले व अनेक जण फासावर गेले तर अनेक परागंदा झाले. अनेक वर्षांनी पुन्हा हिं‌. स. प्र. से च्या रूपाने क्रांतिज्वाला पुन्हा भडकली. आझाद प्रभृती बाँब च्या मोठ्या निर्मितीसाठी उत्सुक होते व त्यांनी ही कला अवगत असलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना जतिंद्रनाथ सापडले व तेही या कार्यात सामील झाले.


पुढे अनेकजण पकडले गेले त्यात जतीनदाही होते. अन्याय्य वागणूक व जुलुमाच्या निषेधात क्रांतिकारकांनी उपोषणास सुरुवात करण्याचे ठरवले व त्याचे नेतृत्व जतीनदांनी घेतले. त्यांना त्या आधीही एकदा २४ दिवसांच्या उपोषणाचा अनुभव होता. उपोषण तोडण्यासाठी इंग्रजांनी छळापासून ते प्रलोभनांपर्यंत सर्व मार्ग अवलंबले मात्र क्रांतिकारक ठाम होते. जसजसे दिवस उलटत होते तसतसे उपोषण सर्वतोमुखी होऊ लागले व असंतोष जनतेत रुजू लागला. आता तुरुंगात मृत्यू होणे सरकारला परवडणारे नव्हते. अखेरचा उपाय म्हणून इंग्रजांनी जतीनदांना जमीन मंजूर केला मात्र त्यांनी जामिनाला नकार दिला. पन्नास दिवस उलटून गेले व उपोषण सुरूच होते तेंव्हा सरकारने अखेर त्यांच्या वडिलांना मुलाला घेऊन जाण्याची परवानगी दिली. मात्र त्या प्रखर देशाभिमानी पित्याने ठणकावून सांगितले की माझ्या मुलाला जसा नेलात तसा परत करा, मी या अवस्थेत त्याला त्याच्या ध्येयापासून दूर नेणार नाही, मी माझा मुलगा देशाला समर्पित केला आहे.


१२ सप्टेंबर १९३०. उपोषणाचा ६२ वा दिवस! जतीनदांची ज्योत मंदावत चालली होती. त्यांचा भाऊ किरण दास याला त्यांना तुरुंगात जाऊन भावाला भेटण्याची परवानगी दिली गेली. किरण दास यांनी निष्प्राण होत चाललेल्या भावाला पाहिले आणि ते काय ते समजून चुकले. जतीनदांनी सर्व उपोषीत क्रांतिकारकांना आपल्या जवळ येण्यास खुणावले व त्यांना भावाने आणलेल्यापैकी एक एक बिस्किट देऊ केले. ते म्हणाले की यामुळे उपोषणाचा भंग होईल असे समजू नका, तर माझ्या प्रेमाखातर हे खा; हे आपले अखेरचे सहभोजन आहे. १३ सप्टेंबरला त्यांची नाडी व श्वास अगदी क्षीण झाला. डॉक्टरला पाचारण करून शिरेतून टोचण्याचा शेवटचा प्रयत्न जतीनदांनी त्या अवस्थेतही हाताने नकार देत हाणून पाडला. दुपारी १ वाजून चाळीस मिनिटांनी त्यांची प्राणज्योत उपोषणाच्या ६३ व्या दिवशी मालवली.


त्यांचा मृतदेह त्यांच्या भावाने ताब्यात घेतला. असंख्य देशभक्त व जनता तुरुंगाबाहेर जमले होते. मृतदेह लाहोरहून मेलने कलकत्त्याला न्यायचे ठरले. अंत्यदर्शनासाठी लाहोर शहरात दीड मैल लांबीच्या रांगा लागल्या. रात्री एका खास डब्यात त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला. तो टिकविण्यासाठी दोनशे पौंड बर्फाची व्यवस्था केली गेली. डब्यात मृतदेहासोबत बटुकेश्वर दत्त यांच्या भगिनी प्रमिला दत्त व हुतात्मा भगवतीचरण यांच्या पत्नी दुर्गावती होत्या. गाडी निघाल्यावर प्रत्येक स्थानकात लोक व विशेषतः: विद्यार्थी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लावून उभे होते. मृतदेह कलकत्त्यात पोहोचताच सारे शहर अंत्ययात्रेसाठी रस्त्यावर उतरले. जतीनदांच्या वडिलांनी मृतदेह घरी न देता जनतेच्या दर्शनासाठी घेऊन जाण्यास सांगितले. अंत्ययात्रेला चार लाख लोक जमले होते. इतका जनसमुदाय कलकत्त्यात यानंतर फक्त आझाद हिंदच्या वीरांसाठीच जमला. लोक हसरत मोहानी यांचे 'सरफरोशी की तमन्ना' व अन्य देशभक्तिपर गीते गात होते. घराघरातून अंत्ययात्रेवर पुष्पवृष्टी होत होती. विराट सभेनंतर या हुतात्म्यावर अंत्यसंस्कार झाले.


 जतीनदांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोकसंदेश पाठविले. आयर्लंड च्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या व तुरुंगात उपोषणाने प्राणत्याग करणाऱ्या टेरेन्स मॅकस्विनीच्या कुटुंबीयांनीही शोकसंदेश पाठवला.


ज्याने बाँब सारखे संहारक हत्यार बनविले त्याच देशभक्ताने निर्धाराचे हत्यारही तितकेच प्रभावी असल्याचे जगाला दाखवून दिले. जतिंद्रनाथ दास यांच्या स्मृतीस सादर प्रणाम.